‘मराठी’चा जागर अपेक्षित !

अत्‍यंत विपुल आणि समृद्ध परंपरा लाभलेल्‍या मराठी भाषेतील ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनास आजपासून वर्धा येथे प्रारंभ

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत ‘माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके।’, असे गौरवोद़्‍गार काढलेल्‍या, अत्‍यंत विपुल आणि समृद्ध परंपरा लाभलेल्‍या मराठी भाषेतील ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनास आजपासून वर्धा येथे प्रारंभ होत आहे. २३ एकराच्‍या परिसरातील ६ अतीभव्‍य असे सभामंडप हे यंदाच्‍या संमेलनाचे वैशिष्‍ट्य आहे. संमेलनाचे मुख्‍य प्रवेशद्वार ८३ बाय ३५ फुटांचे असून मुख्‍य सभामंडपात ७ सहस्र ५०० आसंद्यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. प्रारंभी काही सहस्र, मग काही लाख आणि आता काही कोटी रुपयांच्‍या घरात संमेलनांचा व्‍यय पोचला आहे.

संतसाहित्‍याला प्राधान्‍य हवे !

अखिल भारतीय साहित्‍य महामंडळाच्‍या ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’, ‘महाराष्‍ट्र साहित्‍य परिषद पुणे’, ‘विदर्भ साहित्‍य संघ’, ‘मराठवाडा साहित्‍य परिषद औरंगाबाद’ या चारही घटकसंस्‍थांमध्‍ये कोणत्‍याच प्रकारचा ताळमेळ नसतो, तसेच त्‍यांचे एकमेकांशी पटतही नाही. याचा परिणाम असा होतो की, वर्षभर कोणते उपक्रम राबवायचे, याविषयी कुणाचेच एकमत होत नाही. त्‍यामुळे ठोस असे उपक्रमच राबवले जात नाहीत. राज्‍यात मराठी भाषाभवनाची उभारणी तर दूरच; पण दुसरीकडे ‘उर्दू भवन’ जिल्‍ह्याजिल्‍ह्यांत उभे रहात आहेत, याविषयी अखिल भारतीय साहित्‍य महामंडळास ना खंत वाटते ना त्‍यासाठी काही प्रयत्न होतात !

महाराष्‍ट्र ही संतांची भूमी आहे. येथे विपुल प्रमाणात संतांची शब्‍दरूपी संपदा आहे. अशा संतांचे विचार, त्‍यांचे चरित्र, त्‍यांची शिकवण अभ्‍यासक्रमात शिकवली जात नाही. त्‍यासाठी साहित्‍य संमेलनात ठराव करून सातत्‍याने शासनस्‍तरावर पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. सध्‍या मराठी भाषेविषयी सर्वच स्‍तरांवर अनास्‍था जाणवते. त्‍यासाठी भाषाशुद्धीची चळवळ उभारून त्‍यात प्रत्‍येक घटकाला कृतीप्रवण करणार्‍या वार्षिक कार्यक्रमांची आखणी व्‍हायला हवी. अनेक जिल्‍ह्यांत मराठी शाळांची दुरवस्‍था असून इमारतींची स्‍थिती बिकट असणे, पुरेशा संख्‍येने शिक्षक नसणे, अन्‍य आवश्‍यक सुविधांचा अभाव अशा अडचणींना शाळांना सामोरे जावे लागत आहे. अशा समस्‍यांना संमेलनात वाचा फोडून त्‍यांच्‍या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न होणे अपेक्षित आहे. सध्‍याची युवा पिढी मराठी साहित्‍याच्‍या वाचनापासून दूर चालली आहे. विविध प्रकारची पुस्‍तके, ग्रंथ विकत घेऊन, ग्रंथालयात जाऊन वाचणे याही गोष्‍टी अल्‍प होत आहेत. युवा पिढी परत वाचनाकडे कशी वळेल, या दृष्‍टीने प्रयत्न होण्‍यासाठी साहित्‍य संमेलनात ऊहापोह होणे आवश्‍यक आहे.

मराठीच्‍या उत्‍थानाची भूमिका नाही !

जेव्‍हा जेव्‍हा मराठीवर आघात होणार्‍या घटना घडतात, तेव्‍हा तेव्‍हा मराठी साहित्‍य संमेलनातून ठाम भूमिका घेणे आवश्‍यक असते. असे न होता ज्‍वलंत प्रश्‍नांवर चर्चा न करता संमेलने गेल्‍या काही वर्षांपासून केवळ पलायनवादी भूमिका स्‍वीकारत आहेत. सध्‍याची संमेलने एकप्रकारे पुरोगामी, विद्रोही विचारांना बळ कसे मिळेल ?, अशी बोटचेपी भूमिका घेत आहेत. जेव्‍हा काही वर्षांपूर्वी साहित्‍य संमेलनाच्‍या आरंभी सरस्‍वतीपूजन करण्‍यास विरोध झाला, तेव्‍हाच व्‍यासपिठावरून ‘सरस्‍वतीपूजन होणारच’, असे ठणकावून सांगणे अपेक्षित होते; मात्र असे झाले नाही. मराठीच्‍या भाषाशुद्धीसाठी आग्रही असलेले आणि कारागृहातील प्रतिकूल स्‍थितीतही भिंतींवर महाकाव्‍य कोरणारे महान साहित्‍यिक असलेले स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्‍हणून हिणवले गेले, तेव्‍हाही संमेलनातून कोणतीच भूमिका घोषित करण्‍यात आली नाही. इतकेच काय, तर ९१ व्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष लक्ष्मीकांत देशमुख २५० साहित्‍यिकांना घेऊन स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांच्‍या ‘भारत जोडो’ यात्रेत जाऊन त्‍यांना भेटले आणि त्‍यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्‍या व्‍यक्‍तींना महत्त्वाची पदे देणार्‍या संमेलनाकडून मराठीच्‍या उत्‍कर्षाची काय अपेक्षा ठेवणार ? लक्ष्मीकांत देशमुख यांनीच नक्षलवादी चळवळीचे उदात्तीकरण करणार्‍या आणि हिंसेचे समर्थन करणार्‍या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’सारख्‍या पुस्‍तकाचा अनुवाद करणार्‍या अनघा लेले यांच्‍या समर्थनार्थ भाषा सल्लागार समितीचे त्‍यागपत्र दिले आहे, हेही दुर्लक्षण्‍यासारखे नाहीच !

ग्रंथप्रदर्शनांसाठी भरमसाठ शुल्‍क !

साहित्‍य संमेलनांमध्‍ये जी ग्रंथप्रदर्शने भरवण्‍यात येतात, त्‍या प्रदर्शनांच्‍या कक्षांसाठी प्रकाशकांकडून भरमसाठ शुल्‍क आकारण्‍यात येते. त्‍यामुळे असे शुल्‍क केवळ मोठ्या प्रकाशकांनाच परवडते. जे खरोखर दर्जेदार साहित्‍य देऊ शकतात; मात्र भरमसाठ शुल्‍क देऊ शकत नाहीत, असे लेखक, साहित्‍यिक, प्रकाशन संस्‍था संमेलनस्‍थळी येण्‍यापासून वंचित रहातात. प्रकाशन संस्‍थांना संमेलनस्‍थळी पुरेशा सोयीही उपलब्‍ध करून दिल्‍या जात नाहीत. प्रत्‍येक वेळी भव्‍य-दिव्‍य, नवीन असे करण्‍याच्‍या अट्टाहासाचे गेल्‍या काही दशकांमधील मराठी साहित्‍य संमेलन त्‍याच्‍या मूळ हेतूपासून भरकटत आहे. या संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्‍यिक हे केंद्रस्‍थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्‍यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्‍य संमेलने, असे त्‍याला स्‍वरूप प्राप्‍त होत आहे. ‘खर्‍या अर्थाने मराठीच्‍या उत्‍थानासाठी प्रयत्न झाले, तरच त्‍या साहित्‍य संमेलनाचे फलित झाले’, असे म्‍हणावे लागेल; अन्‍यथा ‘तो एक मौजमजेचा आणि दिखाऊपणाचा वार्षिक उत्‍सव झाला’, असेच म्‍हणावे लागेल. साहित्‍य संमेलनांतून मराठीच्‍या उत्‍थानाच्‍या दृष्‍टीने प्रयत्न होण्‍यासाठी आता सामान्‍य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संयोजक, आयोजक यांना भाग पाडावे आणि संमेलनाचा मूळ गौरव प्राप्‍त होईपर्यंत पाठपुरावा करावा !

साहित्‍य संमेलनांतून मराठीच्‍या उत्‍थानाच्‍या दृष्‍टीने प्रयत्न होण्‍यासाठी मराठीजनांनीच पुढाकार घेणे आवश्‍यक !