देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अविनाश गिरकर (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास

श्री. अविनाश गिरकर

१. साधनेला आरंभ करणे

१ अ. पत्नीच्या सांगण्यावरून सत्संगाला जाण्यास आरंभ करणे

‘मी बोटीवर नोकरी करत असल्याने सुटीत घरी येत असे. तेव्हा आमच्या घरासमोरील शाळेत आठवड्यातून एकदा सनातनचा सत्संग होत असे. त्या सत्संगाला माझी पत्नी सौ. केशर जात असे; पण मी मात्र जात नसे. सौ. केशर सत्संगानंतर घरी आल्यावर मी सत्संगाविषयी मस्करी करत बोलत असे. साधारण एक वर्षभर असेच चालू होते. एकदा सौ. केशर मला म्हणाली, ‘‘घरी बसण्यापेक्षा थोडा वेळ सत्संगात जाऊन बसा.’’

त्या दिवशी मी सत्संगाला गेलो. सत्संगात मी सत्संगसेवकाला उलट-सुलट प्रश्न विचारले; परंतु ‘घरी बसण्यापेक्षा आपण सत्संगाला जाऊया’, असे मला वाटू लागले आणि मी सत्संगाला नियमित जाऊ लागलो.

१ आ. सामूहिक नामजपाला जाणे

त्या काळी सत्संगात साधक श्री दुर्गादेवीचा सामूहिक नामजप वैखरीतून करत असत. एका साधकाने मला सांगितले, ‘‘तुम्हीसुद्धा नामजपाला या.’’ तेथे गेल्यावर नामजपामुळे मला चांगले वाटू लागले.

१ इ. साधनेला शुभारंभ

अशा प्रकारे मी वर्ष २००३ पासून साधनेला शुभारंभ केला. त्यानंतर मात्र मी बोटीवरून तीन-साडेतीन मास सुटीसाठी ठाणे येथे घरी आल्यानंतर वेळ वाया न घालवता मिळेल ती सेवा करत असे.

२. सेवेला आरंभ

२ अ. उदबत्ती बनवण्याची सेवेला जाणे

वर्ष २००४ मध्ये एका साधकाने मला ‘‘एके ठिकाणी उदबत्ती भरण्याची सेवा चालते. तेथे तुम्ही सेवेला येऊ शकता का ?’’, असे विचारले. त्यावर मी ‘हो’ म्हणालो आणि मी प्रतिदिन दुपारी १ ते सायंकाळी ५.३० पर्यंत सेवेला जाऊ लागलो.

२ आ. मुद्रणालयात जाऊन दैनिकांची सेवा करणे

त्या काळी सनातनच्या नियतकालिकांच्या छपाईची सेवा तुर्भे (नवी मुंबई) येथील मुद्रणालयात चालत असे. एकदा मी दुपारी ३ वाजता त्या सेवेसाठी मुद्रणालयात गेलो. तिथे मी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सेवा केली. या सेवेचा माझा पहिलाच दिवस होता; तरीही मला या सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला. तेथे मी ‘दैनिकांचे अंक व्यवस्थित लावणे आणि त्यांचे गठ्ठे बांधणे’, या सेवा केल्या.

२ आ १. मुद्रणालयातील सेवा केल्यावर आलेली अनुभूती : मुद्रणालयातील सेवा संपल्यावर मला बसथांब्यावर चालत जाण्यासाठी ७ ते ८ मिनिटे लागली. तेव्हा चालतांना ‘माझे पाय भूमीवर नसून मी अंतराळात चालत आहे’, असे मला वाटू लागले. त्या वेळी ‘काय होत आहे ?’ हे मला कळत नव्हते. ‘मी तरंगत आहे’, असे वाटत होते. त्या वेळी अंधार पडला होता आणि आकाशात तारे दिसत होते. मला अंतराळात असल्यासारखे वाटत होते. मी अंतराळात असल्याचे जाणवून ते तारे मला इतक्या जवळ वाटू लागले की, ‘माझे हात त्या तार्‍यांपर्यंत सहज पोचतील’, असे मला वाटले. ही अनुभूती मी घरी जाईपर्यंत टिकून होती.

३. बोटीवर नामजपाला वेळ मिळत असल्याने ‘ही नोकरी म्हणजे श्रीगुरूंची माझ्यावरील कृपा आहे’, असे वाटणे

माझी सुटी संपल्यावर मी बोटीवर जातांना पत्नीने ‘नामजप चालू ठेवा’, असे मला सांगितले. त्यानुसार मी बोटीवर असतांना नामजप करत असे. ‘माझी बोटीवरची नोकरी हे माझ्या मागील जन्माचे पाप आहे’, असे मला नेहमी वाटत असे. मी तसे सर्वांना सांगतही असे; कारण कुटुंबापासून दूर रहाणे, शीतकपाटातील ((फ्रिजमधील) पदार्थ खावे लागणे, सारखे पालटणारे वातावरण इत्यादींमुळे आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागत असे. त्या काळी भ्रमणभाष इत्यादी काही नव्हते. त्यामुळे सगळे लक्ष घराकडेच लागलेले असे. या त्रासांमुळे ‘बोटीवरची नोकरी नको’, असे मला पूर्वी वाटत असे; पण साधना चालू झाल्यापासून मला ‘ही नोकरी म्हणजे श्रीगुरूंची माझ्यावरील कृपा आहे’, असे वाटत असे. दिवसभरात माझा नोकरीचा कालावधी, झोप आणि वैयक्तिक वेळ वजा जाता मला उर्वरित ५ घंटे नामजपाला मिळत असत. इतर ठिकाणी नोकरी केली असती, तर मला नामजपासाठी इतका वेळ मिळाला नसता; म्हणून ही नोकरी करत असतांना मी स्वतःला भाग्यवान समजत असे.

४. पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ करणे

४ अ. पत्नीने पूर्णवेळ साधना करण्यास सांगूनही मनाची सिद्धता नसल्याने नोकरी चालू ठेवणे

नोकरी करण्यापूर्वी ‘५० वर्षांपर्यंतच नोकरी करून उर्वरित जीवन समाजसेवेत घालवायचे’, असे मी ठरवले होते. त्या दृष्टीने मी काही समाजसेवी संस्थांना भेटलो होतो; पण त्यांचे आणि माझे विचार जुळले नाहीत. या कालावधीत माझे सनातनच्या सत्संगांना जाणे चालूच होते. त्या वेळी ‘मी पूर्णवेळ साधना करावी’, असे माझ्या पत्नीचे मत होते; पण मी नोकरी चालू ठेवली आणि सुटीत घरी आल्यावर प्रासंगिक सेवा करू लागलो.

४ आ. नोकरीचा कालावधी संपल्यावर सर्व प्रमाणपत्रे (सर्टिफिकेट्स) आणि अन्य कागदपत्रे साधनेतील अडथळा असल्याचे वाटून पाण्यात सोडून देणे

बोटीवरच्या नोकरीचा कालावधी संपण्याच्या आदल्या दिवशी कर्मचार्‍यांना त्यांची सर्व प्रमाणपत्रे (सर्टिफिकेट्स) आणि अन्य कागदपत्रे परत देतात. त्यानुसार आमच्या ‘कॅप्टन’ने माझीही सर्व कागदपत्रे मला परत दिली. ती सर्व प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे मी प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करून पाण्यात सोडून दिली; कारण माझ्या दृष्टीने आता ही कागदपत्रे माझ्या साधनेत अडथळा होती; म्हणून मी आधी ते कारणच नष्ट केले.

४ इ. देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करण्याची संधी मिळणे

मी घरी आल्यावर पाहिले, तर आमच्या घरी सत्संग चालू होता. सद्गुरु अनुराधा वाडेकर सत्संग घेत होत्या. मी त्यांना सांगितले, ‘‘आता मी पुन्हा बोटीवर जाणार नाही. मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात जायचे आहे.’’ त्याप्रमाणे १.१.२०१४ या दिवशी मला देवद आश्रमात जाण्याची संधी मिळाली.

४ ई. सेवा करत असतांना ठेवत असलेला भाव

१. मी संतसेवा किंवा साधक अन् संत यांच्या समवेत रुग्णालयात जाण्याच्या सेवेच्या वेळी ‘गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी ही सेवा करू शकत आहे’, असा कृतज्ञताभाव ठेवतो.

२. ‘प्रत्येक कृती ईश्वरच करतो’ यावर पूर्ण श्रद्धा ठेवून मी सेवा करतो. ‘प्रत्येक सेवा ईश्वरानेच मला दिली आहे’, असा भाव ठेवून मी ती स्वीकारतो आणि करतो.

३. ‘माझा देह हा प.पू. गुरुदेवांचाच आहे. या ब्रह्मांडात जे काही आहे, ते सर्व या पिंडातही आहे. सर्व देवता, साधक इत्यादी माझ्या देहातच आहेत आणि प.पू. गुरुदेवच सर्वांना सांभाळत आहेत. तेच माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत’, असा असा भाव ठेवून मी सेवा करतो. त्यामुळे मला थकवा किंवा कंटाळा न येता सतत उत्साही वाटते आणि आनंद मिळतो.

५. देवद आश्रमात सेवा करतांना आलेल्या अनुभूती

५ अ. पू. उमेशअण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे चार मासांतच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे

देवद आश्रमात आल्यानंतर मी सेवा करू लागलो. ‘मी कुणीच नसून केवळ शून्य आहे आणि ईश्वरानेच मला ही सेवा दिली आहे’, असा भाव ठेवून मी सेवा करतो. ऑक्टोबर २०१५ मध्ये एकदा पू. उमेशअण्णा यांनी मला सांगितले, ‘‘तुमचे प्रयत्न चांगले आहेत. असेच चालू ठेवा. चार मासांनी काय होते, ते पहा.’’ त्याप्रमाणे मी प्रयत्न केले आणि पू. उमेशअण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर चार मासांनी, म्हणजे मार्च २०१६ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले.

५ आ. ‘स्वभावदोष घालवण्यासाठीच देवाने शारीरिक त्रास दिला आहे’, या विचाराने कृतज्ञता वाटणे

मी प्रतिदिन पहाटे साडेतीनला उठून एका घंट्यात सर्व आवरून सेवेला सिद्ध होत असे. एक दिवस मी सेवा करत असतांना खोलीत चक्कर येऊन पडलो. माझा रक्तदाब वाढला होता. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘तुम्हाला मानेचा त्रास आहे. त्यामुळे सेवा सावकाश करा. धावपळ करू नका. ओझे उचलू नका इत्यादी.’ माझ्यामध्ये ‘धांदरटपणा’ आणि ‘अती घाई करणे’ हे स्वभावदोष आहेत. ते घालवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले; पण यश येत नव्हते. तेव्हा ‘देवानेच मला हा शारीरिक त्रास दिला असून तोच माझे हे दोष घालवत आहे’, असा मी भाव ठेवला. तेव्हा ‘श्री गुरु आपले दोष घालवण्यासाठी किती काळजी घेतात !’, या विचाराने मला कृतज्ञता वाटली.

५ इ. कोरोना संसर्गाच्या कालावधीत वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाऊ न शकणे; परंतु आश्रमातील एका वयस्कर साधकांची ‘ते माझे वडीलच आहेत’, हा भाव ठेवून सेवा केल्याने स्थिर रहाता येणे

आश्रमातील वास्तव्यात मी भावाच्या स्तरावर सेवा करत असे. मी आश्रमातील एक वयोवृद्ध साधक श्री. तावडेआजोबा यांच्या सेवेत असतांना माझ्या वडिलांचे मुंबई येथे निधन झाले; पण कोरोना महामारीच्या कालावधीतील दळणवळण बंदीमुळे मी त्यांच्या अंत्यदर्शनाला जाऊ शकलो नाही. त्या वेळी ‘तावडेआजोबा माझे वडीलच आहेत’, हा भाव ठेवून मी त्यांची सेवा करत राहिलो. त्या वेळी श्रीगुरुकृपेनेच मला स्थिर राहून सेवा करता आली.

५ ई. डोळे बंद करून देवीला आळवतांना आजूबाजूला कुणी नसतांना पावलांचा आवाज ऐकू येणे आणि श्री दुर्गादेवीने येऊन शरिरात चैतन्य पसरवल्याचे जाणवणे

एक दिवस नामजप करतांना भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ जशा श्री दुर्गादेवीला आळवतात, तशा प्रकारे मी श्री दुर्गादेवीला पुढील प्रार्थना करत होतो. ‘हे श्री दुर्गादेवी, तूच भक्तीभाव आहेस. या ब्रह्मांडातील सर्व स्त्री देवता तुझ्यातच सामावलेल्या आहेत. तूच आदिशक्ति आहेस. मी तुझेच लेकरू आहे. आई, मला जवळ घे आणि सदा तुझ्या चरणांजवळ ठेव. आई, आमच्यासाठी धावत ये.’ अशा प्रकारे मी डोळे बंद करून देवीला आळवत होतो. एवढ्यात मला पावलांचा आवाज ऐकू येऊ आला. ‘कुणीतरी आले’, असे समजून मी डोळे उघडून आजूबाजूला पाहिले. तेथे कुणीच नव्हते; परंतु मला पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू आला होता. श्री गुरूंच्या कृपेनेच ही अनुभूती आली; म्हणून मला श्री गुरुचरणी कृतज्ञता वाटली. ‘श्री दुर्गादेवीने येऊन माझ्या शरिरात चैतन्य पसरवले’, या विचाराने मी दिवसभर भावावस्थेत होतो.

माझा देह हा प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) आहे. ‘सर्व देवता माझ्या देहात आहेत. प.पू. गुरुदेवच आम्हा सर्वांना सांभाळत आहेत’, असा मी भाव ठेवतो. त्यामुळे मला थकवा किंवा कंटाळा न येता सतत उत्साह वाटून आनंद मिळतो.’

– श्री. अविनाश परशुराम गिरकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६८), सनातन आश्रम देवद, पनवेल. (फेब्रुवारी २०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक