भूमी घोटाळ्यातील आरोपी सिद्दीकी याने कोठडीतून पलायन केल्याचे प्रकरण
सुलेमान खान याच्या प्रसारमाध्यमात प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकार्यांची नावे आली आहेत. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पोलीस महासंचालक अलोक कुमार म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत सुलेमान खान याला कह्यात घेणे, हीच आमची प्राथमिकता आहे. पसार झालेल्या सुलेमान याने त्याच्या व्हिडिओमध्ये १२ पोलिसांच्या तुकडीने त्याला सोडल्याचे म्हटले असले, तरी सुलेमान याची ही धडपड अन्वेषण भरकटवण्यासाठी केलेला प्रकार आहे. सुलेमान याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत आणि अशा व्यक्तीवर पोलीस विश्वास ठेवू शकत नाहीत. अन्वेषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. सुलेमान याला कह्यात घेतल्यानंतर त्याने केलेल्या आरोपांची सत्यता पडताळण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक (रेंज) यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे अनेक गट सुलेमान याचा शोध घेत आहेत. अनेक आंतरराज्य गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. सुमारे ४ वर्षे पसार झाल्यानंतर ३ महिने चाललेल्या एका मोहिमेनंतर त्याला पोलिसांनी कह्यात घेतले होते. सुलेमान कारागृहातून पळून जाण्यात अन्य पोलिसांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे.’
सुलेमान याने नाव घेतलेल्या संबंधित १२ पोलिसांना आधी निलंबित करा ! – काँग्रेस
पणजी – सुलेमान याने व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्या सर्व पोलिसांना सेवेतून त्वरित निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणी काही मंत्री आणि आमदार गुंतल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी १६ डिसेंबर या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा आरोप केला. या वेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार आल्टन डिकोस्टा यांचीही उपस्थिती होती.
अध्यक्ष अमित पाटकर पुढे म्हणाले, ‘‘आमदाराने धमकी देऊन भूमी हस्तांतरित करण्यास सांगितले होते’, असा आरोप सुलेमान याने त्याच्या व्हिडिओमध्ये केला आहे. याची चौकशी झाली पाहिजे. एकूणच या प्रकराची न्यायालयीन चौकशी करावी.’’ विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यामधील संगनमत पुन्हा एकदा उघड झाले आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणात अनेक आमदार आणि मंत्री यांचा सहभाग आहे.’’
विरोधी पक्षांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट
यानंतर काँग्रेस आणि आप यांच्या पदाधिकार्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन ज्या दिवशी सुलेमान याने गुन्हा अन्वेषण विभागाच्या कोठडीतून पलायन केले, त्या दिवसाचे सर्व सीसीटीव्ही फूटेज (सीसीटीव्हीतील मूळ चित्रीकरण) प्रसारित करण्याची
मागणी केली.