पोलीस आणि पत्रकार यांना ढकलून कार्यक्रमात प्रवेश !
नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – येथील राजभवन येथे १५ डिसेंबर या दिवशी मंत्रीमंडळातील ३३ मंत्र्यांनी शपथ घेतली. याखेरीज ६ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली; मात्र शपथविधी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गोंधळ घातला. मान्यवर, पत्रकार आणि पोलीस यांना ढकलून कार्यक्रमात प्रवेश केला. अनेक कार्यकर्त्यांनी इतरांशी असभ्य वर्तन केले.
१. घाई-गडबडीत शपथविधीचा कार्यक्रम येथे आयोजित केला होता. तथापि कार्यक्रमस्थळी नियोजनाचा अभाव दिसून आला.
२. नूतन आमदारांच्या अनेक कार्यकर्त्यांकडे पास नव्हते. पोलिसांनी पासची विचारणा केली असता कार्यकर्ते उडवाउडवीचे उत्तर देत होते, तसेच पास असलेल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात प्रवेश मिळवला.
३. पोलिसांनी प्रवेशद्वार बंद केलेले असतांनाही ते उघडून कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला. अनेक कार्यकर्ते अचानक येऊ लागल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
४. पत्रकार कक्षात अनेक कार्यकर्ते घुसले. ते पत्रकारांसाठी ठेवलेल्या आसंद्यांवर बसले. वारंवार सांगूनही कार्यकर्ते तेथून उठत नव्हते. त्यामुळे पत्रकारांना बसायला जागा मिळाली नाही. मंत्री शपथ घेत असतांना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन शिट्या वाजवल्या.
कार्यकर्त्यांच्या अशा असभ्य वागणुकीमुळे अनेक पत्रकार, पोलीस आणि मान्यवर यांनी खेद व्यक्त केला.
संपादकीय भूमिका
|