पंजाबमधील अन्य हिंदु नेत्यांना ठार मारण्याची पाकमधील खलिस्तानवाद्यांची धमकी

शिवसेनेचे नेते सुधीर सूरी (डावीकडे) गोपाल चावला (उजवीकडे)

अमृतसर (पंजाब) – येथील शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्या हत्येनंतर सामाजिक माध्यमांतून गोपाल चावला नावाच्या पाकमधील खलिस्तानवाद्याकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात तो म्हणत आहे, ‘‘शीख, मुसलमान आणि त्या प्रत्येक समाजाला, ज्याला स्वातंत्र्य हवे आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा ! मी त्याला सूरी नाही, तर डुक्कर म्हणेन. ज्या भावाने त्याला मारले, त्याचे मला कौतुक आहे. एक डुक्कर गेला आणि आता पुढच्यांचा क्रमांक आहे. निशांत शर्मा, अमित अरोडा (पंजाबमधील हिंदूंचे नेते) यांनाही जावे लागेल. ज्याप्रकारे सूरी मेला आहे, तसे अन्य लोकांना कुत्र्यांप्रमाणे मरायचे आहे.’’

अमृत सिंह मेहरोन यांच्याकडून सूरी यांची हत्या करणार्‍याचे कौतुक !

शिरोमणी अकाली दल अमृतसर (सिमरन जीत सिंह मान) या पक्षातून वर्ष २०२२ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवणारे अमृत सिंह मेहरोन यांनी एका सभेत उघडपणे सुधीर सूरी यांची हत्या करणार्‍याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘कुणाचे वाईट झाल्याने मला आनंद होत नाही; मग तो माझा शत्रू असला तरी. तथापि मी सांगेन की, सुधीर सूरी यांची ज्याने कुणी हत्या केली ?, तो कुठून आला ?, हे मला ठाऊक नाही; मात्र त्याचा जयजयकार झाला पाहिजे.’ मेहरोन यांच्या विधानाचा व्हिडिओ ‘टी.एफ्. न्यूज’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतूनही प्रसारित होत आहे.

संपादकीय भूमिका

पंजाबमधील हिंदूंच्या नेत्यांना वेचून ठार करण्याचा कट गेल्या काही वर्षांपासून रचला जाऊन त्यानुसार त्यांना ठारही करण्यात येत असतांना राज्यातील पूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून निष्क्रीयताच दाखवण्यात आली आहे. आताचे आम आदमी पक्षाचे सरकार खलिस्तान्यांचे समर्थक असल्याचेच म्हटले जात आहे. हे पहाता आता केंद्रातील भाजप सरकारने याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी लखबीर लांडा याने स्वीकारले सुधीर सूरी यांच्या हत्येचे दायित्व !

सुधीर सूरी यांच्या हत्येचे दायित्व कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी लखवीर लांडा याने स्वीकारले आहे. पंजाबमधील तरणतारण येथील गुंड असलेला लखबीर काही वर्षांपूर्वी कॅनडात पळून गेला होता. लखबीर लांडा याने सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत म्हटले आहे, ‘अन्य समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्माविषयी कुणी वाईट बोलेल, त्यांनीही सिद्ध रहावे. प्रत्येकाची पाळी येईल. सुरक्षा घेऊन तो वाचेल, असे समजू नका. हा केवळ प्रारंभ आहे.’

संपादकीय भूमिका

कॅनडातून भारतात खलिस्तानी आतंकवादी कारवाया घडवून आणल्या जाणे, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद आहे ! कॅनडातील खलिस्तानांच्या विरोधात आता तरी भारत सरकारने कठोर पावले उचलल्याची आवश्यकता आहे !