६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ढवळी, फोंडा, गोवा येथील चि. अमोघ हृषिकेश नाईक (वय ५ वर्षे) !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीया (२५.११.२०२२) या दिवशी चि. अमोघचा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त फोंडा, गोवा येथे रहाणारे त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि काका यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. अमोघ नाईक

चि. अमोघ हृषिकेश नाईक याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘वर्ष २०१८ मध्ये ‘चि. अमोघ नाईक हा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. आता वर्ष २०२२ मध्ये साधनेच्या अपुर्‍या प्रयत्नांमुळे त्याची पातळी तेवढीच राहिली आहे. त्याच्यासाठी नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास त्याचे स्वभावदोष अन् त्याच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल आणि त्याची पातळी पुन्हा वाढेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२४.११.२०२२)  

१. सौ. अपर्णा आणि श्री. हृषिकेश नाईक (चि. अमोघचे आई-वडील)

वैद्या (सौ.) अपर्णा नाईक

१ अ. क्षात्रतेजाची आवड : ‘चि. अमोघला महाभारतातील कथा अन् लढाया, तसेच शिवाजी महाराजांच्या गोष्टी आणि त्यांच्या काळातील लढाया यांविषयी ऐकायला आवडते.

श्री. हृषिकेश नाईक

१ आ. कोरोना काळात नियमांचे पालन करणे : बाहेर गेल्यावर भिंत किंवा पादत्राणे यांना अमोघचा हात लागल्यास तो लगेच ‘मला ‘सॅनिटायझर’ लाव’, असे सांगायचा. एखादी वस्तू अलगीकरणात ठेवली असल्यास तो तिला हात लावत नसे.’

२. सौ. सुचेता सुरेश नाईक (चि. अमोघची आजी, वडिलांची आई)

२ अ. घरकामांत साहाय्य करणे : ‘अमोघ मला स्वच्छता करणे आणि भाजी निवडणे यांसाठी साहाय्य करतो. तो त्याच्या आजोबांच्या समवेत झाडांना पाणी घालतो.

२ आ. उत्तम निरीक्षणक्षमता : एकदा अमोघचे आजोबा घरी नसतांना त्याच्या वडिलांनी देवपूजा केली. त्याच्या वडिलांनी देवांच्या मूर्ती आणि चित्रे ठेवण्याचा क्रम पालटला. तेव्हा त्याने वडिलांना सांगितले, ‘‘आजोबा देव असे ठेवत नाहीत. तुम्ही असे का ठेवले आहेत ?’’

२ इ. प्रेमभाव : अमोघ त्याच्या काका-काकूंना (श्री. केदार आणि सौ. कैवल्या नाईक यांना) ‘घरी या’, असे नेहमी म्हणतो. ते घरी आल्यावर त्यांना काहीतरी खाऊ देतो आणि ‘खाऊ खा ना’, असे लडिवाळपणे म्हणतो. तेव्हा त्यांना अमोघचे ऐकावे लागते.

२ ई. धर्माचरणाची आवड

२ ई १. नवरात्रीत अष्टमीच्या रात्री घरी आलेल्या साधिकेची ओटी भरल्यावर अमोघने ‘तिची पूजा आणि आरती कर अन् तिला जेवायला वाढ’, असे सांगणे आणि ‘आता रात्र झाली असल्याने तिला दूध अन् विडा देऊया का ?’, असे विचारल्यावर आनंदाने होकार देणे : वर्ष २०२० च्या नवरात्रीत अष्टमीच्या रात्री १० वाजता काही कामानिमित्त सौ. नमिता पात्रीकर ही साधिका आमच्या घरी

सौ. सुचेता नाईक

आली होती. तेव्हा मी तिला हळद-कुंकू लावून तिची ओटी भरली. त्या वेळी अमोघ माझ्या जवळच उभा होता. तो मला म्हणाला, ‘‘आजी, तिची पूजा कर. तिला ओवाळ आणि तिला जेवायलाही वाढ.’’ मी त्याला सांगितले, ‘‘आता रात्र झाली. पुष्कळ उशीरही झाला आहे. आपण तिला दूध देऊया का ?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘चालेल. तिला दूध आणि विडा देऊया.’’ तो हे सर्व एवढ्या आनंदाने सांगत होता की, मलाही ते सर्व करतांना आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. नंतर त्याने माझ्या हातात देवघरातील निरांजन दिले आणि म्हणाला, ‘‘आता तिची आरती कर.’’ मी तशी कृती करत असतांना त्याने देवघरातील घंटी वाजवली.

२ ई २. अमोघने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेजारी रहाणारे श्री. महेश पळणीटकर यांच्यामध्ये श्रीविष्णु आणि सौ. प्रीती पळणीटकर यांच्यामध्ये भगवतीदेवीचे रूप पाहून त्यांची पूजा केल्यावर ‘त्यानेच खरे लक्ष्मीपूजन केले’, असे वाटणे : वर्ष २०२१ मध्ये दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी आश्रमातून उशिरा घरी गेले. तेव्हा अमोघ, त्याचे आजोबा आणि त्याचे आई-वडील यांनी आधीच लक्ष्मीपूजन केले होते. मी घरी गेल्यावर आमच्या शेजारी रहाणारी सौ. प्रीती पळणीटकर हिला घरी बोलावले. मी तिला हळद-कुंकू लावून तिची ओटी भरली. (अमोघ प्रीतीला ‘आत्या’ आणि श्री. महेश पळणीटकर यांना ‘मामा’ म्हणतो.) तेव्हा त्याने मामालाही बोलवायला सांगितले आणि मला म्हणाला, ‘‘मामाला सांग, ‘आज तू विष्णु आहेस; म्हणून अमोघ तुझी पूजा करणार आहे.’’ त्याने दोघांनाही कुंकू लावले आणि दोघांच्या पावलांसमोर शेवंतीची फुले ठेवली. नंतर त्याने ताम्हण घेऊन आरती ओवाळल्याप्रमाणे कृती केली. त्याने दोघांच्या पावलांंसमोरची काही फुले प्रीतीच्या (आत्याच्या) केसात आणि महेशच्या (मामाच्या) कानावर ठेवली. तो या सर्व कृती भावपूर्णरित्या करत होता. नंतर त्याने पळणीटकरकाकूंना बोलावले आणि म्हणाला, ‘‘आजी, बघ. आज मामा ‘विष्णु’ आणि आत्या ‘देवी’ आहे; म्हणून मी त्यांची पूजा केली.’’

आम्हाला हे सर्व बघून पुष्कळ आनंद झाला. ‘अमोघनेच खरे लक्ष्मीपूजन केले’, असे आम्हाला वाटले. आम्ही त्याला विचारले, ‘‘तू मामाची विष्णु म्हणून पूजा केलीस, त्या वेळी आत्या कोण होती ?’’ तेव्हा ‘आत्या भगवतीदेवी होती’, असे तो म्हणाला.

३. श्री. केदार नाईक (चि. अमोघचे काका)

३ अ. चि. अमोघची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता

३ अ १. परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभल्यानंतर १ मासाने आश्रमात आलेल्या अमोघने काकाला सत्संगाच्या ठिकाणी नेण्यास सांगून ‘परात्पर गुरु डॉक्टर बसलेल्या स्थानी सुगंध येत आहे’, असे सांगणे : ‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. सत्संगात अमोघ थोडा वेळ जागा होता. नंतर तो झोपून उठला; पण काहीच बोलत नव्हता. नंतर १ मासाने तो आश्रमात आला असतांना ‘मला सत्संगाच्या ठिकाणी घेऊन चल’, असे म्हणू लागला. मी त्याला विचारले, ‘‘तेथे कशाला जायचे ?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘तेथे ते (परम पूज्य) बसले होते ना; म्हणून सुगंध येत आहे. मला तो सुगंध घ्यायचा आहे. तूही सुगंध घे.’’

३ अ २. अमोघने परात्पर गुरु डॉक्टर बसलेल्या स्थानी दीर्घ श्वास घेऊन काकाला सुगंध घेण्यास सांगणे आणि २ दिवसांनी त्याच्या आजी समवेत आश्रमात आल्यावर तिलाही सुगंध घेण्यास सांगणे : सत्संगाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर जेथे बसले होते, त्या ठिकाणी अमोघने मला नमस्कार करायला सांगितला आणि दीर्घ श्वास घेण्याची कृती करून ‘‘असे कर, म्हणजे सुगंध येतो’’, असे म्हणाला.

त्यानंतर २ दिवसांनी अमोघ माझ्या आईच्या (सौ. सुचेता नाईक, अमोघची आजी) समवेत आश्रमात आला. त्या वेळी तिलाही सत्संगाच्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर त्याने आजीला नमस्कार करण्यास आणि सुगंध घेण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आजीलाही सुगंध आला.’

४. सौ. मंगला मराठे आणि आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (चि. अमोघचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील), 

सौ. मंगला मराठे
आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

४ अ. समाधानी वृत्ती : खरेतर अमोघला गोड पदार्थ पुष्कळ आवडतात; पण एका वेळी तो थोडेच खातो. नंतर कितीही आग्रह केला, तरी तो ‘‘आता भूक नाही. नंतर खातो’’, असे म्हणतो. त्याला चॉकलेट दिले, तरी तो नंतर खातो.

४ आ. जिज्ञासा : अमोघला एखादी गाेष्ट वाचून दाखवली की, तो त्यातील प्रत्येक कठीण शब्दाचा अर्थ विचारून समजून घेतो, तसेच समर्पक आणि समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत प्रश्न विचारतो.

४ इ. एकपाठी असणे आणि संस्कृत उच्चार स्पष्ट असणे : अमोघला श्लोक, स्तोत्रे, आणि मनाचे श्लोक मुखोद्गत आहेत. त्याचे संस्कृत उच्चारही सुस्पष्ट आहेत.

४ ई. स्वच्छतेची आवड

१. अमोघला घरातील लादीवर कचरा पडलेला दिसला, तर तो लगेच विचारतो, ‘‘आज कचरा काढला नाही का ?’’ त्याला घरात कुठेही धूळ दिसली की, तो ओला कपडा घेऊन पुसतो.

२. एकदा मी अमोघला कडेवर घेऊन आश्रमातील पायर्‍या (जिना) उतरत होते. त्या वेळी त्याने मला अकस्मात् खाली उतरवण्यास सांगितले आणि खाली उतरून भूमीवर पडलेला कागदाचा तुकडा उचलला अन् कचरापेटीत टाकला.

४ उ. आश्रमात जाण्याची ओढ : अमोघला आश्रमात जायला आवडते. तो आश्रमात जाण्यासाठी लवकर उठतो आणि पटापट आवरतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (१३.५.२०२२)