नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – मुंबईकरांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांतील समस्यांचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करून याविषयी एक बैठक घेण्यात येईल. ५ सहस्र ५०० आशासेविकांद्वारे मुंबईतील आरोग्यसेवेचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिले.
१. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या सरकारने आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता मात्र हा प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ. डॉक्टरांची रिक्तपदे, यंत्रसामुग्रीची अनुपलब्धता यांविषयी उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा करण्यात येईल. ज्या रुग्णालयांमध्ये औषधे खरेदी करण्यात दिरंगाई होत आहे, याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल. यापुढे मुंबईतील रुग्णालयांमध्ये वेळेत औषधे मिळतील.’’
२. या वेळी आशिष शेलार यांनी ‘सेवनहिल रुग्णालय’ महानगरपालिकेच्या कह्यात घेण्याची मागणी केली. ‘त्याविषयी आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.