राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि परिवाराचा घोटाळा ५०० कोटी रुपयांहून अधिक ! – किरीट सोमय्‍या

किरीट सोमय्‍या

कोल्‍हापूर, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि परिवाराचा १५८ कोटी रुपयांचा घोटाळा प्रत्‍यक्षात ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्‍या यांनी दिली. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्‍या घोटाळ्‍याची माहिती घेण्‍यासाठी किरीट सोमय्‍या हे कोल्‍हापूर येथे आले होते. तेव्‍हा त्‍यांनी प्रसिद्धी माध्‍यमांशी संवाद साधला.

ते पुढे म्‍हणाले की, हसन मुश्रीफ आणि त्‍यांच्‍या परिवाराने केलेल्‍या घोटाळ्‍यांमध्‍ये नवनवीन तथ्‍य समोर येत आहेत. मी कोल्‍हापूर विभागीय सहाय्‍यक निबंधक आणि कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेची भेट घेणार आहे. गरीब शेतकरी बांधवांना लुटण्‍यासाठी मुश्रीफ यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेलाही सोडले नाही. मुश्रीफ यांना याचे उत्तर द्यावेच लागेल.

किरीट सोमय्‍या येणार असल्‍यामुळे साखर कारखाना परिसर आणि कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक परिसर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता.