पुणे – कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश निवडणूक अधिकार्यांनी दिला आहे. या मतदारसंघात ‘भाजप’चे हेमंत रासने, तर ‘मविआ’चे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये खरी लढत झाली. त्यात धंगेकर विजयी झाले आहेत. या निवडणुकीमध्ये ‘बिग बॉस’ विजेता अभिजित बिचुकले आणि ‘हिंदु महासभा’चे आनंद दवे यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. अनामत रक्कम वाचवण्याकरिता वैध मतांच्या १/६ पेक्षा अधिक मते मिळणे आवश्यक आहे. तथापि बिचुकले यांना ४७, तर दवे यांना २६६ मते मिळाली. त्यामुळे १६ पैकी १४ जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण २६ उमेदवारांनी अर्ज प्रविष्ट केले होते, त्यांपैकी २४ जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनाही आपली अनामत रक्कम राखण्यात यश मिळाले नाही.