निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११७
स्वल्पं यदा दोषविबद्धम् आमं लीनं न तेजःपथम् आवृणोति ।
भवत्यजीर्णेऽपि तदा बुभुक्षा या मन्दबुद्धिं विषवत् निहन्ति ।। – सुश्रुतसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ४६, श्लोक ५१३
अर्थ : ‘जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते. मंदबुद्धी माणसाला ही भूक ‘खोटी भूक’ आहे, हे समजत नाही. तो भूक लागली, म्हणून खातो आणि हे त्याला विषाप्रमाणे मारक ठरते.
‘आम्ही नेहमी अल्पाहार करतो. आम्हाला कधी काही झाले नाही. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण ?’, अशा वृत्तीचे लोक आचार्य सुश्रुतांच्या काळीही असावेत. त्यांनी ‘रात्रीचे जेवण पूर्णपणे पचल्याविना सकाळी खाऊ नये’, हे तत्कालीन जनतेला सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला असावा. आताच्या सारखे तेव्हाही लोकांनी ऐकले नसावे, म्हणून शेवटी त्यांना वरील श्लोकात ‘मंदबुद्धी’ हे विशेषण वापरून ‘मंदबुद्धींनो (वेड्या माणसांनो), तुम्हाला हे विषाप्रमाणे मारक ठरेल’, असे सांगावे लागले असावे.
सामान्य माणसाला अल्पाहार सोडणे कठीण वाटते; परंतु ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणार्या साधकांकडे आत्मबळ असल्याने ते सहजपणे अल्पाहार सोडू शकतात. कित्येक साधकांनी अल्पाहार सोडल्याचे कळवले. या सर्व साधकांप्रती मी कृतज्ञ आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२२)