तुमच्या मागे साप दिसला, तर तो शेजार्‍यालाच नाही, तर तुम्हालाही दंश करील !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पाकच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी यांना फटकारले

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर व पाकच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी

न्यूयॉर्क (अमेरिका) – जर तुम्हाला तुमच्या मागे साप दिसला, तर तो तुमच्या शेजार्‍यांनाच दंश करील, असे समजू नका. तो तुम्हाला आणि तुमच्या लोकांनाही दंश करील, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीच्या वेळी पाकच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना खार रब्बानी यांना फटकारले. रब्बानी यांनी भारतावर आतंकवाद्यांना संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. त्यावर जयशंकर यांनी वर्ष २०११ मध्ये पाकच्या दौर्‍यावर आलेल्या अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी केलेले वरील विधान ऐकवले.

चांगले शेजारी बना !

एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, जग मूर्ख नाही. आतंकवादाशी निगडित देश, संघटना आणि त्याला आळा घालण्याचा प्रयत्न जगाला ठाऊक आहे. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.

‘आतंकवाद कधी संपणार ?’ हा प्रश्‍न पाकच्या मंत्र्याला विचारावा ! – पाकच्या पत्रकाराला सुनावले

बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पाकिस्तानी पत्रकाराने एस्. जयशंकर यांना विचारले, ‘आतंकवाद कधी संपणार?’ याला उत्तर देतांना जयशंकर म्हणाले, ‘‘तुम्ही मला हा प्रश्‍न विचारत असाल, तर तुम्ही चुकीच्या मंत्र्यांशी बोलत आहात. हा प्रश्‍न तुम्ही पाकिस्तानच्या मंत्र्यांना विचारावा. हे सर्व कधी संपेल किंवा आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हेतू किती दिवस चालणार आहे ?, हे तेच सांगू शकतील.

आतंकवादाचा नायनाट केल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही !

जयशंकर पुढे म्हणाले की, आतंकवादाचा सामना करण्यासाठी दायित्व हा आधार असला पाहिजे. आतंकवाद हा आगामी काळात आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांच्यासाठी धोका आहे. त्याला कोणतीही सीमा किंवा राष्ट्रीयत्व नाही. हे आमच्यासाठी आव्हान आहे, जे आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रितपणे पेलले पाहिजे. जगात आतंकवादाने गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच भारताने सीमेपलीकडून त्याचा सामना केला. अनेक दशकांपासून आमचे सहस्रो निष्पाप जीव गेले आहेत; पण तरीही आम्ही धैर्याने त्यांचा सामना केला. आतंकवादाचा नायनाट केल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही.

आतंकवादविरोधी चौकट ४ मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहे. यामध्ये आतंकवाद्यांची भरती, त्यांना अर्थपुरवठा, उत्तरदायित्व आणि त्यांची काम करण्याच्या पद्धत, यांचा समावेश आहे.

लादेनवरून भारताने डिवचल्यावर पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा थयथयाट

(म्हणे) ‘गुजरातचा कसाई तुमच्या देशाचा पंतप्रधान !’

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ‘अल्  कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा पाहुणचार करणारा आणि शेजारच्या राष्ट्रातील संसदेवर आक्रमण करणारा देश सामर्थ्यशाली संयुक्त राष्ट्रांसमोर उपदेश देण्यास पात्र नाही’, अशा शब्दांत फटकारले होते. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलतांना भुट्टो यांनी ‘मला भारताला सांगायचे आहे की, ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला आहे; पण गुजरातचा कसाई जिवंत असून तो भारताचा पंतप्रधान आहे’, अशी टीका केली. यासह ‘त्यांच्यावर (नरेंद्र मोदी यांच्यावर) पंतप्रधान होईपर्यंत अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी होती. (मग आता काय झाले की, अमेरिकेने बंदी उठवली, हे भुट्टो सांगतील का ? – संपादक) हे रा.स्व. संघाचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत. ते हिटलरकडून प्रेरणा घेतात’, असेही भुट्टो म्हणाले. (महंमद गझनी, घोरी, अब्दाली आदी क्रूरकर्म्यांचा आदर्श घेणार्‍या पाकने असे बोलणे, म्हणजे ‘१०० चूहे खा कर बिल्ली हज को चली’ असेच म्हणावे लागेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

तोंड आहे म्हणून बरळणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो ! त्यांचे आजोबा झुल्फिकार अली भुट्टो यांनी भारताशी १ सहस्र वर्षे युद्ध करण्याची दर्पोक्ती केली होती. त्यांना पाकच्या सैन्याने फासावर लटकवले होत, हे पहाता कसाई कोण आहे? हे भुट्टो यांनी लक्षात घेतले पाहिजे !