(म्हणे) ‘काश्मीरचे मूळनिवासी नसणार्‍यांना येथे राहू देणार नाही !’ – अल्ताफ बुखारी, ‘जम्मू अँड कश्मीर अपनी पार्टी’ पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

‘जम्मू अँड कश्मीर अपनी पार्टी’ पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांची धमकी !

अल्ताफ बुखारी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जे जम्मू-कश्मीरचे मूळनिवासी नाहीत, अशा कोणत्याही व्यक्तीला आम्ही येथे राहू देणार नाही. त्याच्या सुरक्षेसाठी कितीही बंदोबस्त ठेवला, तरी आम्ही ते होऊ देणार नाही, अशी धमकी ‘जम्मू अँड कश्मीर अपनी पार्टी’ पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांनी एका सभेत दिली.

१. बुखारी पुढे म्हणाले की, ही भूमी आमची आहे आणि यावर जम्मू-काश्मीरमधील लोकांचा अधिकार आहे. जर कुणाला असे वाटत असेल की, ते बाहेरील लोकांना आणून येथे वसवतील, तर आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, अशीही धमकी त्यांनी दिली.

२. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची खिल्ली उडवतांना बुखारी म्हणाले की, आम्ही ती जमात नाही, जी अन्यत्र जाऊन नाटक करू. येथे (काश्मिरी हिंदूंसाठी) बांधण्यात आलेल्या निवासी संकुलांचे काय करायचे, त्याचा निर्णय येथे निवडून आलेले सरकार घेईल, आम्ही घेऊ.

संपादकीय भूमिका 

काश्मीर काय बुखारी यांची व्यक्तीगत संपत्ती आहे का ? काश्मीरच्या रक्षणासाठी, विकासासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाने त्याग केलेला आहे ! अशा प्रकारचे विधान करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !