Narayana Murthy : ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत ! – नारायण मूर्ती,  ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक

 ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचा दावा

श्री. नारायण मूर्ती

कोलकाता (बंगाल) – आम्हाला आमच्या आकांक्षा उंचवाव्या लागतील; कारण ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत. आपण कष्ट करण्याच्या स्थितीत नसलो, तर कष्ट कोण करणार? तरुणांनी हे समजून घ्यायचे आहे की, भारताला पहिल्या क्रमांकावर आणण्याासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील, असे आवाहन ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले. येथे ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. गेल्या वर्षीही मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यात ७० घंटे काम करण्याचा सल्ला दिला होता.

नारायण मूर्ती यांनी मांडलेली सूत्रे

१. ‘इन्फोसिस’मध्ये मी सांगितले होते की, आम्ही सर्वोत्तम जागतिक आस्थापनांशी स्वतःच्या आस्थापनाची तुलना करायला हवी. एकदा आपण असे केले की, आपल्या लक्षात येईल की, भारतियांना पुष्कळ काही करायचे आहे.

२. सध्याच्या भारताच्या कामगिरीबद्दल जग आदर करते. तुमच्या कामगिरीमुळे जग तुम्हाला ओळखते आणि तुमचा आदर करते. या आदरामुळे तुमची शक्ती वाढते.

३. मला ७० च्या दशकाच्या प्रारंभी पॅरिसमध्ये काम करण्याची संधी मिळाली; पण मी गोंधळलो होतो. ‘भारत किती घाणेरडा आणि भ्रष्ट आहे’ यावर पाश्‍चात्त्य देश बोलायचे. माझ्या देशात गरिबी होती, रस्त्यांवर खड्डे होते. पाश्‍चात्त्य देशांतील प्रत्येकजण समृद्ध आहे. गाड्या वेळेवर धावतात. मला वाटले की, हे चुकीचे असू शकत नाही.

४. मी फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याला भेटलो आणि त्यांनी माझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली; पण माझे समाधान झाले नाही. मला जाणवले की, एखादा देश गरिबीशी तेव्हाच लढू शकतो, जेव्हा तो रोजगार निर्माण करतो. यातून नियोजित उत्पन्न मिळते. उद्योजकतेमध्ये सरकारची भूमिका नाही. मला हेदेखील जाणवले की, उद्योजक राष्ट्र निर्माण करतात; कारण ते रोजगार निर्माण करतात. ते त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करतात आणि कर भरतात.

५. एखाद्या देशाने भांडवलशाही स्वीकारली, तर ते चांगले रस्ते, चांगल्या गाड्या आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करतील. त्या काळी भारतासारख्या गरीब देशात भांडवलशाही रुजली नव्हती.