विषारी मद्यविक्रीच्या विरोधात कारवाई न केल्यास आत्मदहन करणार ! – सुरेश सावंत, माजी सभापती, पंचायत समिती, कणकवली

सिंधुदुर्गनगरी – जिल्ह्यात गोवा बनावटीच्या विषारी मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. जिल्ह्यात होणारी विषारी मद्याची विक्री तात्काळ थांबवावी, अन्यथा कार्यालयासमोर आत्मदहन करू, अशी चेतावणी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्री होणार्‍या गोवा बनावटीच्या विषारी मद्यावर तात्काळ बंदी घाला, अशी मागणी यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्ह्यातील काही किराणा मालाची दुकाने आणि पानपट्ट्या या ठिकाणी अशा मद्याची विक्री होत असून ती तात्काळ थांबवावी. विषारी मद्य प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर विषारी मद्यप्राशनामुळे आजारी पडलेल्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावेत. सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये यांच्या परिसरात मद्य आणि गांजा यांची विक्री होते. त्यामुळे प्रत्येक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय येथे पोलिसांची गस्त वाढवावी. विषारी मद्यप्राशनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मुलांचे पालनपोषण, शिक्षण आणि औषधोपचार यांचे दायित्व प्रशासनाने घ्यावे आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना महेंद्र सावंत, संदेश पटेल, सदा सावंत, अशोक कांबळे आदी उपस्थित होते.