बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या ठाकरे गटास पोलिसांचा मज्जाव !

बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ आंदोलन करणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बांगलादेशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ‘जोडो मारा’ आंदोलन करण्यात येणार होते. पोलीस प्रशासनाने बांगलादेशाच्या पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा, निषेधाचे फलक, बांगलादेशाचा ध्वज काढून घेतला आणि निदर्शने करण्यास मज्जाव केला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार आणि करवीरतालुकाप्रमुख राजू यादव यांनी याचा निषेध केला अन् सनदशीर मार्गाने चाललेल्या आंदोलनाला पोलीस अनुमती का देत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला. (बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा निषेधही करू नये, असे पोलिसांना अपेक्षित आहे का ? – संपादक)

पोलिसांनी जप्त केलेले फलक आणि बांगलादेशी पंतप्रधांनाचा पुतळा

पोलिसांनी विरोध केल्यानंतरही ठाकरे गटाने बांगलादेशाच्या पंतप्रधानांच्या निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलन केले. या प्रसंगी बांगलादेशाचा ध्वज पायदळी तुडवण्यात आला. या प्रसंगी राजू यादव म्हणाले, ‘‘भारत सरकारने बांगलादेशासोबतचे व्यापारी संबंध तोडून टाकावेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतांना बांगलादेशाशी क्रिकेटचे सामने खेळू नयेत.’’ या प्रसंगी सहसंपर्कप्रमुख श्री. विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, सर्वश्री पोपट दांगट, विनोद खोत, राजू सांगावकर, शरद माळी यांसह अन्य उपस्थित होते.