सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

आज कार्तिक शुक्ल सप्तमी (३१ ऑक्टोबर २०२२) या दिवशी असलेल्या सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने…

सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले

सद्गुरु डॉ. वसंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत.

(ही मुलाखत सद्गुरु डॉ. वसंत आठवले आणि पू. शिवाजी वटकर संत होण्यापूर्वीची असल्याने या लेखमालेतील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही. – संपादक)

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पू. शिवाजी वटकर

१. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर ती. अप्पाकाकांची झालेली विचारप्रक्रिया

श्री. शिवाजी वटकर : तुमची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे कळल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ?

ती. अप्पाकाका :

१ अ. स्वतःच्या आध्यात्मिक पातळीचे चिकित्सक बुद्धीने विश्लेषण करून ते प्रांजळपणे सांगणे : मला गुरुवर्य प.पू. डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली; पण त्याच वेळी मला आश्चर्याचा धक्काही बसला. माझी चिकित्सक बुद्धी असल्याने माझ्या आध्यात्मिक पातळीचे विश्लेषण करतांना माझ्या बुद्धीला जे वाटले, तेच मी सांगत आहे. ‘‘इतर सामान्य साधकांच्या मानाने मी पुष्कळ स्वार्थी आहे. ‘माझ्यात इतरांविषयी प्रेमभाव आणि देवाविषयी भक्तीभाव जवळजवळ नाहीच’, असे माझ्या लक्षात आले. ‘माझा अहंकार थोडा न्यून झाला आहे; पण अजून पुष्कळच अहंकार शिल्लक आहे’, असे मला वाटते. माझ्याकडून नामजपासारखी सोपी साधनाही सुरळीतपणे होत नाही. मला नामजप ओढून-ताणून करावा लागतो. माझे दुसर्‍यांना साहाय्य करण्याचे प्रमाणही पुष्कळ अल्प आहे. माझ्या अजून व्यावहारिक वासना आणि मोह अल्प झालेले नाहीत. ‘माझी अंदाजे २५ – ३० वर्षांपूर्वी आध्यात्मिक पातळी अधिक चांगली होती; पण आता ती हळूहळू न्यून होत आहे’, असे मला सतत वाटत असते.

१ आ. मला साधनेत अजून पुष्कळ पल्ला गाठायचा असल्याने माझ्या आध्यात्मिक पातळीसंदर्भातील प.पू. डॉक्टरांचा निर्णय माझ्या बुद्धीला पटत नसूनही तो शिरसावंद्यच आहे ! : ५ – ६ वर्षांपूर्वी मला ‘साधकांच्या अनुभूती म्हणजे कल्पनाविलास !’, असे वाटायचे; पण आता लक्षात आले की, मन जितके सात्त्विक होईल, तितक्या अनुभूतीही सुखदायक आणि आनंददायी येतात. उन्नत साधकांना देवता, गुरु आणि सहसाधक यांविषयी स्वप्ने पडतात, तसेच त्यांचे विचारही साधनेविषयी असतात. ‘माझी स्वप्ने आणि विचार पहाता मला साधनेत अजून पुष्कळ पुढचा पल्ला गाठायचा आहे’, हे लक्षात येते. माझ्या बुद्धीप्रमाणे ‘माझी आध्यात्मिक पातळी ३० टक्केच आहे’, असे मला वाटते. अर्थात् माझ्या बुद्धीची क्षमता ती किती ? माझ्या आध्यात्मिक पातळीसंदर्भातील प.पू. डॉक्टरांचा निर्णय माझ्या बुद्धीला पटत नसूनही तो शिरसावंद्यच आहे.

१ इ. अनुक्रमणिका लावतांना मिळणार्‍या ज्ञानाचा आनंद अधिक वाटणे : ‘प.पू. डॉक्टरांनी मला ग्रंथांची अनुक्रमणिका लावण्याची संधी दिली’, यासाठी मी कृतज्ञ आहे. ती सेवा करतांना माझे मान आणि पाठ यांच्या दुखण्याकडे लक्ष न जाता वेळ आनंदात जातो; परंतु या सेवेपेक्षा अनुक्रमणिका लावतांना मिळणार्‍या ज्ञानाचा आनंदच अधिक वाटतो.

१ ई. प.पू. डॉक्टरांची गुरुकृपाच सर्वकाही करत आहे ! : माझी जी काय आध्यात्मिक पातळी वाढली असेल, त्यात माझ्या प्रयत्नांचा वाटा काहीच नाही. ‘प.पू. डॉक्टरांची गुरुकृपाच सर्वकाही करत आहे’, हे निश्चित !

२. ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ

श्री. शिवाजी वटकर : आपण आधुनिक वैद्यकशास्त्रातील बालरोगतज्ञ असतांना अध्यात्मशास्त्राकडे केव्हा आणि कसे वळलात ?

ती. अप्पाकाका :

२ अ. प.पू. डॉक्टरांचे जन्मस्थान काही वर्षांनी तीर्थक्षेत्र बनणार असल्याने त्याच गावी आणि त्याच घरात माझा जन्म झाल्याचा अभिमान वाटतो ! : माझा जन्म ३.६.१९३२ या दिवशी रायगड जिल्ह्यातील ‘नागोठणे’ या एका छोट्याशा गावी असलेल्या आमच्या आजोळच्या घरातील एका खोलीत झाला. ६.५.१९४२ या दिवशी त्याच ठिकाणी अन् त्याच खोलीत प.पू. डॉक्टरांचा जन्म झाला. खरे म्हणजे ‘माझा जन्म नागोठण्याला झाला’, असे सांगण्यात काहीच वैशिष्ट्य नाही; पण माझे धाकटे भाऊ प.पू. डॉक्टर यांना मी गुरुस्थानी मानत असल्यामुळे आणि काही वर्षांनी प.पू. डॉक्टरांचे जन्मस्थान तीर्थक्षेत्र बनणार असल्याने ‘माझा जन्मही नागोठण्याला त्याच घरात झाला’, असे सांगण्यात मला अभिमान वाटतो. अर्थात् ‘मला अभिमान वाटण्यासारखे यात माझे काहीच दायित्व नाही’, याची मला पूर्ण जाणीव आहे.

२ आ. लहानपणापासून ते एम्.डी.चे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यास करण्यातच सतत लक्ष असल्याने देवधर्म आणि अध्यात्म यांविषयी विचार न होणे : आमच्या घरी ती. दादा (वडील) प्रतिदिन देवपूजा करत असले, तरी ते पहाटे ६ – ६.३० वाजता पूजा करत असल्याने पूजेत आमचा सहभाग नसायचा. माझ्या लहानपणापासून ते एम्.डी.चे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यास करण्यातच माझे सतत लक्ष असल्याने मी देवधर्म आणि अध्यात्म यांविषयी विचार जवळजवळ केलेलाच नव्हता. मी २ वेळा प्रत्येकी १० दिवस प.पू. गोएंकागुरुजी यांचे इगतपुरी (जिल्हा नाशिक) येथे विपश्यनेच्या अभ्यासवर्गांना उपस्थित राहिलो.

२ इ. परीक्षेत पहिला क्रमांक येण्यासाठी संतांचे अभंग आणि गीतेतील अध्याय यांचा अभ्यास करणे; पण तरीही अध्यात्माची आवड उत्पन्न न होणे : गिरगाव (मुंबई) येथील आमच्या ‘आर्यन’ शाळेमध्ये शाळेतला पहिला अर्धा घंटा (तास) प्रार्थना व्हायची. शाळेतले वर्गशिक्षक इयत्ता ७ वीपर्यंत संतांचे अभंग अन् इयत्ता ८ वी ते ११ वीपर्यंत गीतेतील काही अध्याय शिकवायचे. ते विषय परीक्षेसाठी असल्याने माझा पहिला क्रमांक येण्यासाठी मी त्यांचाही चांगला अभ्यास केला; पण तरीही माझ्यात अध्यात्माची आवड उत्पन्न झाली नव्हती.

२ ई. आधुनिक वैद्यकशास्त्रात अनेक रोगांवर विशिष्ट औषध नसल्याचे लक्षात आल्यावर होमिओपॅथी आणि आयुर्वेद या दोन्हींचा अभ्यास करणे अन् आयुर्वेदातली ‘वैद्याचार्य’ ही उच्च पदवी मिळवणे : मी एम्.डी. (बालरोगतज्ञ) चा अभ्यास करतांना आणि २६ व्या वर्षी बालरोगतज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय चालू केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, आधुनिक वैद्यकशास्त्रात ५० टक्क्यांहून अधिक रोगांचे वर्णन नीट केलेले आढळते; पण ‘या रोगांवर विशिष्ट औषध नाही’, हे एकच वाक्य शेवटी लिहिलेले असायचे. त्या वेळी ‘होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यांमध्ये या रोगांवर काही उपचार असल्यास रुग्णांना लाभ होईल’, अशा दृष्टीने मी होमिओपॅथी आणि नंतर आयुर्वेदाचार्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ७ – ८ वर्षे आयुर्वेदाचा अभ्यास करून ‘वैद्याचार्य’ ही आयुर्वेदातली उच्च पदवीही मिळवली.

२ उ. रोग न्यून होण्यासाठी आयुर्वेदात शारीरिक, मानसिक उपचारांसह आध्यात्मिक उपायही सांगितलेले असल्याने अध्यात्माविषयी कुतूहल निर्माण होणे : त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘आयुर्वेदात मनाविषयी पुष्कळ चांगले ज्ञान सांगितले आहे आणि आत्म्याविषयीही थोडेसे ज्ञान सांगितले आहे. आयुर्वेदात शारीरिक आणि मानसिक उपचारांसह जवळजवळ प्रत्येक रोगासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायही सांगितले आहेत, उदा. ताप न्यून होण्यासाठी विष्णुसहस्रनाम म्हणायला सांगितले असून भूतबाधा, ग्रहपीडा यांचेही धडे असून त्यांत त्यांवर उपायही सांगितलेले आहेत. हे लक्षात आल्यावर माझ्या मनात अध्यात्माविषयी कुतूहल निर्माण झाले.

(क्रमशः उद्याच्या अंकात)