पुणे – ‘जी-२०’ पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा नुकताच पुणे येथे समारोप झाला. या बैठकीला १८ सदस्य देश, ८ अतिथी देश आणि ८ आंतरराष्ट्रीय संघटनांचे ६४ प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या जी-२० अध्यक्षतेअंतर्गत पायाभूत सुविधा कार्यगटाने वर्ष २०२३ साठी पायाभूत सुविधा कार्यक्रमावर चर्चा केली. या दोन दिवसांच्या बैठकीत वित्तपुरवठा, आर्थिक विकास केंद्र, शहरी पायाभूत सुविधांची उभारणी, उद्दिष्ट पूर्ण करण्यात शहरांची भूमिका, पर्यावरणदृष्ट्या सुविधांसाठी वित्तपुरवठा उपलब्धी, तसेच सामाजिक असंतुलन कमी करणे आदी अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली. कार्यशाळेमध्ये पायाभूत सुविधांवर, तसेच भविष्यातील शहरे उभारण्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमता यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या कार्यशाळेदरम्यान प्रतिनिधींना पुण्याच्या पाककृती, इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली. पायाभूत सुविधा कार्यगटाची दुसरी बैठक २८ आणि २९ मार्च २०२३ या दिवशी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् येथे होणार आहे.