उत्तर कोरियाने जपानवरून सोडलेले क्षेपणास्त्र आणि भारताची सुरक्षा !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. उत्तर कोरियाने सोडलेले क्षेपणास्त्र जपानच्या आकाशावरून जाऊन समुद्रात पडल्याने खळबळ निर्माण होणे आणि ते क्षेपणास्त्र जपानसाठी पुष्कळ हानीकारक ठरणार असणे

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र सोडले होते. ते जपानच्या आकाशावरून २ सहस्र किलोमीटर पुढे जाऊन पॅसिफिक समुद्रात पडले. अर्थात् त्यामुळे जपानची कोणतीही हानी झालेली नाही; पण ही अत्यंत धोकादायक परिस्थिती होती. त्यामुळे जपानमध्ये अतीसतर्कतेची चेतावणी देण्यात आली. जे लोक उंच इमारतींमध्ये रहातात, त्यांना खाली येण्यास सांगण्यात आले. त्या क्षेत्रातून होणारी विमानांची उड्डाणे रहित करण्यात आली, तसेच समुद्रात गस्तही घालण्यात आली इत्यादी.

उत्तर कोरिया हा अतिशय धोकादायक देश आहे, हे सर्वश्रुत आहे. यावर ‘दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात युद्धाभ्यास चालू आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने अशा प्रकारचे क्षेपणास्त्र सोडले आहे’, असे स्पष्टीकरण उत्तर कोरियाने दिले आहे. हे क्षेपणास्त्र जपानवर सोडण्यात आले नव्हते; पण त्याचा पल्ला अतिशय लांब असल्याने ते जपानच्या आकाशातून उडाले आणि त्याच्या पुष्कळ पुढे जाऊन समुद्रात पडले. एवढे निश्चित की, त्याचा पल्ला अल्प पडला असता, तर त्यातून जपानला धोका निर्माण झाला असता अन् प्रचंड हानी झाली असती.

२. जगाने उत्तर कोरियाच्या दायित्वशून्यतेचा निषेध करून त्याच्यावर दबाव निर्माण करणे आवश्यक !

येथे लक्षात घेतले पाहिजे की, सध्याच्या परिस्थितीत जगात अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनला धमकी दिली होती की, तुम्ही नीट वागला नाहीत, तर रशियाकडे असलेले अणूबाँब तुमच्यावर वापरण्यात येतील. चीनही वाटेल तसे दायित्वशून्यतेने वागत असतो. अनेक वेळा चीनची विमाने तैवानच्या हद्दीत येऊन त्याच्यासाठी धोका निर्माण करतात. अशा परिस्थितीतच उत्तर कोरियाच्या दायित्वशून्य घटनेचा समावेश झाला आहे.

उत्तर कोरियाकडे लघु, मध्यम आणि लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे आहेत. त्यांचा पल्ला हा ५०० किलोमीटर ते ३ सहस्र किलोमीटर इतका आहे. त्यामुळे उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे म्हणजे जगाच्या शांततेसाठी मोठा धोकाच आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडे अणूबाँबही आहे आणि ‘त्याचा तो अत्यंत दायित्वशून्यतेने वापर करण्याची शक्यता आहे’, असे अनेकांना वाटते. मला वाटते की, या घटनेचा सर्व जगाने निषेध केला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हा विषय उचलून धरून उत्तर कोरियावर दबाव आणला पाहिजे.

३. जपानच्या घटनेपासून बोध घेऊन भारताने चीनपासून सुरक्षित रहाण्यासाठी पूर्वाभ्यास करावा !

जगाने या घटनेचा जर निषेध केला नाही, तर चीनही अशा प्रकारचे कृत्य व्हिएतनाम किंवा भारत यांच्या संदर्भात करील आणि ते अतिशय धोकादायक ठरेल. त्यामुळे जगाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि उत्तर कोरियाला समज दिली पाहिजे. ‘ग्रे झोन’ (शांतता क्षेत्र) किंवा ‘हायब्रीड’ (एकही गोळी न चालवता केलेले युद्ध) युद्धात चीनकडून अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतानेही अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावर ओढवली, तर त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतो आणि आपले रक्षण कशा प्रकारे करू शकतो, याचा आधीच अभ्यास करणे आवश्यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.