थोडक्यात महत्त्वाचे !

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग चालू !

सोलापूर – ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग चालू झाली असून मानकर्‍यांकडून नंदीध्वजांचा सराव होत आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर समितीकडून पंचकट्टा येथे श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमा पूजनाने यात्रेच्या सिद्धतेला आरंभ होईल. २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. शहरात श्री सिद्धरामेश्वर कुलदैवत असलेल्या भक्तांच्या घरात नंदीध्वज पूजा उत्साहात पार पडत आहेत. श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजे सोलापूर जिल्ह्यासह परराज्यातील भाविकांसाठी भक्ती आणि परंपरा यांचा दुहेरी संगम असतो.


हनुमान मंदिराच्या नियमितीकरणाविषयी मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच !

पुणे – जुनी मंदिरे न्यायालयाने निश्चित केलेल्या श्रेणी अन्वये नियमित करता येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून दादर येथील हनुमान मंदिराच्या संदर्भात मार्ग काढण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रेल्वे प्रशासनाकडून दादर स्थानकावर पुनर्विकासाची कामे केली जात आहेत. त्यामुळे दादर रेल्वेस्थानकातील ८० वर्षे जुने हनुमान मंदिर हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते पुण्यात आले होते.


‘सारथी पोर्टल’वरील तक्रारींची नोंद न घेतल्यास कारवाई !

पिंपरी – महापालिकेच्या ‘सारथी पोर्टल’सह इतर माध्यमांतून आलेल्या तक्रारींची वेळेत नोंद घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तक्रारी प्रलंबित रहाणार नाहीत, याची काळजी विभागप्रमुखांनी घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? अधिकारी-कर्मचारी कामे कार्यक्षमतेने करायला केव्हा शिकणार ? – संपादक)


अखर्चित निधी परत मागवण्याचा शासनाचा निर्णय !

पुणे – अखर्चित निधी परत मागवण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने पुणे जिल्हा परिषदेला १३३ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करावे लागतील. जिल्हा परिषदेचा वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षात १ कोटी ५९ लाख रुपये, तर वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात १३१ कोटी ६० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. दिलेला निधी वेळेत खर्च न केल्याने प्रशासनाला हा निधी परत द्यावा लागत आहे.


पुणे महापालिकेकडून ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ !

पुणे – महापालिकेने चालू केलेल्या ‘सर्वंकष स्वच्छता’ मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी शहरातील २ प्रभागांतून २४ टन कचरा, १६ टन राडारोडा उचलला. त्याचसमवेत विनाअनुमती विज्ञापन फलक, कापडी फलक (बॅनर) काढण्यात आले. पुणे रेल्वे स्थानक परिसर आणि परिसरात स्वच्छता करण्यात आली.