सर्वोच्च नेत्याचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यावरून इराणच्या सैन्य प्रमुखाकडून ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाच्या संपादकांना धमकी !

तेहरान (इराण) – फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक ‘शार्ली हेब्दो’मध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावरून इराणच्या ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स’चे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी ‘शार्ली हेब्दो’च्या संपादकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘तुमची स्थिती सलमान रश्दी यांच्याप्रमारे होऊ शकते’, असे सलामी यांनी म्हटले आहे. सलमान रश्दी यांनी वर्ष १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘सॅटनिक व्हर्सेस (सैतानी आयते (वाक्ये)) या पुस्तकामध्ये कुराणचा अवमान केल्यावरून त्यांना इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांनी ठार मारण्याचा फतवा काढला होता. रश्दी यांच्यावर काही मासांपूर्वी अमेरिकेत आक्रमण करण्यात आले होते. सलामी यांनी म्हटले की, मुसलमान कधी ना कधी याचा सूड उगवतील. तुम्ही मारणार्‍याला पकडाल; मात्र जो ठार होईल तो पुन्हा कधी येणार नाही.

इराणमधील आणखी काही मौलवींची व्यंगचित्रे प्रसिद्ध करणार ! – शार्ली हेब्दो

या धमकीवर ‘शार्ली हेब्दो’चे संपादक लॉरेंट सॉरीसेऊ यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, आम्ही इराणमधील आणखी काही मौलवींची व्यंगचित्रे प्रसिद्ध करणार आहोत. मुल्ला आनंदी नाहीत. असे वाटत नाही की, आमच्या व्यंगचित्रामुळे सर्वोच्च नेत्याला हसू आलेले नाही.

संपादकीय भूमिका 

प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे घाला घालणार्‍यांच्या विरोधात भारतातील पुरो(अधो)गामी कधी बोलतील का ?