मुंबई – मुंबईतील पवई भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये शिकणार्या दर्शन सोळंकी याची आत्महत्या जातीभेदामुळे झालेली नाही. शैक्षणिक कामगिरी हे दर्शन याच्या आत्महत्येचे कारण असल्याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. १२ फेब्रुवारी या दिवशी वसतीगृहाच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून दर्शन याने आत्महत्या केली.
दर्शन मूळचा कर्णावती (अहमदाबाद) येथील रहाणार असून ‘केमिकल इंजिनीअरिंग’च्या पहिल्या वर्षात शिकत होता. ११ फेब्रुवारी या दिवशी परीक्षा झाल्यावर दुसर्या दिवशी त्याने आत्महत्या केली. या वेळी मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधील ‘आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल’ या संघटनेने पत्रक काढून अनुसूचित जाती-जमातींमधील विद्यार्थ्यांसमवेत भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. या संघटनेने दर्शन याच्या आत्महत्येच्या अन्वेषणाची मागणी केली होती. यावर मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडून १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. पोलिसांकडूनही दर्शन याच्या आत्महत्येविषयी अन्वेषण चालू आहे.