Zakir Hussain Passed Away : सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन !

सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन

मुंबई – सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात वयाच्या ७३ व्या वर्षी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’मुळे (श्‍वसनप्रणालीच्या आजारामुळे)  त्यांचा मृत्यू झाला. उस्ताद झाकीर हुसेन केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध होते. देश-विदेशांत अनेक ठिकाणी त्यांच्या तबलावादनाचे कार्यक्रम झाले होते. जगभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक कलाकार आणि त्यांचे चाहते यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

झाकीर हुसेन यांना भारत सरकारने वर्ष १९८८ मध्ये पद्मश्री, वर्ष २००२ मध्ये पद्मभूषण आणि वर्ष २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांना ५ वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जागतिक संगितक्षेत्रात ग्रॅमी पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात तबलावादनासाठी निमंत्रित केले होते. व्हाईट हाऊसमध्ये अशा प्रकारे कार्यक्रम करणारे ते पहिले भारतीय होते.

उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराला विश्‍व मुकले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – एका प्रतिभावान कलाकाराला विश्‍व मुकले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मविभूषण तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा कायापालट केला. त्यांनी तबल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवून दिला. अशा प्रकारे ते सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनले.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

नागपूर – प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने संपूर्ण जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा सुपुत्र असलेले झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबलावादनाकडे आकर्षित केले. पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. तरुण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव ‘झाकीर हुसेन’ होते. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि झाकीरप्रेमींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’’