अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माहितीपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नाही !

आयोजकांचे अजब स्पष्टीकरण, तर स्वागताध्यक्षांनी दायित्व झटकले !

मुंबई – वर्ष २०२५ मध्ये ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी या कालावधीत देहली येथे होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून संमेलनाचे आयोजन पुणे येथील ‘सरहद’ संस्थेने केले आहे. १९ डिसेंबर या दिवशी स्वागताध्यक्ष शरद पवार आणि आयोजक संजय नहार यांनी पत्रकार परिषद घेतली; पण त्या वेळी संमेलनाच्या माहितीपत्रिकेवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र नसल्याने वाद निर्माण झाला.

या पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी.डी. देशमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची छायाचित्रे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र न घेण्याविषयी आयोजक संजय नहार म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात २ वैचारिक गट होते, जहाल आणि मवाळ. मवाळ गटाचे गोपाळकृष्ण गोखले आणि जहाल गटाचे लोकमान्य टिळक यांची छायाचित्रे घेण्यात आली. त्यामुळे त्यात सावरकर यांचे छायाचित्र नाही.’’ ‘आमची भूमिका केवळ आयोजनाची असून अन्य विषयांचे दायित्व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आहे’, असे शरद पवार यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अवहेलनाच ! 

देहलीतील संमेलनाचे प्रवेशद्वार, सभागृह किंवा व्यासपीठ यांनाही सावरकर यांचे नाव देण्यात आलेले नाही. वर्ष २०२१ मध्येही नाशिक येथे सभामंडपाला सावरकर यांचे नाव दिलेले नव्हते. खरेतर भगूर (नाशिक) हे त्यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे सभामंडपाला त्यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी केली होती. वर्ष २०२० मध्ये धाराशिव येथे झालेल्या संमेलनाआधी भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाने प्रशिक्षण शिबिरात सावरकरांविषयी आक्षेपार्ह टिपणी असलेली पुस्तिका वाटण्यात आली होती. त्या वेळी ‘संमेलनात पुस्तिकेच्या निषेधाचा ठराव घ्यावा’, अशी मागणी राष्ट्रप्रेमींनी केली होती; पण ‘असा ठराव घेतल्यास आम्ही साहित्य संमेलनाचा निषेध करू’, अशी धमकी काँग्रेसने दिली होती.

संपादकीय भूमिका

सावरकरप्रेमींनीच याविरोधात संघटितपणे एकत्र यायला हवे !