हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील आपण सर्वजण भागीदार ठरणार आहोत ! – सुरेश शिंदे

  • चिपळूण येथे २६ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा

  • वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष !

चिपळूण, २४ डिसेंबर (वार्ता.) – चिपळूणच्या परशुरामभूमीत होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे केवळ आपण साक्षीदार नव्हे, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील आपण सर्वजण भागीदार ठरणार आहोत. हिंदूंवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होय. या दृष्टीनेच हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले.

वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष !

समितीच्या वतीने शहरातील श्री जुना कालभैरव मंदिराशेजारी नवीन मैदानात २६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रचारासाठी २४ डिसेंबरला वाहनफेरी काढण्यात आली. त्या वेळी श्री. शिंदे बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

या फेरीत हिंदुत्व जागृत करणार्‍या घोषणा यांमुळे अवघे चिपळूण दुमदुमून गेले. या वेळी ‘भगवान परशुरामांचा विजय असो’ ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’,‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, एकच ध्येय, एकच लक्ष्य हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र’ यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या.

प्रारंभी चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव मंदिरात श्रीफळ अर्पण करून प्रार्थना केली. श्री जुना कालभैरव देवस्थानचे विश्‍वस्त श्री. समीर शेट्ये यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले, तसेच विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. पराग ओक यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. रामदास राणे, मनसे तालुकाध्यक्ष श्री. अभिनव भुरण, माजी नगरसेवक श्री. विजय चितळे, माजी नगरसेविका सौ. सीमा रानडे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. उदय सलागरे, सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. महेश लाड यांनी केले.

क्षणचित्रे

१. फेरीच्या कालावधीत पाग येथील सुहासिनींनी धर्मध्वजाची भावपूर्ण पूजन करत, फुले उधळण करून आरती ओवाळली.
२. रेडीज पेट्रोलपंपाचे मालक श्री. ओंकार रेडीज यांच्या वतीने फेरीचे स्वागत करण्यात आले.
३. वाहनफेरी जात असतांना रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या हिंदूंनी हात वरती करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.