कोल्हापूर येथील कणेरी मठ ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ या उपक्रमातून पंचमहाभूतांविषयी जनजागृती करत असणे आणि अशीच जागृती सनातन संस्था तिच्या ‘भक्तीसत्संगां’तून साधकांमध्ये करत असणे 

‘कोल्हापूर येथील कणेरी मठाचे संत प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी त्यांच्या मठात ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ हा २०.२.२०२३ पासून ७ दिवसांचा उपक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये ते पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांविषयी लोकांच्या मनात जागृती करत आहेत. हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. सध्या जगभरच पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. तसेच प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे भूकंप, भूस्खलन, जंगलातील वणवा, दुष्काळ, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती लोकांवर ओढवत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘पंचमहाभूत लोकोत्सवात’ जनजागृती केली जात आहे. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे, शेतीस प्रोत्साहन देणे इत्यादी गोष्टी सांगितल्या जात आहेत. पंचतत्त्वातील प्रत्येक तत्त्वावर एकेका दिवशी प्रबोधन केले जात आहे. या उपक्रमामध्ये काही साधू-संतही सहभागी होत आहेत. तसेच राजकारण्यांनाही या उपक्रमाचे महत्त्व समजल्याने तेही सहभागी होत आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

दीड वर्षापूर्वी ‘सनातन संस्थे’ने प्रत्येक आठवड्याच्या भक्तीसत्संगात ‘पंचमहाभूतांचे माहात्म्य’ या विषयावर भक्तीसत्संग-शृंखला आयोजित केलेली असणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने ‘सनातन संस्था’ गेल्या ६ वर्षांपासून प्रत्येक आठवड्याला गुरुवारी २ घंट्यांचा ‘भक्तीसत्संग’ देशभरातील साधकांसाठी आयोजित करत आहे. हे भक्तीसत्संग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या घेतात. दीड वर्षापूर्वी ३.६.२०२१ ते ३०.९.२०२१ या ३ मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत पंचमहाभूतांवरच भक्तीसत्संग आयोजित केले होते. यामध्ये प्रत्येक महाभूताचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवले होते. ‘प्रत्येक महाभूताचा आपल्यावर रोष ओढवला, तर कोणकोणत्या आपत्ती येतात ?’, ‘प्रत्येक महाभूताविषयी भाव कसा ठेवायचा ?’ इत्यादी सूत्रे त्यांमध्ये सांगितली होती. महत्त्वाचे म्हणजे आपण साधना केली आणि धर्मपालन केले, तर आपोआपच आपण निसर्गाची काळजी घेतो. सध्या याचाच लोकांमध्ये अभाव असल्याने निसर्गाची अवकृपा होत आहे. साधनेमुळे आपल्यात सत्त्वगुण आल्याने आपण चुकीच्या, अधर्म होईल अशा कृती करत नाही. त्यामुळे निसर्गाची आपल्यावर आपोआपच कृपा होते. अशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर भक्तीसत्संगात विचार मांडले होते.

या दोन्ही उदाहरणांवरून असे लक्षात येते की, सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२३)