शेवटच्‍या श्‍वासापर्यंत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात ठामपणे उभे रहा ! – आमदार टी. राजा सिंह

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदू अधिवेशना’चे आयोजन

भाग्‍यनगर – तेलंगाणामध्‍ये हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यासाठी पुष्‍कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्‍वनिष्‍ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्‍याला कोणत्‍याही परिस्‍थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे. कितीही संघर्ष करावा लागला, तरी शेवटच्‍या श्‍वासापर्यंत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात ठामपणे उभे रहायचे आहे. भारत हिंदु राष्‍ट्र होईल, यात कोणतीही शंका नाही; पण या धर्मकार्यात आपले योगदान असणे आवश्‍यक आहे, असे उद़्‍गार तेलंगाणातील हिंदुत्‍वनिष्‍ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील नृपतुंगा स्‍कूल ऑडिटोरियम्‌मध्‍ये आयोजित केलेल्‍या ‘राज्‍यस्‍तरीय हिंदू अधिवेशना’त ते बोलत होते.

आमदार टी. राजा सिंह

या अधिवेशनाला समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनीही संबोधित केले.

याप्रसंगी आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्‍यांतून ब्रह्मर्षि बंगारय्‍या शर्मा, डॉ. भास्‍कर राजू, ‘हिंदु उपाध्‍याय समिती’चे आंध्रप्रदेश राज्‍य अध्‍यक्ष महेश डेगला, ‘भगवद़्‍गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्‍टडीज’च्‍या सहयोगी संचालिका श्रीमती एस्‍थर धनराज, ‘अनुसूचित जातीजमाती आरक्षण परीरक्षण समिती’चे राज्‍य अध्‍यक्ष श्री. मोहन कुमार, ‘हिंदु देवालय परीरक्षण समिती’चे राज्‍य अध्‍यक्ष श्री. रवींद्र रेड्डी, ‘हिंदु जॉइँट अ‍ॅक्‍शन कमिटी’चे राज्‍य अध्‍यक्ष श्री. ललित कुमार, ‘राष्‍ट्रीय शिवाजी सेने’चे राज्‍य अध्‍यक्ष श्री. श्रीनिवास चारी, ‘जय श्रीराम सेने’चे अध्‍यक्ष श्री. शांतीकिरण, ‘एस्‌व्‍हीबी धर्मसेने’चे अध्‍यक्ष श्री. विनोद सनातनी, ‘भाग्‍यनगर ब्राह्मण संघा’चे अध्‍यक्ष श्री. गोविंद राजू महाराज आदी विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रमुख, तसेच हिंदुत्‍वनिष्‍ठ अधिवक्‍ते, सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्‍यासह १६० जण उपस्‍थित होते.