सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची कार्तिक शुक्ल सप्तमी (३१.१०.२०२२) या दिवशी पुण्यतिथी झाली. त्या निमित्ताने त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत.

३१ ऑक्टोबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर ती. अप्पाकाकांची विचारप्रक्रिया पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

(ही मुलाखत सद्गुरु डॉ. वसंत आठवले आणि पू. शिवाजी वटकर संत होण्यापूर्वीची असल्याने या लेखमालेतील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही. – संपादक)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/624164.html

सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले

२. ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ

२ ऊ. अध्यात्माचा केलेला अभ्यास : माझ्या वयाच्या ३६ व्या वर्षी गिरगाव (मुंबई) येथील आमच्या ‘आर्यन’ शाळेमधील संस्कृतचे शिक्षक तर्कतीर्थ वेदान्ताचार्य गजानन गोविंद रानडे हे अध्यात्म शिकवण्यासाठी प्रत्येक शनिवार, रविवार सकाळी ३ ते ४ घंटे असे सलग २ – ३ वर्षे यायचे.

१. तर्कतीर्थ रानडेगुरुजींकडून ज्ञानयोगातील षड्दर्शने (सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शन) आणि काही उपनिषदे यांचा सखोल अभ्यास केला.

२. भक्तीयोगातील दर्शनांविषयी अभ्यास केला.

३. लोणावळ्याच्या मनःशक्ती केंद्रात स्वामी विज्ञानानंद यांच्या आश्रमात १ मास राहून त्यांच्या तत्त्वप्रणालीचाही अभ्यास केला.

पू. शिवाजी वटकर

२ ए. शिकलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा समष्टीसाठी वापर करणे

१. मी मनःशक्तीच्या साधकांसाठी प्रतिमास एक घंटा याप्रमाणे पतंजलियोग, भागवतपुराण, एकनाथी भागवत, नारद भक्तीसूत्रे, आद्य शंकराचार्यांचे ‘विवेकचूडामणि’ यांवर जवळजवळ १५ वर्षे प्रवचने केली. त्यामुळे मला साधकांच्या अध्यात्मातील शंका दूर करण्याची सवय लागली.

२. माझ्याकडे येणारे बालरुग्ण तपासतांना त्यांच्या पालकांना ‘रोगासंबंधी ज्ञान देणे, रोग होऊ नये; म्हणून घ्यायची काळजी आणि मुलांवर चांगले संस्कार कसे करावेत ?’, याविषयी अंदाजे १० – १५ वर्षे प्रत्येकी १ घंटा वर्ग घ्यायचो.

२ ऐ. ज्ञानयोगावर प्रवचने करूनही वैराग्य निर्माण न होणे; पण अहंकार निर्माण होणे : हे सर्व करतांना ‘आपण विशेष काहीतरी करत आहोत. आपल्याला अध्यात्मशास्त्र कळले आहे’, असा अहंकार माझ्यात निर्माण झाला; परंतु भागवतपुराण, नारदभक्तीसूत्रे, एकनाथी भागवत यांवर प्रवचने करूनही माझ्या मनात भक्तीभाव निर्माण झाला नाही. ‘अहंकार गेला । तुका म्हणे देव झाला ।।’, हे माझे आवडते वाक्य मी प्रवचनात अनेक वेळा सांगितले असेल; पण माझ्या संदर्भात मात्र ‘कळते; पण वळत नाही’, असेच झाले. ज्ञानयोगावर प्रवचने करूनही माझ्यात वैराग्य निर्माण झाले नाही.

२ ओ. डहाणू (जिल्हा पालघर) येथील वैद्य प.पू. अण्णा करंदीकर यांच्याकडे अध्यात्म शिकण्यासाठी जाणे : वर्ष १९८५ च्या सुमारास प.पू. डॉक्टर अनेक संतांकडे अध्यात्म शिकण्यासाठी जायचे. त्यांपैकी डहाणू (जिल्हा पालघर) येथील वैद्य प.पू. अण्णा करंदीकर दादर (मुंबई) येथे मासातून एक शनिवार-रविवार वैद्यकीय व्यवसायासाठी यायचे. त्या वेळी त्यांना वेळ मिळेल त्याप्रमाणे ते अध्यात्म शिकवायचे. त्या वेळी प.पू. डॉक्टरांसह त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुुंंदावहिनी, मी आणि माझा धाकटा भाऊ डॉ. सुहास त्यांच्याकडे अध्यात्म शिकण्यासाठी जायचो.

२ औ. प.पू. अण्णा करंदीकर यांनी सांगितल्याप्रमाणे तांदुळाच्या केलेल्या पृथ्वीच्या गोलावर त्राटक केल्यावर त्यात विशिष्ट आकृती दिसणे आणि अंबाजोगाई येथे जाऊन योगेश्वरीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर ती आकृती म्हणजे योगेश्वरीदेवीच्या तोंडाचा भाग असल्याचे कळणे : प.पू. अण्णा करंदीकर यांनी आम्हाला आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाऊन येण्यास आणि तिचा नामजप करण्यास सांगितले; पण आम्हाला ‘आमची कुलदेवता कोण आहे ?’, हे ज्ञात नव्हते. तेव्हा त्यांनी ‘एका पाटावर तांदूळ ठेवून त्याचा एक मोठा सपाट गोल पृथ्वीचा, तिच्या वरती एक गोल सूर्याचा आणि एक गोल चंद्राचा’, असे करून आम्हाला तांदुळाच्या केलेल्या पृथ्वीच्या गोलावर त्राटक करण्यास सांगितले. त्या वेळी मला आणि सौ. कुुंंदावहिनींना त्राटकामध्ये विशिष्ट आकृती दिसली अन् प.पू. डॉक्टरांना प्रचंड तेज दिसले. तेज सहन न झाल्याने त्यांनी डोळे बंद केले. त्यानंतर प.पू. अण्णा करंदीकर यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुमची कुलदेवता अंबाजोगाईची श्री योगेश्वरीदेवी आहे. तुम्ही तिचे दर्शन घेऊन या.’’ आम्ही यापूर्वी कधीही योगेश्वरीदेवीचे दर्शनही घेतले नव्हते अथवा तिचे चित्रही पाहिले नव्हते. अंबाजोगाई येथे जाऊन योगेश्वरीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मला आश्चर्य वाटले; कारण मला पाटावर काढलेल्या तांदुळाच्या गोलात दिसलेली विशिष्ट आकृती म्हणजे योगेश्वरीदेवीच्या तोंडाचा भाग होता.

२ अं. प.पू. अण्णा करंदीकर यांना गुरु मानून दिलेली गुरुदक्षिणा त्यांनी पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांना देऊन ते गुरु असल्याचे सांगणे : त्यानंतर ‘प.पू. अण्णा करंदीकर हेच आपले गुरु आहेत’, असे समजून आम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना गुरुदक्षिणा दिली. त्याच्या पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या वेळी ते आम्हाला घेऊन इंदूरला गेले आणि आम्ही त्यांना दिलेली गुरुदक्षिणेची पाकिटे त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांना दिली अन् आम्हाला सांगितले, ‘‘हेच तुमचे गुरु !’’

२ क. प.पू. भक्तराज महाराज यांनी गुरुमंत्र दिल्यावर प्रारंभी काही मास गुरुमंत्राचा जप नीट होणे; पण पुढे त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा नसल्यामुळे जप हळूहळू न्यून झाल्याने आध्यात्मिक हानी होणे : प.पू. डॉक्टरांकडे ज्या ज्या वेळी प.पू. भक्तराज महाराज येत असत, त्या वेळी मी चिकित्सालय संपल्यावर महाराजांच्या दर्शनासाठी रात्री शीव (मुंबई) येथे जायचो आणि बहुतेक वेळा रात्री तेथेच झोपायचो. एकदा मी प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केली, ‘‘मला गुरुमंत्र द्या.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘या गुरुपौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला (जिल्हा कोल्हापूर) या. त्या वेळी मी तुम्हाला गुरुमंत्र देईन.’’ त्याप्रमाणे त्यांनी नरसोबाच्या वाडीला मला, माझी पत्नी सौ. विजया आणि माझी मोठी मुलगी कु. कला (आताच्या डॉ. (सौ.) श्रद्धा महेश गांधी) हिला गुरुमंत्र दिला. आमच्या घरी प.पू. भक्तराज महाराज यांचे भजनही झाले. प्रारंभी काही मास माझ्याकडून गुरुमंत्राचा जप नीट झाला; पण पुढे माझी प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर संपूर्ण श्रद्धा नसल्यामुळे तो हळूहळू न्यून झाला. नंतर परत मी माझ्या व्यवसायात गुंतून गेलो. त्यामुळे माझी आध्यात्मिक हानी झाली. आता मला गुरूंवरील श्रद्धेचे महत्त्व पूर्णपणे पटले आहे; पण माझ्या साधनेची मधली पुष्कळ वर्षे वाया गेली.

(वर्ष  २०१०)

(क्रमशः उद्याच्या अंकात)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक