शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या मोहाली, चंडीगड येथील सौ. अमिता शर्मा (वय ६० वर्षे) !

‘सौ. अमिता शर्मा (वय ६० वर्षे) पूर्वी फरीदाबाद येथे रहात होत्या. जानेवारी २०१६ पासून त्या मोहाली, चंडीगड येथे स्थलांतरित झाल्या आहेत. साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. अमिता शर्मा

१. कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र, देहली

१ अ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : अमिताताईंनी व्यष्टी साधनेविषयीची सूत्रे जाणून घेतली आणि त्यांनी स्वभावदोष निर्मूलन अंतर्गत स्वयंसूचना बनवणेही शिकून घेतले आहे. त्यांनी व्यष्टी साधनेचा आढावा देण्यासाठी स्वतःहून विचारले आणि त्या नियमितपणे आढावा देत आहेत. प्रतिदिन होणार्‍या भावसत्संगात त्यांनी त्या करत असलेल्या भाववृद्धीसाठी प्रयोग सांगायला आरंभ केला आहे.

१ आ. गुरुसेवेची तीव्र तळमळ

१ आ १. देहलीपासून दूर अंतरावर रहात असून आणि घरातून साधनेसाठी विरोध असूनही एकटीने सेवा करणे : त्या देहलीपासून पुष्कळ दूर अंतरावर रहातात. त्यांच्या घराच्या जवळ साधक रहात नाहीत. त्यांना साधनेसाठी विरोध आहे, तरीही त्या एकटीने बाहेर जाऊन सेवा करतात. त्या मंदिरात गेल्यावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना साधना सांगतात. त्या त्यांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीही माहिती सांगतात. त्यांच्या मनात ‘मी एकटी आहे, दूर रहाते, तर कसे होणार ?’, असा विचार येत नाही.

१ आ २. गायत्री परिवाराच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांनी गायत्री परिवाराचे संचालक, पंडितजी आणि अधिवक्ता यांना पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा अंक दाखवून त्याविषयी माहिती सांगितली.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती श्रद्धा आणि भाव ! : पूर्वी अमिताताईंच्या कन्येच्या संदर्भात काही प्रसंग घडले होते. अमिताताईंना त्याचा त्रास होत असे. आता त्यांनी सर्वकाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सोपवले आहे. अमिताताईंचा ‘परात्पर गुरु डॉक्टरच सर्वकाही करतील आणि कन्येलाही सांभाळतील’, असा भाव असतो.

१ ई. अनुभूती – दैवी कण आढळणे : मागील काही दिवसांपासून अमिताताईंचे अंथरूण आणि पांघरूण यांवर दैवी कण आढळत आहेत.’

२. कु. राशी खत्री, देहली सेवाकेंद्र, देहली

२ अ. शिकण्याची वृत्ती : ‘अमिताताईंनी सेवा करायला आरंभ करण्यापूर्वी प्रत्येक सेवेतील बारकावे समजून आणि शिकून घेतले. त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत ‘भित्तीपत्रकांच्या (पोस्टर्सच्या) माध्यमातून प्रसार करणे, परिचित, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना ‘ऑनलाईन सत्संगांच्या लिंक’ पाठवणे, फलक लिखाणाची सेवा करणे’, अशा वेगवेगळ्या सेवा तप्तरतेने शिकून घेतल्या, तसेच त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विज्ञापने घेण्याच्या सेवेविषयीही सर्व माहिती समजून घेतली.

२ आ. विचारण्याची वृत्ती : त्या सेवा करण्यापूर्वी प्रत्येक सूत्र विचारून घेतात. त्यामुळे त्यांच्या सेवेत अत्यल्प चुका असतात.

२ इ. सेवेची तळमळ : एका सत्संगात ‘पाक्षिक ‘सनातन प्रभात’ची वाचकसंख्या न्यून होत आहे’, असे सांगितले. तेव्हा अमिताताईंनी ‘पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे नवीन वाचक बनवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी त्या विवाह समारंभानिमित्त त्यांच्या एका नातेवाइकांच्या घरी गेल्या होत्या. तेथे जातांना त्यांच्या मनात विचार होता, ‘तेथे आलेल्या नातेवाइकांना सनातन संस्था आणि ‘हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ यांविषयी माहिती सांगून त्यांना पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवण्याचा प्रयत्न करूया.’

२ ई. कृतज्ञताभाव : अमिताताई सेवेसंदर्भातील स्वतःचे प्रयत्न कृृतज्ञतेच्या भावाने सांगतात. त्यांच्या व्यक्तीगत जीवनात त्यांनी अनुभवलेल्या गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेबद्दल त्यांच्या मनात सतत कृतज्ञताभाव असतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ३.२.२०२२)