नागरिकांच्या आंदोलनामुळे पंचायतीचा प्रस्तावित ‘नाईट क्लब’चे सर्वेक्षण करण्याचा निर्णय
म्हापसा, १६ डिसेंबर (वार्ता.) – हणजूणवासियांनी निवासी क्षेत्रातील प्रस्तावित ‘नाईट क्लब’च्या विरोधात आंदोलन छेडले आहे. या आंदोलनामुळे हणजूण पंचायतीने प्रस्तावित ‘नाईट क्लब’चे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
हणजूण येथे निवासी क्षेत्रात पंचायतीने ‘नाईट क्लब’ चालू करण्यास तात्पुरती अनुज्ञप्ती दिली आहे. हा विषय हणजूण पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत चर्चेला आला असता ग्रामस्थांनी ‘सर्वेक्षण न करता पंचायत मंडळाने प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला अनुज्ञप्ती कशी दिली ?’, असा प्रश्न केला. ग्रामसभेत स्थानिक नागरिक जॅरमी फरेरा म्हणाले, ‘‘नाईट क्लब’मुळे गावातील नागरिकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होणार आहे. उपलब्ध कागदपत्रानुसार पंचायतीने या प्रकल्पावरून ‘उपाहारगृह आणि मद्यालय’ यासाठी ना हरकत दाखला दिलेला आहे, तर प्रकल्पाच्या आराखड्यानुसार त्याचे नाव ‘क्लब ऑफ गोवा’, असे आहे. आराखड्यानुसार ‘डीजे’ (मोठी संगीत यंत्रणा) आणि कलाकार यांना संगीत अन् कला सादरीकरणासाठी ही जागा आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण, तसेच रस्ते लहान असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढणार आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या घटना वाढून या भागातील शांती आणि सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. असे प्रकल्प निवासी क्षेत्र नसलेल्या ठिकाणी स्थलांतरित करावे.’’ या ठिकाणच्या प्रस्तावित ‘नाईट क्लब’च्या विरोधात अनेकांनी स्वाक्षरी मोहीम आरंभली आहे.