नाशिक येथे वारकर्‍यांचा सुषमा अंधारे यांच्या विरोधात मोर्चा

सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकर्‍यांची दिंडी यात्रा

नाशिक – ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदु धर्मातील देवता आणि साधूसंत यांच्याविषयी  केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ वारकरी आणि महानुभाव समाज यांनी येथील सुप्रसिद्ध काळाराम मंदिरापासून मोर्चा काढला. अंधारे यांच्या विरोधात येथील पंटवटी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याचीही मागणी वारकर्‍यांनी दिंडी यात्रा काढून येथे केली.

सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही ! – वारकर्‍यांची प्रतिज्ञा

‘ज्या पक्षात सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही’, अशी प्रतिज्ञा वारकर्‍यांनी केली आहे. ‘सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी’, असे आवाहनही वारकर्‍यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना केले आहे. तसे न केल्यास उद्धव ठाकरे यांचाही निषेध करण्यात येईल, अशी चेतावणीही वारकर्‍यांनी दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मतदान न करण्याची महानुभाव पंथियांची शपथ !

सुषमा अंधारे यांनी श्रीकृष्णाविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महानुभाव पंथाकडूनही गावोगावी शिवसेना ठाकरे गटाला मतदान न करण्याची शपथ श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम राबवली जाणार आहे. संभाजीनगर येथील महानुभाव आश्रमातून या मोहिमेला आरंभ झाला आहे.

सुषमा अंधारे यांच्या विरोधात राज्यभर गुन्हे नोंदवणार ! – विश्‍व वारकरी संघ

सुषमा अंधारे यांच्या विरोधात राज्यभर गुन्हे नोंदवणार आहोत, अशी चेतावणी विश्‍व वारकरी संघाने दिली. ‘संत ज्ञानेश्‍वर यांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले, याला तुम्ही चमत्कार म्हणता, माणसांनाही  शिकवायला हवे होते’, अशी अत्यंत अज्ञानमूलक आणि उपाहासात्मक टिपणी त्यांनी केली होती. (संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’सारख्या महान ग्रंथाची निर्मिती करून संस्कृत धर्मग्रंथातील (गीतेचे) ज्ञान तत्कालीन सामान्यांना समजण्यासाठी मराठी भाषेत उपलब्ध करून दिले. असे असतांना वरील भाष्य करून अंधारे यांनी त्यांचे अज्ञान आणि ब्राह्मणद्वेष यांचे प्रदर्शन केले आहे ! – संपादक)

सुषमा अंधारे यांनी क्षमा मागितली असली, तरी वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी विश्‍व वारकरी संघाचे ह.भ.प. तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे. राज्यातील ३६ जिल्हे आणि २७० तालुके येथे त्यंच्या विरोधात तक्रार करण्याची सूचना दिल्याची माहितीही ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांनी दिली.