हिंदु राष्ट्र सर्वसमावेशकच !

बर्नार्ड जोसेफ यांनी ‘नॅशनॅलिटीज : इट्स नेचर अँड प्रॉब्लेम्स’ हे पुस्तक वर्ष १९२९ मध्ये लिहिले. त्यामध्ये एक प्रकरण भारतातील राष्ट्रीयत्वावर आहे. जोसेफ यांना ‘भारत हे राष्ट्र आहे’, हा मुद्दा विवाद्य वाटला. तरीही त्यांनी पुस्तकातील पृष्ठ २२८ वर हे मान्य केले आहे, ‘आधुनिक राष्ट्रीयत्वाची जी लक्षणे समजली जातात, ती भारताच्या प्राचीन इतिहासात आढळतात.’

१. भारताचा राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक एकता यांचे गमक हिंदुत्वात असणे

भारतात एकात्म राष्ट्राची कल्पना ही प्राचीन काळापासून आहे. सांस्कृतिकदृष्ट्या भारत सहस्रो वर्षांपासून एक राहिला आहे. वेदकाळापासून याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. राष्ट्रवादाचा प्रमुख निकष ‘एकता’ आहे. हे ऐक्य निरनिराळ्या समाजांत भिन्न मार्ग आणि तत्त्वे यांनी निर्माण होते अन् पुढे त्याचे संवर्धन होते. उदाहरणार्थ भूमीवरच्या प्रेमामुळे ग्रीक समाजात, व्यक्तीस्वातंत्र्याविषयीच्या प्रेमामुळे इंग्लिश समाजात राष्ट्रवादाच्या तत्त्वांचे संवर्धन झाले, असे इतिहास सांगतो. भारताचा राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक एकता यांचे गमक हिंदुत्वात आहे.

२. हिंदु समाज हा भारताचा कणा असणे

एखाद्या समाजातील घटकांत प्रदीर्घ काळापासून भूमीनिष्ठेसह एकत्वाची भावना नांदत असेल, तर त्या समाजास स्वत:स राष्ट्र म्हणवून घेता येऊ शकते. यानुसार हिंदुस्थानात हिंदु हेच राष्ट्र ठरते. हिंदु समाज हा या राष्ट्राचा कणा आहे. या समाजानेच या भूमीला स्वत:चे नाव देण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यास भरतभूमी, भारत म्हणा किंवा ‘इंडिया’ म्हणा. यांपैकी कोणतेही एक नाव घेतले की, डोळ्यांसमोर सहस्रो वर्षांच्या हिंदु समाजाच्याच घडामोडींचा इतिहास उभा रहातो !

३. ‘हिंदु’ हा शब्द देशाची ओळख असणे

हिंदूंना भारत सोडून जगात अन्य कोणताही देश नाही. ‘हिंदु’ हा शब्द सांप्रदायिक नाही वा ती राजकीय विचारधाराही नाही. ती या देशाची ओळख आहे. या शब्दावर हिंदूंच्या सर्व संप्रदायांतील लोकांचा जसा अधिकार आहे, त्याप्रमाणे हिंदुस्थानविषयी ज्यांना ममत्व आहे आणि या देशाच्या प्राचीन परंपरेविषयी ज्यांना आपुलकी वाटते, अशा कुणाही व्यक्तीला ‘हिंदु’ या शब्दावर सारखाच दावा सांगण्याचा अधिकार आहे, असे हिंदुत्व मानते.

४. काँग्रेसने सर्वसमावेशक हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला असला, तरी भारताचे नाव ‘हिंदु राष्ट्र’ हेच असणे

काँग्रेसने सर्वसमावेशक हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. त्यामुळे ‘हिंदु’ हा शब्द राजकीयदृष्ट्या त्याज्य ठरला; परंतु मुद्दा असा आहे की, त्यामुळे काँग्रेसला तिच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे या देशात हिंदी राष्ट्र निर्माण करता आले का ? हिंदी राष्ट्राची सीमा आणि हिंदी शासनाची सीमा हिंदी राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांच्या नजरेत एक होती; पण मग ‘अल्पसंख्य आणि नागरिक’ असे शब्दप्रयोग राष्ट्रवादाच्या दृष्टीने कसे होऊ शकतात ? या देशात कुणी अल्पसंख्य असेल, तर बहुसंख्य कोण आहेत आणि जर कुणी बहुसंख्य असतील, तर त्यांच्या राष्ट्राचे नाव काय आहे ?

याचे उत्तर शेवटी हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र असेच आहे. ‘या देशात एक जरी हिंदु शिल्लक राहिला, तरी हे हिंदु राष्ट्रच राहील’, असे रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार म्हणत. हिंदुत्व ही संकल्पना येथील राष्ट्रीयत्वाचा मूलाधार आहे.

५. हिंदु धर्माला गंगेचीच उपमा योग्य आणि हिंदु ही संकुचित संज्ञा नसून ती प्राचीन संस्कृतीची निदर्शकच !

हिंदुत्व प्रतिक्रियात्मक नसून विधायक आणि रचनात्मक आहे. जुलै १९९५ मध्ये रामकृष्ण मिशनवरील खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो हिंदुत्वास विरोध करणार्‍या मंडळींनी लक्षात ठेवण्याजोगा आहे. न्यायालयाने या निर्णयात मोनियर विल्यम्स यांच्या ‘रिलिजस थॉट अँड लाईफ इन इंडिया’ या ग्रंथातील दाखला दिला. तो दाखला असा, ‘हिंदु धर्म म्हणजे तथाकथित ब्राह्मणवादावर आधारलेला आणि ईश्वराचे अस्तित्व मानणारा धर्म आहे, असे म्हणणे योग्य नाही. या धर्माने काळाच्या ओघात अनेक मते, श्रद्धा आणि तत्त्वे आत्मसात केली आहेत. अनेक भिन्न प्रवाह सामावून घेऊन विशाल होत गेलेल्या गंगेचीच उपमा या धर्माला योग्य ठरेल. अध्यात्म साधनेचे आणि अंतिम सत्याप्रत जाणारे विविध मार्ग, अनेक देवदेवता मानणारा बहुदैवतवाद, निरीश्वरवाद, बौद्धांचा शून्यवाद, श्री शंकराचार्याचा अद्वैतवाद इत्यादींना एका सूत्रात गोवून या धर्माने एकत्र आणले आहे.’

या विषयाचे विवेचन करतांना न्यायमूर्तींनी विल्यम्स यांच्या समवेत स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉ. राधाकृष्णन्, अर्नोल्ड टॉयनबी यांचे लेखन आणि विचार यांचा आधार घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले विचार आपण लक्षात घेतले, तर ‘बुद्धीवादावर आधारलेल्या हिंदु धर्मात निरीश्वरवादी लोकांनाही स्थान आहे’, हे स्पष्ट होते. हिंदु ही संकुचित संज्ञा नाही, तर ती एका प्राचीन संस्कृतीची निदर्शक आहे.

६. पू. गोळवलकरगुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व हेच देशाचे राष्ट्रीयत्व आहे’, असे सांगणे

रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांनी स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या भूमिकेचे पुढे समर्थन केले. श्रीगुरुजी विशेषत: मुसलमान आणि ख्रिस्ती समाजास उद्देशून म्हणतात, ‘‘तुमचा उपासना पंथ कोणताही असो, भारत ही तुमची मातृभूमी आहे, असे तुम्ही एकदा मानले, म्हणजे तुम्ही सर्व हिंदूच ठरता.’’ (साभार : ‘श्रीगुरुजींचे विचार विश्व’, लेखक : ब.ल. वष्ट) ‘हिंदु हा या देशातील पायाभूत राष्ट्रीय समाज आहे; म्हणून हिंदुत्व हेच या देशाचे राष्ट्रीयत्व आहे’, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘हिंदुत्व’ या प्रबंधात मांडले. त्यांचा विचार संक्षेपात सांगायचा, तर ‘जगातील कुठल्याही राष्ट्राला अस्तित्वासाठी आधारभूत म्हणून एक नागरिक समूह लागतो. ज्या नागरिक समूहाचे हितसंबंध, आशा-आकांक्षा, इतिहास सारे काही त्या राष्ट्राशीच संबद्ध असते. हिंदूंचा भूतकाळ, वर्तमानकाळ नि भविष्यकाळ हिंदुस्थानशी घट्ट बांधलेला आहे; म्हणून हिंदु हेच येथे स्वयंमेव राष्ट्र आहे’. सावरकर यांनी तर्कशुद्ध पद्धतीत ही मांडणी केली.

७. अहिंदूंनी भारतास पुण्यभू मानले, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांना हिंदु मानण्यास सिद्धता दर्शवणे

हिंदुत्वाची भूमिका नित्य नूतन आणि विकसनशील आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचे परिशीलन केले, तर आपल्याला हेच आढळेल की, त्यांचा ‘पुण्यभू’चा आग्रह हा त्या काळाशी प्रासंगिक निश्चित होता; परंतु अहिंदूंनी भारतास पुण्यभू मानले, तर सावरकर त्यांनाही हिंदु मानावयास सिद्ध होते. ‘आपल्या सामायिक मातृभूमीला तुम्ही संपूर्ण प्रेम अर्पण करा आणि तिला केवळ पितृभू न समजता पुण्यभूही समजा. हिंदु समाज तुमचे स्वागत करील.’ (‘समग्र सावरकर वाङ्मय’, खंड ६, पृष्ठ ७४)

याच पृष्ठावर स्वातंत्र्यवीर सावरकर बोहरा, खोजा, मेमन, मुसलमान आणि ख्रिस्ती यांनाही वरील आवाहन करतात आणि पृष्ठ ५४ वर ते म्हणतात, ‘कदाचित् पुढे मागे हिंदु म्हणजे हिंदुस्थानचा केवळ नागरिक अन् अन्य कुणीही नाही, अशा प्रकारची गोष्ट घडून येणारच नाही, असे नाही. असे असले, तरी तो दिवस तेव्हाच उगवेल, जेव्हा आक्रमक आणि स्वार्थी वृत्तीचे हात बळकट करणारे जातीय अन् सांस्कृतिक दुराभिमान गळून जातील, तसेच हे सारे धर्म जेव्हा स्वतःचा संकुचितपणा सोडून विश्वाच्या तळाशी असलेल्या सनातन तत्त्वांच्या विचारांचे सर्वांचे असे एक जागतिक पीठ निर्माण करतील.’ (‘समग्र सावरकर वाङ्मय’, खंड ६)

८. ‘मी हिंदु आहे, मी हिंदी आहे, मी भारतीय आहे’, हीच खरी राष्ट्रीयत्वाची भावना !

ज.द. जोगळेकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक होते. ‘हिंदुत्व, भारतीयत्व आणि निधर्मी शासन’, या पुस्तकात ते म्हणतात, ‘सावरकर यांनी मांडलेला पुण्यभूचा मुद्दा आपण बाजूला ठेवू आणि या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू. समजा भारतातील ख्रिस्ती वा इस्लामी संप्रदायाच्या लोकांनी आपल्याला हिंदु म्हणवून घेण्याचे ठरवले, तर त्याला कोण प्रतिबंध करू शकेल ?’ ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘हिंदु या नावावर अधिकार स्थापन करणे, हे ज्या त्या जातीच्या किंवा संप्रदायाच्या इच्छेवर अवलंबून आहे. हिंदु हे नाव ‘राष्ट्रीय संपत्ती’ आहे. त्या नावावर भारतात कायम निवास करणारा कुणीही अधिकार सांगू शकतो.’

खरी गोष्ट अशी आहे की, राष्ट्रीयत्व ही भावनिक गोष्ट आहे. तिचा आधार भावना आहे. ती लादण्यासारखी गोष्ट नाही. सैन्यात सक्तीची भरती होते, त्याप्रमाणे राष्ट्रीयत्वात सक्तीने भरती करता येणार नाही. खरी भावना अशी की, जी व्याख्येच्या, कायद्याच्या, नियमाच्या कक्षेत धरून ठेवता येत नाही. भावनेचा खरा उद्रेक झाला की, ‘पितृभू’ नि ‘पुण्यभू’ असा शब्दच्छल न करताच एखादा उद्घोष करेल, ‘मी हिंदु आहे, मी हिंदी आहे, मी भारतीय आहे.’ त्याने काहीही घोष केला, तरी त्याचा अंतिम अर्थ एकच रहाणार.

– श्री. रवींद्र माधव साठे, महासंचालक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सचिव, सावरकर दर्शन प्रतिष्ठान