रत्नागिरी, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – कोतवडेवासियांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे कोतवडे गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ होऊ घातलेल्या ‘परमिट रूम’ ला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर या दिवशी जिल्ह्याचा जनता दरबार पार पडला. ज्या ठिकाणी ‘परमिट रूम’ होऊ घातली होती, त्या गावणवाडीचे ग्रामस्थ, यांसह कोलगेवाडी, तसेच गावांतील विविध वाड्यांतील ग्रामस्थांनी ‘परमिट रूम’ होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीकडे स्वाक्षर्यांचे अर्ज केले होते.
येथील रहिवासी अनिल नेवरेकर यांनी त्यांच्या ‘बीअर शॉपी’च्या येथे ‘परमिट रूम’ साठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. ‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, असा शेरा मारून जिल्हाधिकार्यांनी ‘परमिट रूम’ ला अनुमती नाकारली. ग्रामस्थांच्या वतीने जनता दरबारामध्ये ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वप्नील पड्यार, श्री. स्वप्नील मयेकर, महात्मा गांधी तंटामुक्ती सभेचे सदस्य श्री. दर्शन ठोंबरे, ग्रामस्थ सर्वश्री प्रकाश वारेकर, संदीप गोताड हे उपस्थित होते. यासह गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने सभेसाठी आले होते. प्रशासनाकडून दिलेल्या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.
लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्राधान्यक्रम असून आज जनता दरबारच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे. ज्या नागरिकांना मंत्रालयात व शासकीय कार्यालयात येणे शक्य नाही अशा सर्व नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. pic.twitter.com/rRWJQK7B1O
— Uday Samant (@samant_uday) November 4, 2022
बीअर शॉपीमध्ये होत आहे नियमांचे उल्लंघन ! – जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
अनिल नेवरेकर यांची ‘ऋषिकेश बीअर शॉपी’ गावणवाडी आणि कोलगेवाडी या वाड्यांमध्ये जाणार्या रस्त्याच्या कडेला आहे. या ‘बीअर शॉपी’ ची वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी असतांना प्रत्यक्षात सकाळी ७ वाजल्यापासून येथे मद्यपींचा वावर असतो. काही कालावधीपूर्वी नेवरेकर यांच्या ‘बीअर शॉपी’ मध्ये परवाना नसतांनाही ‘इंग्लिश’ दारू आढळली. याविषयी पोलीस अन्वेषण चालू आहे. येथे ‘परमिट रूम’ अनुमती नसतांनाही अनेकजण मद्यपान करून रस्त्यावर घोळक्याने उभे रहातात. येथे जवळच असलेल्या पुलावर बसून मद्य पितात, अशा प्रकारे येथे नियमांचे उल्लंघन होत आहे, अशी तक्रार ग्रामस्थांकडून जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणार्या विद्यार्थ्यांपुढे मद्य विकत घेणे आणि मद्यप्राशन करणे, असे प्रकार विद्यार्थ्यांच्या समोरच घडतात. मद्य पिऊन तर्रर्र झालेले मद्यपी रस्त्यावर लघुशंका करणे, अश्लील बोलणे आदी युवती आणि महिला यांच्या मनात लज्जा उत्पन्न करणारे मद्यपींचे वागणे असते. त्यामुळे येथून जातांना महिलांना मान खाली घालून जावे लागते, अशी तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन – (वाचण्यासाठी चित्रांवर क्लिक करावे)
‘बीअर शॉपी’ विषयीचा निर्णय तातडीने घ्यावा ! – गावणवाडी आणि कोलगेवाडी ग्रामस्थ
सभेला उपस्थित ग्रामस्थांनी नेवरेकर यांची ‘बीअर शॉपी’ ही हटवण्याची मागणीही या वेळी केली. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी श्री महालक्ष्मी मंदिरापासून ‘बीअर शॉपी’ चे अंतर मोजण्याचे निर्देश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्यानुसार ‘बीअर शॉपी’ नियमात बसत आहे का ? याविषयी उत्पादन शुल्क विभागाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. ही पडताळणी लवकरात लवकर करून याविषयी तातडीने निर्णय व्हावा, अशी भावना या वेळी ग्रामस्थांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीशी व्यक्त केली.