छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आपल्‍याला समोर ठेवावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या धारातीर्थ यात्रेसाठी ८५ सहस्रांहून अधिक धारकर्‍यांची उपस्‍थिती !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

जुन्‍नर (जिल्‍हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्‍वराज्‍यासाठी २८९ लढाया केल्‍या, तर छत्रपती संभाजी महाराज यांनी १३४ लढाया केल्‍या. या दोघांनी हिंदवी स्‍वराज्‍य निर्माण करण्‍यासाठी सर्वस्‍व दिले. तरी यापुढील काळात या पिता-पुत्रांचा आदर्श समोर ठेवूनच आपल्‍याला मार्गक्रमण करावे लागेल, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या धारातीर्थ मोहिमेच्‍या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ही मोहीम ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर ते दुर्ग शिवनेरी’ अशी पार पडली. या प्रसंगी ८५ सहस्रांहून अधिक धारकरी उपस्‍थित होते.

विशेष

१. गडकोट मोहिमेच्‍या मार्गावर ठिकठिकाणी स्‍वागत करण्‍यासाठी रांगोळ्‍या काढण्‍यात आल्‍या होत्‍या.

२. या मोहिमेच्‍या निमित्ताने महाराष्‍ट्राच्‍या कानाकोपर्‍यातून तरुण सहभागी झाले होते. या निमित्ताने राष्‍ट्रकार्यासाठी घडणे म्‍हणजे काय ? हे प्रत्‍येकाने अनुभवले.

३. समारोपप्रसंगी झालेल्‍या प्रसादासाठी साडेचार टन तांदूळ लागला.

प्रत्‍येकाने ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ पाळणे आवश्‍यक !

 

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान केले. त्‍यांच्‍या बलीदानाचे स्‍मरण करण्‍यासाठी प्रत्‍येकाने बलीदान मास पाळणे आवश्‍यक आहे. या काळात पायात चप्‍पल न घालणे, गादीवर न झोपणे, तसेच आपल्‍या प्रत्‍येकाला ज्‍या ज्‍या गोष्‍टींचा त्‍याग करता येणे शक्‍य आहे, त्‍या गोष्‍टींचा त्‍याग करणे आवश्‍यक आहे. १३४ ग्रामपंचायतींमध्‍ये असा बलीदान मास होणे आवश्‍यक आहे, असे आवाहन पू. भिडेगुरुजी यांनी या वेळी केले.