भोर (पुणे) येथे विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन !

भोर येथील झालेला विधवांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

भोर (जिल्हा पुणे) – येथील ‘उन्नती महिला प्रतिष्ठान’च्या वतीने संक्रांतीनिमित्त भोर शहर आणि ग्रामीण भागातील विधवांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत गंगूताई पंतसचिव वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये ३० महिलांनी सहभाग घेतला. ‘उन्नती महिला प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून संक्रांतीचे वाण म्हणून तिळगूळ आणि निरांजन देण्यात आले.

विधवांनी कुंकू लावू नये, यामागील हिंदु धर्मशास्त्र !

विवाहाच्या वेळी सौभाग्याचे प्रतीक म्हणून मंगळसूत्र, जोडवी आदी अलंकार घातले जातात, तर स्त्रीच्या कपाळावरील कुंकू हेही तिच्या सौभाग्याचेच प्रतीक असते. अलंकार घालतांना किंवा कुंकू लावतांना स्त्रीला साहजिकच तिच्या पतीचे स्मरण होत असते. पतीच्या निधनानंतर पत्नीला अलंकार घालतांना त्याचे स्मरण होऊ शकते. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित असतात’, असा अध्यात्मातील सिद्धांत आहे. पतीच्या मृत्यूत्तर प्रवासात यामुळे अडथळा येऊ शकतो. तो टाळण्यासाठी शास्त्राने केलेली ही सोयच आहे.

संपादकीय भुमिका

  • हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !
  • अन्य धर्मीय त्यांच्या प्रथा, परंपरा यांचे पालन करण्यासाठी पुढे सरसावतात; मात्र हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात न घेणारे काही जन्महिंदु हिंदु धर्मातील प्रथा परंपरांच्या विरोधात जातात, हे दुर्दैवी आहे.
  • पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या महिलांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडणे, हे स्त्रियांनी स्वतःच स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचा प्रकार आहे !
  • महान हिंदु संस्कृतीतील प्रथा आणि परंपरा का आहेत ? हे समजून त्यांचे पालन केल्यास त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो !