उत्तरप्रदेशातील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार आणि पोलीस कर्मचारी यांची हत्या

  • कुख्यात गुंड आतिक अहमद यांच्यासह ७ जणांवर गुन्हा नोंद !

  • आतिकची पत्नी आणि मुले यांचा समावेश

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे वर्ष २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस कर्मचारी यांच्या हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड आतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, आतिकची पत्नी शाईस्ता आणि त्यांची २ मुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही मुलांसह ७ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले असून पत्नी शाईस्त हिची चौकशी करण्यात येत आहे. आतिक आणि अश्रफ कारागृहात अटकेत आहेत. भाजपच्या अल्पसंख्यांक शाखेचा जिल्हाध्यक्ष राहिल हसन यालाही पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.

२४ फेब्रुवारी या दिवशी उमेश पाल हा राजू पाल हत्याकांडाच्या प्रकरणी न्यायालयात साक्ष देऊन पोलीस संरक्षणात चारचाकी वाहनातून जात असतांना गाडी थांबवून अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार करत हत्या केली. यात पोलीसही ठार झाला. उमेश पाल यांचा वाहनचालक प्रदीप शर्मा याची भूमिकाही पोलीस संशयास्पद मानत आहेत. पोलिसांनी रात्री उशीरा प्रदीपची चौकशी चालू केली आहे. हत्येच्या घटनेनंतर प्रदीप पळाला होता. या हत्येचे सीसीटीव्ही चित्रण सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.