संशयित शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक

केरळ येथे रेल्वेला आग लावल्याचे प्रकरण

आरोपी शाहरुख सैफी

रत्नागिरी – केरळ येथे रेल्वेला आग लावून पळून गेल्याच्या प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी याला पोलिसांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकावरून अटक केली. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि रत्नागिरी पोलीस यांनी ही कारवाई केली. आता शाहरुख याला केरळच्या आतंकवादविरोधी पथकच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

शाहरुख सैफी हा केरळात केलेल्या वरील कृत्यात स्वतःही घायाळ झाला होता. ४ एप्रिलच्या रात्री ११.३० वाजता तो रत्नागिरी रेल्वेस्थानकात झोपलेला आढळला. केंद्रीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. त्याने त्याचा गुन्हा स्वीकारला आहे.
२ एप्रिल या दिवशी कन्नूरला जाणार्‍या रेल्वेगाडीत एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. तिने प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकून रेल्वेला आग लावली. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण भाजले होते.

या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून हिंदी भाषेतील काही लिखाण केलेली कागदपत्रे आणि भ्रमणभाष जप्त केला होता. या भ्रमणभाषवरून उत्तरप्रदेशातील एका व्यक्तीशी संपर्क साधल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर केरळ पोलिसांनी साक्षीदाराच्या साहाय्याने संशयिताचे रेखाचित्र सिद्ध केले होते. रेखाचित्राप्रमाणे आरोपीचा शोध घेत असतांना या घटनेतील घायाळ आरोपी हा रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात स्वतःहून भरती झाला होता आणि उपचार घेऊन तो अजमेरला पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आतंकवादविरोधी पथकाने रत्नागिरी पोलिसांचे साहाय्य घेऊन त्याला अटक केली.