‘माघ शुक्ल चतुर्दशी (४.२.२०२३) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोजकुमार खाडये यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. वैदेही खाडये हिला तिच्या आई-बाबांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. मनोजकुमार खाडये यांना ५५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. मुलीवर लहानपणापासूनच साधनेचे संस्कार करणे
अ. आई-बाबांनी माझ्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार करून माझ्यात साधनेविषयी गोडी निर्माण केली.
आ. ते मला लहानपणापासून नियमित नामजप करायला सांगायचे. त्यांनी मला वेळोवेळी नामजपाचे महत्त्व सांगून माझ्यात नामजप करण्याची गोडी निर्माण केली. बाबा मला लहानपणी आरती ऐकवून झोपवायचे. आई आणि आजी (कै. श्रीमती नलंदा वसंत खाडये, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) मला नियमित त्यांच्या समवेत स्तोत्रपठण करायला सांगत असत.
इ. मी लहान असतांना आई तिच्या समवेत मलाही आश्रमात नेत होती. ती काही वेळा मला आश्रमात रहायला पाठवायची. त्यामुळे माझ्यात लहानपणापासूनच आश्रम जीवनाविषयी ओढ निर्माण झाली.
२. प्रेमभाव
बाबा बाहेरगावी सेवेत कितीही व्यस्त असले, तरीही ते घरी येतांना आठवणीने माझ्यासाठी मला आवडणारा खाऊ घेऊन येतात.
३. मुलीमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्नशील असणे
आई-बाबांनी मला वेळोवेळी व्यष्टी साधनेत साहाय्य करून माझ्यात व्यष्टी साधनेविषयी गांभीर्य निर्माण केले. आई मला माझ्या चुकांची वेळोवेळी जाणीव करून देते. बाबा बाहेर असतांना मला नियमित भ्रमणभाष करतात आणि माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांविषयी विचारपूस करतात.
४. भाव
४ अ. सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या प्रती भाव : आई-बाबा आत्याशी (सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांच्याशी) बोलतांना आई-बाबांच्या बोलण्यात एक प्रकारचा आदर आणि नम्रता असते. ‘सद़्गुरु ताई जे सांगतील, त्याचे आपण लगेच आज्ञापालन करायचे’, असे ते मला सांगतात.
४ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून समवेत असतात’, असा भाव असणे : माझे बाबा सेवेनिमित्त बाहेरगावी जातात. बाबा बाहेरगावी गेल्यावर पूर्वी मला घरी रहायला भीती वाटत असे. तेव्हा आई मला ‘तुझे बाबा गुरुसेवा करायला जातात आणि ते घरी नसतांना डॉक्टर बाबाच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आपल्या समवेत घरी असतात’, असे सांगून धीर देत असे. ‘आईच्या माध्यमातून गुरुमाऊली सतत माझ्या समवेत आहे’, असे मला जाणवते.
गुरुराया, आपल्या कृपेने माझा सद़्गुरु स्वातीताई (आत्या) आणि प्रेमळ आई-बाबा असणार्या साधक कुटुंबामध्ये जन्म झाला. आपणच माझ्यावर साधनेचे संस्कार करून मला घडवले. आपण मला या सर्वांच्या सहवासात ठेवून आनंद देत आहात. त्याबद्दल मी आपल्या श्रीचरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवा, आपली कृपा मला अशीच सतत अनुभवता येऊ दे. मला आपल्या चरणी लीन होता येऊ दे’, हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना आहे.’
– कु. वैदेही मनोजकुमार खाडये (मुलगी, आध्यात्मिक पातळी ५४ टक्के, वय १६ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (२३.१.२०२३)