जॉर्जियामध्ये फूटबॉलपटू मिखाइल कोवेलाशविली यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावर जॉर्जियामध्ये वातावरण तापले आहे. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर जे १५ देश बाहेर पडले, त्यांतील जॉर्जिया हा एक देश. रशियाशी काडीमोड झाल्यानंतर बेलारूससारख्या देशांनी त्याच्याशी जुळवून घेण्याचा मुत्सद्दीपणा दाखवला; मात्र लिथुआनिया, लॅटविया, जॉर्जिया, युक्रेन आदी देशांनी रशियाची दादागिरी नाकारत पाश्चात्त्य देशांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील ३३ वर्षे या देशांची रशियाशी धुसफूस चालू आहे. याचा फटका जॉर्जियालाही बसला आहे. जॉर्जिया समाजातील एक गट ‘देशाने युरोपियन संघात सहभागी होऊन रशियाच्या बेड्या झुगारून द्याव्यात’, या मताचा आहे. मावळत्या राष्ट्रपती सलोमे झौरबिचविली यांच्या कार्यकाळात जॉर्जियाचे पाश्चात्त्य देशांशी असलेले संबंध अधिक फुलले. त्यांच्या काळात जॉर्जियाला युरोपियन युनियनचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याच्या सूत्रावर शिक्कामोर्तब झाले होते; मात्र काही गोष्टींमुळे माशी शिंकली गेली आणि युरोपियन युनियनने जॉर्जियाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. आता रशियाच्या बाजूने झुकलेली ‘जॉर्जियन ड्रीम पार्टी’ सत्तेवर आली आहे. त्यामुळे युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न भंगल्याने हताश झालेले लोक रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. त्यात सत्ताधारी जॉर्जियन ड्रीम पार्टीने कट्टर उजवे, पाश्चात्त्यविरोधी आणि रशियाधार्जिणे कोवेलाशविली यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांना समाजातील काही गटांचा विरोध होऊ लागला आहे. त्यातच सलोमे झौरबिचविली यांनी राष्ट्रपतीपदावरून हटण्यास नकार दिला आहे, तसेच निवडणुकीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे जॉर्जियाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
पालटती समीकरणे !
मावळत्या राष्ट्रपती सलोमे झौरबिचविली जॉर्जियन वंशाच्या फ्रेंच नागरिक होत्या. त्यांची फ्रान्सच्या मुत्सद्दी म्हणून अनेक देशांमध्ये नियुक्ती झाली होती. वर्ष २००३ मध्ये त्यांची जॉर्जियामध्ये फ्रान्सच्या मुत्सद्दी म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांचे आयुष्य पालटले. फ्रान्स-जॉर्जिया यांच्यात झालेल्या एका करारानुसार त्यांना जॉर्जियाचे नागरिकत्व देऊन देशाचे परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला. मागील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना जॉर्जियन ड्रीम पार्टीने पाठिंबा दिला होता. झौरबिचविली यांचे आयुष्य फ्रान्समध्ये गेले. त्यामुळे प्रथमपासून त्यांच्यावर पाश्चात्त्य देशांचा प्रभाव आहे. ही गोष्ट लक्षात घेता, ‘जॉर्जियाने रशियाचे प्रभुत्व नाकारून युरोपियन युनियनमध्ये सहभागी व्हावे’, असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते.
काही मासांपूर्वी जॉर्जिया संसदेमध्ये ‘फॉरेन एजंट’ कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार ज्या स्वयंसेवी संस्था विदेशी संस्थांमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक निधी घेत असतील, त्यांची ‘पाश्चात्त्य हित जपणारे’ अशी नोंदणी करण्याचे प्रावधान त्यामध्ये होते. या कायद्याला जॉर्जियन ड्रीमचा पाठिंबा होता; मात्र झौरबिचविली यांनी त्याला विरोध केला. वास्तविक हा कायदा राष्ट्रहित जोपासणारा होता; मात्र त्यांनी हा कायदा रोखण्यासाठी बराच प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. यानंतर झौरबिचविली आणि जॉर्जियन ड्रीम यांच्यात वादाची ठिणगी पडली अन् नंतर झालेल्या निवडणुकीत जॉर्जियन ड्रीम पुन्हा निवडून आली. जॉर्जियन ड्रीमचे संस्थापक आणि अब्जाधीश बिडझिना इवानिशविली यांनी निवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकण्यासाठी जोरदार प्रचार केला. ‘कोणत्याही परिस्थितीत जॉर्जियाला रशिया-युक्रेन युद्धाची झळ बसू देणार नाही’, या सूत्रावर पक्षाने निवडणूक लढवली. वर्ष २०१२ पेक्षाही या पक्षाला निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. यानंतर विरोधकांनी ‘जॉर्जियामध्ये लोकशाहीचा पराभव झाला’, वगैरे कारण सांगत जॉर्जियन ड्रीमचे यश स्वीकारण्यास नकार दिला. ‘जॉर्जियाचे भवितव्य अंधारमय होणार’, अशा आरोळ्या ठोकत जॉर्जियामध्ये विरोधी पक्ष एकत्र येत आहेत.
जॉर्जिया नवीन वाट चोखाळणार ?
बेलारूसने ‘रशिया के साथ है, तो सेफ है ।’, हे जाणले आणि त्याने त्याच्याशी हात मिळवले. यामुळे पाश्चात्त्य देशांनी त्याच्या नावाने बोटे मोडली, त्याला अनेक सुविधांना मुकावे लागले; मात्र रशियाने मोठ्या भावाची भूमिका निभावत त्याला सावरले. त्यामुळे सध्या तरी बेलारूस निवांत आहे. जॉर्जिया युरोपियन युनियनकडे झुकला, तर जे भोग युक्रेनच्या वाट्याला आले, तेच जॉर्जियाच्या वाट्याला येणार का ? युक्रेनमध्ये विनोदी कलाकार व्लोदिमिर झेलेंस्की राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पाश्चात्त्य देशांच्या आहारी जाऊन रशियाला ललकारले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे पित्त खवळले आणि त्यांनी युक्रेनवर आक्रमण करून त्याला उद्ध्वस्त केले. जॉर्जियातील एका गटाला ‘युरोपियन युनियनसमवेत गेल्यावर त्यांची चांदी होईल’, असे वाटत आहे; पण हे खरे आहे का ? युक्रेनला जेव्हा खर्या अर्थाने साहाय्याची आवश्यकता होती, तेव्हा अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी त्याला वार्यावर सोडले. त्यानंतर त्याला शस्त्रास्त्रे वगैरे पुरवून थातूरमातूर साहाय्य केले; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जॉर्जियाने असेच एकदा रशियाला गुरगुरून दाखवल्यावर त्याने अबखाझिया आणि दक्षिण ओसेशिया हे प्रांत कह्यात घेतले होते, हे विसरून चालणार नाही. त्या वेळी जॉर्जिया हात चोळत बसण्यापलीकडे काहीही करू शकला नाही. त्यामुळे जॉर्जियाने युरोपियन युनियनच्या जिवावर उड्या मारण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा भ्रमाचा भोपळा फुटायला वेळ लागणार नाही.
युक्रेनने घडवून आणलेल्या स्फोटात रशियाच्या अण्वस्त्र संरक्षण दलाचे प्रमुख जनरल इगोर किरिलोव्ह ठार झाले आहेत. यामुळे रशिया याचा कशा प्रकारे सूड उगवतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यासह जॉर्जियाही युक्रेनच्या वाटेने गेला, तर रशियाची भूमिका काय असेल, हे पहावे लागेल; कारण त्याचे जागतिक राजकारणावर निश्चित परिणाम होतील. राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर मिखाइल कोवेलाशविली यांनी त्यांच्या भाषणामध्ये ‘आम्हाला युरोपियन युनियनसह जाण्याची इच्छा आहे; मात्र आमचे राष्ट्रहित महत्त्वाचे आहे’, असे म्हणून सावध भूमिका घेतली आहे. ही सर्व परिस्थिती पहाता कोवेलाशविली देशांतर्गत विरोधासमोर झुकतात कि कठोर भूमिका घेऊन वेगळा मार्ग चोखाळतात ?, हे पहाणे भविष्यात रोचक ठरणार आहे !
अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यावर विसंबून रहाणार्या देशांची हानीच होते, हा इतिहास आहे, हे जाणा ! |