परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सौ. धनश्री शिंदे यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात (भूलोकीच्या वैकुंठात) अनुभवलेले माहेरपण !

‘परात्पर गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला आणि माझ्या यजमानांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया राबवायला रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली. आम्ही स्वप्नातही ‘आम्हाला या वैकुंठामधील माहेरी रहायला मिळेल’, असा विचार केला नव्हता. लेक माहेरी आल्यावर ‘आई लेकीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते, त्याचप्रमाणे इथे (रामनाथी आश्रमात) मोक्षदायी गुरुमाऊली त्याच्याही पुढचे देऊन जीवनाचा उद्धार करते’, हे आम्हाला अनुभवायला आले.

मुलांना काय केल्याने त्यांचा त्रास दूर होऊन त्यांना आनंद मिळेल, याकडे गुरुमाऊलीचे लक्ष असते. त्याप्रमाणे गुरुमाऊलीने आम्हाला सर्व दिले. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्यावर प्रतिदिन स्वयंपाकघरात सेवा करणे, दिवसभरात झालेल्या चुका सांगणे, चुका व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगणे, हे आम्हाला प्रथम कठीण जात होते; परंतु त्यातून शिकत गेल्याने नंतर आम्हाला आनंद मिळू लागला. माझी चुकांविषयीची भीती न्यून होऊन मला त्या आढाव्यात सांगता येऊ लागल्या.


१. नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे आणि यजमानांना नोकरीत प्रामाणिकपणे वागण्याचा त्रास होत असल्याने त्यांनीही पूर्ण वेळ साधना करण्याचा निर्णय घेणे अन् दोघांना रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळणे

जुलै २०१७ मध्ये मी नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी माझ्या यजमानांना एकटे रहाण्याचा ताण आल्यामुळे मला पूर्णवेळ साधिका होता आले नाही. तेव्हा मी प्रतिदिन गुरुमाऊलीला ‘दोघांनाही तुमच्या चरणांशी स्थान द्या’, असे आत्मनिवेदन करायचे. पुढे यजमान प्रामाणिकपणे नोकरी करत असूनही त्यांना सत्याने वागण्याचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांच्या मनात ‘नोकरी सोडावी’, असा विचार आला आणि डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. देवाने आमच्या हाकेला ओ दिली.

२. रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळणे आणि त्या काळात अनुभवलेली गुरुकृपा

सौ. धनश्री शिंदे

१८.१.२०१९ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात आलो.

२ अ. शारीरिक त्रासांत वाढ होणे

२ अ १ अ. स्वतःचा शारीरिक त्रास

१. हात दुखत असतांना ‘न्यूरोथेरपी’चे उपचार केल्यावर त्रास उणावणे : आम्ही आश्रमात आल्यावर माझ्या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांत वाढ झाली. मला ८ दिवस एका हाताने काहीच करता येत नव्हते. मी एक हात गळ्यात बांधून जमेल तेवढी सेवा करत होते. त्याच कालावधीत पाच दिवसांचे ‘न्यूरोथेरपी’चे शिबिर होते. मला त्या शिबिराला जायला मिळाले. या उपचाराने माझा बराचसा त्रास उणावला.

२. साधिकांनी मनापासून हाताला मालीश करणे आणि ‘नातेवाईकही एवढी काळजी घेणार नाहीत’, या विचाराने डोळ्यांत अश्रू येणे : शिबिराला गेल्याने ‘पाच दिवस काहीही सेवा न करता सगळे आयते कसे खावे ?’, या विचाराने माझे मन अस्वस्थ व्हायचे. साधिकांनी नातेवाईकही करणार नाहीत, एवढी मनापासून माझी सेवा आणि मर्दन केले. मी देवाला सांगायचे, ‘देवा, मी काहीही केले नाही; पण तू किती भरभरून देत आहेस !’ मी सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर यांना सांगितले, ‘‘ताई, मी इथे काहीच सेवा केली नाही. याचे मनाला कसेतरी वाटते.’’ तेव्हा पू. रेखाताई म्हणाल्या, ‘‘असे काही नाही. आश्रमात आल्यानंतर लगेच नामजप करायला बसा.’’ तेव्हा मला अश्रू आवरायचे नाहीत. नंतर आश्रमात साधकांसाठी झालेल्या ३ दिवसांच्या ‘न्यूरोथेरेपी’ उपचारांमुळे माझे आखडलेले सांधे मोकळे झाले. परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच मला या उपचारांचा लाभ झाला.

२ अ १ आ. यजमानांना शारीरिक त्रास

१. यजमानांना शारीरिक त्रास होऊ लागल्यावर ‘गुरुमाऊलीची साथ आहे’, या विचाराने मनाला उभारी येणे : याच काळात माझ्या यजमानांनाही अकस्मात् शारीरिक त्रास होऊ लागला. त्यांना दोन वर्षांपूर्वी झालेला पोटाचा त्रास पुन्हा चालू झाला. त्यांना चिकित्सालयात दाखवल्यानंतर बरे वाटू लागले. ‘या काळात आम्ही घरी असतो, तर यजमानांना रुग्णालयात भरती करावे लागून त्रास असह्य झाला असता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागल्या असत्या’, या विचाराने मला भीती वाटत होती; पण ‘गुरुमाऊली आहे’, या विचाराने मला उभारी यायची.

२ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे

२ आ १. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात बसण्याचा ताण येऊनही ‘परात्पर गुरु डॉक्टर बोटाला धरून नेत आहेत’, असा भाव ठेवल्याने ताण न्यून होणे आणि आढावा सहजतेने होऊन त्यातून आनंद मिळणे : ‘माझ्यात ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा तीव्र पैलू आहे’, हे कधी माझ्या लक्षात आले नव्हते. आढावासेविका सौ. सुप्रिया माथूर यांनी बाहेर वावरतांनाही ‘माझ्यात सहजता नाही’, याची मला जाणीव करून दिली. सुप्रियाताई आम्हाला भावनिक स्तरावर न हाताळता परखडपणे आमच्यातील स्वभावदोषांविषयी सांगत असत. त्यामुळे एक क्षण सुप्रियाताई घेत असलेल्या आढाव्यात बसायचा मला ताण यायचा, तर दुसर्‍याच क्षणी त्यांचा आढावा मला हवाहवासा वाटायचा. मला आढाव्याचा ताण येऊ नये; म्हणून कु. स्वाती गायकवाड यांनी (आताच्या सौ. स्वाती शिंदे यांनी) सांगितल्याप्रमाणे मी परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून समवेत घेऊन जायचे. त्या वेळी मला ‘मी लहान मुलगी आहे आणि परात्पर गुरु डॉक्टर मला बोटाला धरून नेत आहेत’, असे जाणवायचे. तेव्हापासून माझ्यावर आलेला ताण उणावू लागला. त्यामुळे माझा आढावा सहजतेने होऊन मला त्यातून आनंद मिळू लागला.

२ आ २. ‘देवाने कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे) यांच्या रूपात भावरूपी अमृतकुंभच दिला आहे’, असे वाटणे : कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे) साधकांना इतक्या सहजतेने भावस्थितीला घेऊन जात असत की, ‘सत्संगात गुरुदेवच अवतीर्ण झाले आहेत’, अशी साधकांना अनुभूती यायची. ‘स्वातीताईंच्या रूपात देवाने भावरूपी अमृतकुंभच दिला आहे’, असे मला वाटायचे. सौ. सुप्रियाताई साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे शस्त्रकर्म करतात अन् त्यासाठी स्वातीताई साधकांना भावाची भूल देऊन त्यांना शस्त्रकर्म करण्यासाठी सिद्ध करतात. त्यामुळे शस्त्रकर्माची जाणीवही होत नाही आणि ताणरूपी रोगावर जखम न होता सहजतेने शस्त्रकर्म केले जाते’, असे मला वाटते.

२ इ. आश्रमात झालेले यज्ञ, विधी आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करणे, यांमुळे आध्यात्मिक त्रास न्यून होणे

१. याच काळात आश्रमात राजमातंगी यज्ञ, सौरयाग, हनुमत्कवच यज्ञ आदी यज्ञ झाले. या यज्ञांतील चैतन्याने माझे बरेचसे आध्यात्मिक त्रास न्यून झाले.

२. याच काळात साधकांच्या पितरांना मुक्ती मिळण्यासाठी महर्षींच्या आज्ञेने सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी विधी केला. त्यातूनही मला होत असलेले त्रास न्यून झाले.

३. ‘काही वर्षांपासून मला रात्री झोप लागायची नाही. मला डोळ्यांसमोर चित्र-विचित्र दृश्ये दिसायची’, हे पू. रेखाताईंना सांगितल्यावर त्यांनी मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजप विचारून घ्यायला सांगितला. त्या वेळी सद्गुरु गाडगीळकाकांनी मला प्रतिदिन ५ घंटे नामजप करायला सांगितला. त्यानुसार नामजप केल्यावर ६ दिवसांतच माझा त्रास न्यून होऊ लागला. कितीतरी दिवसांपासून औषधोपचार करूनही माझ्या डोळ्यांच्या खालची वर्तुळे नाहीशी होत नव्हती, तीही या नामजपामुळे न्यून झाली.

अशा प्रकारे गुरुमाऊलीच्या कृपेने माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझे त्रास न्यून झाले. तेव्हा मला गुरुदेवांप्रती सातत्याने कृतज्ञता वाटत होती. देवा, या अभागी जिवासाठी किती रे करतोस ! माझी पात्रता नसतांनाही मला एवढ्या स्तरांवर घडवलेस आणि सक्षम केलेस.

३. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘देवा, आता तुझ्या चरणांविना काहीच नको. मला सातत्याने तुझ्या अनुसंधानात ठेव. माझ्या श्वासासह तुझा नामजप व्हावा. गुरुमाऊली, तुम्हीच या जिवाचा उद्धार करा’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ‘देवा, माझी एवढी काळजी आजपर्यंत कुणीच घेतली नाही; म्हणूनच माऊली, म्हणजे आईच्याही पुढच्या टप्प्याचे देणारी आणि मोक्ष देणारी गुरुमाऊली आहे. सर्व साधकांचा गुरुमाऊलीच भार वहात आहे.

अशा प्रकारे गुरुमाऊलीने या वैकुंठाच्या माहेरात आम्हा दोघांनाही शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर सिद्ध केले. त्यांच्याप्रतीची कृतज्ञता शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु स्वाती खाडये आणि अन्य संत यांच्या चरणी कृतज्ञता !

– सौ. धनश्री शिंदे, जळगाव (एप्रिल २०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.