गडांवरील इस्‍लामी अतिक्रमण नियोजितच !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केलेले षड्‍यंत्र

महाराष्‍ट्रातील बहुतांश गडांवर एखादी मजार, थडगी किंवा दर्गे आढळून येतात. महाराष्‍ट्रात ३५० हून अधिक गड-दुर्ग आहेत. यांतील तुरळक दुर्ग इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी निर्माण केले आहेत; परंतु मोगलांनी निर्माण केला, असा एकही गड किंवा दुर्ग महाराष्‍ट्रात नाही. मग मजार, थडगी किंवा दर्गे कुठून आले ? हा विषय विचारास प्रवृत्त करणारा आहे. गड-दुर्गांवरील अतिक्रमणाचे वृत्त संकलित करतांना त्‍यामध्‍ये काही साम्‍य असल्‍याचा, तसेच महाराष्‍ट्रातील अनेक गडांवर अशा प्रकारे अतिक्रमण झाल्‍याचा धक्‍कादायक प्रकार लक्षात आला. गड-दुर्ग यांवरील इस्‍लामीकरणाचे हे नियोजनबद्ध षड्‍यंत्र दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रथम उघड करून त्‍याची क्रमश: वृत्तमाला यापूर्वी प्रसिद्ध केली होती. हे षड्‍यंत्र कसे नियोजनबद्धरित्‍या चालू आहे, याविषयी या लेखाच्‍या माध्‍यमातून देत आहोत.

अतिक्रमणाची वृत्तमाला ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध करून षड्‍यंत्र उघड केले. यानंतर काही वृत्तपत्रांमध्‍ये याविषयीची वृत्ते प्रसिद्ध झाली. ११ जानेवारी २०२२ या दिवशी गड-दुर्गांवरील अतिक्रमणाविषयी भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, राष्‍ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केंद्रीय संस्‍कृती राज्‍यमंत्री अर्जन राम मेघवाल यांची भेट घेतली. केंद्रीय पथकाने महाराष्‍ट्रातील गड-दुर्गांवरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्‍याचे ठरवले.

श्री. प्रीतम नाचणकर

‘शिवरायांचा मुसलमानांना विरोध नव्‍हता’ – सर्व कसे नियोजनबद्ध !

महाराष्‍ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुसलमानांना विरोध नव्‍हता. शिवरायांच्‍या सैनिकांमध्‍ये मुसलमान होते’, हा विचार जाणीवपूर्वक रुजवून शिवरायांच्‍या सैनिकांतील काही मुसलमान सैनिकांच्‍या नावांची सूची दाखवली जात आहे. ज्‍या संभाजी ब्रिगेडने कधी ‘औरंगाबाद’चे नाव ‘संभाजीनगर’ करण्‍याची मागणी केली नाही, शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, या चित्राला तत्‍कालीन काँग्रेस सरकारच्‍या काळात अघोषित बंदीला विरोध केला नाही, अशा संभाजी ब्रिगेडने हा विचार पसरवला. जातीयवादी, पुरोगामी, मार्क्‍सवादी मंडळी याचे दाखले देतात. शिवरायांची प्रतिमा ‘सर्वधर्मसमभाव मानणारी’, तसेच ‘मुसलमानप्रेमी’ दाखवणे हा हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या इस्‍लामीकरणाचा पहिला प्रयत्न ! गड-दुर्गांच्‍या इस्‍लामीकरणाची प्रक्रियाही त्‍याचाच भाग आहे.

लोहगड हे इस्‍लामचे धार्मिक स्‍थळ होण्‍याच्‍या मार्गावर !

काही वर्षांपूर्वी हुसैन बाबा शेख नावाच्‍या व्‍यक्‍तीने लोहगडावर अवैधरित्‍या थडगे बांधले. शिवसैनिक असल्‍याचे सांगून त्‍याने गडावर छोटे-मोठे उपक्रम चालू केले. थडग्‍याजवळ एका वृद्ध फकिराला बसवले. तेथे ‘हाजी हजरत उमरशहावली बाबा (रहें) ट्रस्‍ट’च्‍या वतीने उरूस चालू केला. उरूसाच्‍या दिवशी गडाच्‍या आजूबाजूच्‍या गावांतील हिंदूंना मटणाचे जेवण, तसेच मद्य देणे चालू केले. सद्यस्‍थितीत थडग्‍यावर दर्गा बांधला जात आहे. हुसैन बाबा शेख याचा वर्ष २०२२ मध्‍ये कोरोनाच्‍या काळात मृत्‍यू झाला; मात्र भविष्‍यात दर्गा झाल्‍यास विशाळगड, मलंगगड, शिवडी गड यांप्रमाणे लोहगड हाही इस्‍लामचे धार्मिक स्‍थळ होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याविषयीचे सविस्‍तर वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्‍यात आले. धक्‍कादायक गोष्‍ट म्‍हणजे हुसैन बाबा शेख ज्‍या ट्रस्‍टच्‍या नावाने गडावर उरूस साजरा करत होता, तो ‘हाजी हजरत उमरशावली बाबा (रहें) ट्रस्‍ट’ वक्‍फ मंडळाची मालमत्ता आहे.

गडांचे इस्‍लामीकरण करण्‍याच्‍या पद्धतीतील साम्‍य !

लोहगडाप्रमाणे अन्‍यही गडांवरही अतिक्रमण झाले आहे. त्‍या पद्धतींमध्‍ये साम्‍य आढळले. लोहगडावरील अतिक्रमणाचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केले. त्‍याच कालावधीत रायगडावरील एका दगडाला हिरवा रंग देऊन त्‍यावर हिरवी चादर चढवल्‍याचे वृत्त वृत्तपत्रांमध्‍ये प्रसिद्ध झाले. कोल्‍हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांनी याविषयी पत्र पाठवल्‍यावर पुरातत्‍व विभागाने रायगडावरील हिरवी चादर हटवली. त्‍याच वेळी कुलाबा गडावरही थडगे बांधण्‍यात आल्‍याचा संदेश सरखेल कान्‍होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांनी त्‍यांच्‍या ‘फेसबूक’ खात्‍यावरून प्रसारित केला.

याविषयी अधिक माहिती घेतली असता काही वर्षांपूर्वी कुलाबा गडावर थडगे बांधून चादर चढवण्‍यात आली होती. तेथे दगड रचण्‍यात आले होते. वर्ष २०२१ मध्‍ये तेथे थडग्‍याचे सिमेंटचे पक्‍के बांधकाम करण्‍यात आल्‍याने त्‍यावर चादर चढवण्‍यासाठी मुसलमान येतात. लोहगड, रायगड आणि कुलाबा या गडांवरील अतिक्रमण दर्गा बांधण्‍यापर्यंत पोचले आहे. कुलाबा गडावर मजार बांधून त्‍यावर चादर चढवण्‍यात येत आहे. याविषयीचे वृत्तही ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध केले होते.

मलंगगड, दुर्गाडी गड, श्री गणेश-पार्वती गड आदी विविध गडांवरील अतिक्रमणाच्‍या पद्धतींमध्‍ये साम्‍य !

श्री नाथपंथीय साधूंच्‍या समाधी असलेल्‍या मलंगगडावर प्रथम प्रार्थनास्‍थळ निर्माण करून सद्यस्‍थितीत मलंगबाबांच्‍या समाधीवरच दर्गा बांधण्‍यात आला आहे. त्‍यामुळे हिंदूंना दर्ग्‍यात जाऊन समाधीला नमस्‍कार करावा लागतो. सद्यस्‍थितीत हे समाधीस्‍थळ आणि मलंगगड हे वक्‍फ मंडळाची मालमत्ता असल्‍याचा दावा मुसलमानांनी केला आहे. कल्‍याणमधील दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर हे मशीद असल्‍याचा दावा स्‍थानिक मुसलमानांनी केला आहे. ठाणे जिल्‍ह्यातील गणेश-पार्वती पर्वताच्‍या टोकावर ९ थडगी बांधून मुसलमानांनी हिरव्‍या चादरी चढवल्‍या. अशा प्रकारे राज्‍यात विशाळगड, चंदन-वंदन गड आदी गड-दुर्गांवर इस्‍लामी अतिक्रमण होत आहे.

 हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वावरही घाला !

शिवरायांना मुसलमानप्रेमी दाखवायचे आणि त्‍यांनी निर्माण केलेले गड-दुर्ग यांना इस्‍लामची स्‍थाने दाखवायचे. छत्रपतींनी महाराष्‍ट्रात येणार्‍या इस्‍लामी संकटांना रोखण्‍यासाठी आयुष्‍यभर लढा दिला, तरीही त्‍यांना सर्वधर्मसमभाव असलेले आणि मुसलमानप्रेमी दाखवण्‍याचा प्रयत्न केला जातो. हिंदू जेव्‍हा लढण्‍यासाठी उभा रहातो, तेव्‍हा तो छत्रपतींचा आदर्श डोळ्‍यांपुढे ठेवून धर्मांधांना प्रत्‍युत्तर देऊ शकतो. हिंदूंच्‍या शक्‍तीस्रोतालाच जर मुसलमानप्रेमी दाखवले, तर हिंदूंचे क्षात्रतेज आपोआप नष्‍ट होईल. क्षात्रतेज नष्‍ट झालेल्‍या हिंदूंना अस्‍तित्‍वहीन करणे सोपे होईल. त्‍यामुळे गड-दुर्ग यांच्‍या इस्‍लामीकरणाचा घाला केवळ दगड-मातीच्‍या भूमीवरील नव्‍हे, तर हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वावर आहे, हे प्रथम हिंदूंनी लक्षात घ्‍यावे आणि गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणाच्‍या विरोधात वेळीच संघटित व्‍हावे.

– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई