सावदा (जिल्हा जळगाव) येथे भाजपचे शहराध्यक्ष तथा गोरक्षक जितेंद्र भारंबे यांच्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

घटनेच्या निषेधार्थ प्रांताधिकार्‍यांना निवेदन  !

भाजपचे शहराध्यक्ष तथा गोरक्षक जितेंद्र भारंबे

सावदा (जळगाव), २९ नोव्हेंबर (वार्ता.) – गोतस्करीचे वाहन पोलिसांच्या कह्यात दिल्याच्या कारणावरून धर्मांधांनी भाजपचे शहराध्यक्ष तथा गोरक्षक श्री. जितेंद्र भारंबे यांच्यासह ५ ते ६ गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण केले. २८ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ही घटना घडली. धर्मांधांनी गोरक्षकांवर तलवारी आणि लोखंडी सळई यांच्या साहाय्याने लाथाबुक्क्यांनी आक्रमण केले. यात श्री. भारंबे यांच्यासह सर्वश्री गणेश देवकर, पंकज चौधरी, अक्षय शिमरे, पवन महाजन हे गोरक्षक गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना उपचारांसाठी फैजपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सौजन्य लाईव ट्रेंड न्युज

या घटनेच्या निषेधार्थ २९ नोव्हेंबर या दिवशी समस्त हिंदु समाजाच्या वतीने ‘सावदा शहर बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रांताधिकारी कैलास कडलग यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यात सावदा शहरातील अवैध पशूवधगृह, उघड्यावरील मांसविक्री आणि गोतस्करी बंद करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी श्री. अमोल जावळे, श्री. अक्षय सरोदे यांच्यासह समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘भारतमाता की जय’ न म्हणणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – खासदार रक्षा खडसे, भाजप, जळगाव

हिंदु धर्मात गोमातेला पूजनीय मानले जाते. असे असतांना गोरक्षकांवर करण्यात आलेले आक्रमण अतिशय निंदनीय आहे. गोरक्षणाविषयी अनेक कायदे आहेत, त्यांकडे दुर्लक्ष करून दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत. जिल्ह्यातील रावेर, फैजपूर, सावदा, यावल, चोपडा आदी भागांत गोतस्करीचे प्रमाण अधिक आहे. यावर पोलीस आणि प्रशासन यांचे नियंत्रण असणे आवश्यक आहे; मात्र तसे होत नसेल, तर अशा कर्तव्यहीन पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याची शिफारस सरकारकडे करून त्याजागी कर्तव्यदक्ष अधिकारी बसवावे लागतील.

ग्रामस्थांना ज्या गोष्टी कळतात, त्या पोलिसांना का कळत नाहीत ? ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा शहरात दिले जात असतील, तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धर्मनिरपेक्ष भारतात रहणार्‍यांकडून ‘भारतमाता की जय’न म्हणणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

 

संपादकीय भूमिका

लव्ह जिहाद असो, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या असो कि गोरक्षकांवरील आक्रमण असो, हे रोखण्यासाठी कुठल्याही सरकारी यंत्रणा काहीही करत नाहीत, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आग्रही रहा !