देहलीतून अटक करण्यात आलेले जिहादी आणि खलिस्तानी आतंकवादी करणार होते हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या !

देहलीमध्ये एका हिंदूची शिरच्छेद करून हत्या केल्यावर केले ९ तुकडे !

देहलीतून अटक करण्यात आलेले आतंकवादी

नवी देहली – येथील भलस्वा डेरी क्षेत्रातून अटक करण्यात आलेले आतंकवादी  जगजीत उपाख्य याकूब आणि नौशाद हे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या ‘काश्मीर-खलिस्तान’ या गटाच्या अंतर्गत काम करत होते. त्यांचे लक्ष्य भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेते होते. त्यांनी देहलीत राजकुमार नावाच्या एका हिंदु व्यक्तीची हत्या करून त्याचे अनेक तुकडे केले होते. तसेच या घटनेचा व्हिडिओही बनवला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. या दोन्ही आतंकवाद्यांना पंजाबमधील ४ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते. यातील एक शिवसेनेचे नेते होते. आय.एस्.आय.ने ‘काश्मीर-खलिस्तान’ हा गट काश्मीरप्रमाणेच पंजाबमध्येही जिहादी आतंकवादी कारवाया करण्यासाठी बनवला आहे.

१. देहली पोलीस या दोघांची माहिती आता पंजाब पोलिसांना देणार आहेत. तसेच या दोघांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे त्यांना कुठून प्राप्त झाली याचा शोध घेतला जात आहे. पोलीस नौशाद याच्यावर गेले १ मास लक्ष ठेवून होते. तरीही त्याने या काळात एका हिंदूची हत्या कशी केली, याचीही चौकशी करण्यात येत आहे. (लक्ष ठेवण्यात येऊनही जर अशी हत्या होत असेल, तर पोलीस कशा प्रकारे लक्ष ठेवतात, याचीच चौकशी करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

२. नौशाद आणि जग्गा यांनी राजकुमार याला १५ डिसेंबर २०२२ या दिवशी दारू पिण्याच्या आमिषाने भलस्वा डेरी येथील घरी नेले आणि त्याचा शिरच्छेद करून त्याच्या मृतदेहाचे ९ तुकडे केले. या घटनेचा व्हिडिओ बनवून त्यांनी पाकमधील त्यांच्या प्रमुखांना पाठवला. ज्याला हा व्हिडिओ पाठवण्यात आला त्याचे नाव सलमान असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही लक्ष्यित हत्या करून त्याचा व्हिडिओ बनवण्याचा आदेश होता. तसेच देशात दंगली आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचाही आदेश होता.

३. या दोघांचा पाकशी संपर्क देहलीतील तिहार कारागृहात अटकेत असणारे आतंकवादी महंमद आरिफ आणि लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी सोहेल यांनी करवून दिला होता. आरिफ याला लाल किल्ल्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. नौशाद त्या वेळी याच कारागृहात अटकेत होता. वर्ष २०१८ मध्ये सुटल्यावर सोहेल पाकिस्तान गेला होता. जेव्हा वर्ष २०२२ मध्ये नौशाद कारागृहातून बाहेर आला, तेव्हा त्याने सोहेलशी संपर्क साधला होता. नौशाद ५६ वर्षांचा असून तो पाकिस्तानी आतंकवादी संघटना हरकत-उल-अंसारशी जोडलेला आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आणि खलिस्तानी आतंकवाद्यांची ही युती देशासाठी अधिक धोकादायक आहे. दोन्ही आतंकवाद वेळेत नष्ट न केल्याचाच हा परिणाम आहे. आतातरी याकडे गांभीर्याने पाहून या दोघांच्या मागे असणार्‍या पाकला नष्ट करण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे !