म्हापसा – हल्लीच गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने ‘वी आर द मेसेंजर्स ऑफ गुड न्यूज’ या मजकुराचे फलक राज्यात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या फलकावर झेवियरचे चित्र आहे आणि त्यात शवप्रदर्शनाविषयी माहिती आहे. हा फलक म्हापसा येथील हुतात्मा चौकाच्या लोखंडी कुंपणाला टेकून उभा करण्यात आला होता. याला म्हापसा येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे, तसेच परिसरातील इतर फलकांनाही आक्षेप घेतला आहे.
‘म्हापसा येथील शांतताप्रिय नागरिक’ यांच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा फलकांना आमचा आक्षेप आहे. सरकारी खर्चाने धार्मिक तेढीला प्रोत्साहन देण्याचा हा प्रकार वाटतो. हा फलक हुतात्मा चौकात लावला आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिक झेंडावंदन होते. तो तेथे लावणे म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण वाटते. या फलकावर ज्या व्यक्तीचे चित्र छापले आहे, त्याचा गोव्याच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नसेल, तर आम्हाला हा (फलक हुतात्मा चौकात लावणे) स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान वाटतो. जर ती व्यक्ती परकीय असेल, तर त्याची सरकारी खर्चाने भलावण का ? हा राष्ट्रीय भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे येथे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इतिहास असा आहे की,
२४ नोव्हेंबर १६८३ या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी जुवे बेटावर स्वारी केली आणि सांत इस्तेव हा किल्ला काबीज केला. तेथून रामाची तार ओलांडून जुने गोवे शहराकडे प्रस्थान केले. त्या वेळी पोर्तुगीज व्हाईसरॉय दों फ्रान्सिस दे तावारा याने धर्मदंड फ्रान्सिस झेवियरच्या शवाच्या हातात ठेवला आणि गोव्याच्या पर्यायाने पोर्तुगीज सत्तेच्या रक्षणाची करुणा भाकली. त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराजांवर मोगलांनी आक्रमण केल्यामुळे संभाजी महाराजांना पोर्तुगिजांच्या विरोधातील गोव्यातील स्वारी अर्धवट सोडून जावे लागले. छत्रपती संभाजी महाराज परत गेल्यावर झेवियरच्या कृपेमुळे पोर्तुगिजांवरील संकट टळले, असा गोवा सरकारला जर चमत्कार वाटत असेल, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थात् राष्ट्रीयत्वाचा अपमान आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूस असलेले सर्व फलक काढावेत, अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. पोलिसांनी त्वरित याची नोंद घ्यावी, अशी मागणी आम्ही शांतताप्रिय नागरिक करत आहोत.
याविषयी येथील राष्ट्रप्रेमी नागरिक गोकुळदास कामत यांनी नोंदवलेली तीव्र प्रतिक्रिया सामाजिक माध्यमात प्रसारित झाली आहे.