मंगळुरू येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांची कु. कुहु पाण्डेय यांना जाणवलेले दैवी गुणवैशिष्ट्ये

‘माझे नाव भार्गवराम, रामराम ।’ याच शब्दांत पू. भार्गवराम यांनी मला त्यांचा परिचय करून दिला. ज्यांच्या नावातच राम आहे आणि जे आपला परिचय करून देतांनासुद्धा प्रभु श्रीरामाची साथ सोडत नाहीत, अशा महान संतांचे वर्णन मी शब्दांमध्ये कसे करू ? त्यांची मला जाणवलेली दैवी गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती मी श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करते.

पू. भार्गवराम भरत प्रभु
कु. कुहु पाण्डेय

१. सहनशीलता

एकदा त्यांचा दात पुष्कळ दुखत होता. वयाने लहान असूनही ते दाताचे दुखणे आनंदाने सहन करत होते. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांचा दात दुखत आहे’, असे वाटतही नव्हते. ते नेहमीप्रमाणेच आनंदी दिसत होते. त्यांच्या आईने सांगितल्यावरच मला त्यांचा दात दुखत असल्याचे समजले.

२. मनमिळावू स्वभाव

पू. भार्गवराम यांचा सर्वांत आकर्षित करणारा गुण, म्हणजे ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी अगदी क्षणभरात सहजतेने मिसळून जातात. समोरच्या व्यक्तीची प्रकृती आणि स्थिती पाहून ते तिच्याशी संवाद साधतात. ‘समोरच्या व्यक्तीला आनंद कसा द्यायचा ?’, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.

३. आईविषयी आदर असून तिचे आज्ञापालन करणे

त्यांच्या नावात जसा ‘राम’ आहे, तशी त्यांची कृतीही रामासारखीच आदर्श असते. एकदा ते एका साधिकेसमवेत भ्रमणभाषवर एक चलचित्र (व्हिडिओ) पहात होते. त्यानंतर त्यांना दुसरे चलचित्र पहायचे होते. त्यांची झोपण्याची वेळ झाली असल्याने दुसर्‍या चलचित्राला आरंभ करण्यापूर्वी साधिकेने त्यांना ‘आणखी एक चलतचित्र पाहू का ?’, हे आईला विचारून या’, असे सांगितले. ते ऐकताच एका क्षणाचाही विलंब न करता ते आईकडे धावत गेले. आईने होकार दिल्यावरच ते परत आले आणि त्यांनी अत्यंत विनम्रतेने सांगितले, ‘‘आईने ‘हो’, असे सांगितले आहे.’’

या प्रसंगात त्यांची कृती आदर्श होतीच. त्याच समवेत कृती करतांना त्यांच्या तोंडवळ्यावरील हावभाव पाहून त्यांच्या मनात असलेला आईविषयी आदर आणि ‘विचारून योग्य कृती करण्याचा संस्कार’ही स्पष्टपणे दिसून येत होता. ते पाहून माझ्या मनात त्यांच्याप्रतीचा आदर आणखी वाढला.

४. कुशाग्र बुद्धी

त्यांच्याशी खेळतांना ‘त्यांच्या बोलण्यावरून एवढ्या लहान वयातही त्यांची विचारप्रक्रिया, शब्दांची निवड, निरीक्षणक्षमता आणि आकलनक्षमता विलक्षण आहे’, हे लक्षात येते.

५. उत्तम निरीक्षणक्षमता

एकदा त्यांनी माझी कपडे ठेवायची ‘बॅग’ पाहिली. मी ‘बॅगे’ची ‘चेन’ उघडायचे, तेव्हा सामान आत ठेवतांना मला तिची ‘चेन’ एका हाताने पकडून ठेवावी लागत होती. हे पाहून ते म्हणाले, ‘‘पुढच्या वेळी अशी ‘बॅग’ आण की, ‘चेन’ उघडतांना तुला ‘बॅग’ अशी पकडून ठेवावी लागणार नाही. त्यामुळे तिच्यात दोन्ही हातांनी सहजतेने कपडे भरता येतील.’’ एवढ्या लहान वयातही त्यांचा हा विचार ऐकून मी निःशब्द झाले.

६. अखंड अनुसंधानात असणे

अनेकदा ते खेळतांना एकाएकी शांत आणि स्थिर बसून रहातात. एकदा ते म्हणाले, ‘सर्वांनी शांत बसून मुद्रा करत नामजप करूया.’’ त्यानंतर माझ्यासारख्या अज्ञानी जिवालाही वातावरणातील शांतता अनुभवता आली.

७. प्रतिकूल परिस्थितीत सर्वप्रथम ईश्वराचेच स्मरण करणे

एकदा पू. भार्गवराम यांना विजेचा कडकडाट ऐकून भीती वाटली. विजेचा कडकडाट ऐकताच सामान्यतः मूल आपल्या आईकडे पळत जाते; परंतु ते त्वरित म्हणाले, ‘‘सर्व देवतांना बोलवा. सर्वांना बोलवा.’’ यांच्या या कृतीतून ‘प्रतिकूल परिस्थिती आल्यावर सर्वप्रथम ईश्वराचेच स्मरण करावे’, ही शिकवण मला मिळाली.

८. अखंड वर्तमानात राहून प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे

पू. भार्गवराम यांच्या समवेत रहातांना मला ‘भाव आणि भावना’ यांमधील भेद अनुभवता आला. ते सर्वांशी जोडलेले असतात, तरीही ते कुणामध्येच अडकत नाहीत. ते अखंड वर्तमानात रहतात. ‘वर्तमानकाळात राहून प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा’, हे मी त्यांच्याकडून शिकले.

९. व्यापकत्व

त्यांचे प्रेम केवळ माणसांपुरतेच मर्यादित नसते. ‘ते लहानशा मुंगीचाही विचार करतात.’ एकदा पू. भार्गवराम यांनी सरबत बनवले होते. ते प्यायल्यानंतर सरबताचे काही थेंब भूमीवर पडले होते. तेव्हा काही मुंग्या पू. भार्गवराम यांनी बनवलेल्या अमृतरूपी सरबताचे रसपान करायला धावत आल्या. मी सरबताचे पडलेले थेंब पुसणार इतक्यात पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘थांबा, मुंग्या आल्या आहेत. त्यांनासुद्धा सरबत पिऊ द्या.’’ हे ऐकून माझी भावजागृती झाली.

१०. प्रीती

१. एकदा त्यांची आई हातांत काही सामान घेऊन ‘बस’मध्ये चढत होती. तेव्हा त्या बसमध्ये चढण्यापूर्वी पू. भार्गवराम यांनी  मागे वळून पाहिले आणि ‘आईला सामान घेण्यासाठी कुणाचे साहाय्य लागेल का ? आईला त्रास तर होणार नाही ना ?’, याची निश्चिती करूनच ते बसमध्ये चढले.

२. एकदा एक बालसाधिका रडत होती. त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांना समजले की, ‘ती तिच्या आईला शोधत आहे.’ त्या वेळी ते पळत गेले आणि तिच्या आईचा हात धरून तिला त्या बालसाधिकेच्या समोर आणले.

११. कृष्णाप्रमाणे लीला करून समष्टीला आनंद देणे

मी खोलीत आल्यावर ते कधी मागून येऊन माझी ओढणी पकडून लपायचे, तर कधी एकाएकी स्थिर उभे रहायचे. हे सर्व करून ते आपल्या सुंदर लीलांनी मला आनंद देत होते. थोडक्यात वरवर जरी ते नटखट (खोडकर) वाटले, तरी ‘प्रत्यक्षात या सर्व त्यांच्या गोड ‘कृष्ण लीला’च आहेत आणि त्यांतून ते समष्टीला आनंदच देत आहेत’, असे मला जाणवले.

१२. ‘प्रत्येक चांगल्या गोष्टीचा समष्टीला लाभ व्हावा’, असा विचार करणे

ते प्रतिदिन आपल्या पवित्र हातांनी आम्हाला (फळांच्या रसांचे) सरबत बनवून द्यायचे. सरबत बनवल्यानंतर ते स्वतः चाखून पहायचे. ‘त्यात आणखी रस घालायचा कि पाणी घालायचे ?’, हेसुद्धा ते आम्हाला विचारायचे. त्यानंतरच ते सर्वांना सरबत द्यायचे. त्यानंतर आम्ही त्यांना ‘सरबत पुष्कळ चांगले झाले आहे’, असे सांगितल्यावर ते त्वरित आम्हाला ‘किती प्रमाणात सरबत आणि किती प्रमाणात पाणी घालून त्यांनी ते सरबत बनवले आहे’, हे सांगायचे.

नेहमी आपण काही चांगले केले किंवा ईश्वराने आपल्याला काही सुचवले, तर ते आपण आपल्यापुरतेच मर्यादित ठेवतो; परंतु पू. भार्गवराम मात्र ‘समष्टीलासुद्धा याचा लाभ व्हावा’, असा विचार करतात.

१३. राष्ट्राप्रती प्रेम

अ. पू. भार्गवराम त्यांच्याकडे असलेल्या खेळण्यांचे वर्णन करतांना सर्वांत भक्कम खेळण्याविषयी बोलतांना सांगायचे, ‘‘हे खेळणे भारतात बनवलेले (‘मेड इन इंडिया’) आहे.’’

आ. एकदा दोन गाड्यांची शर्यत लावतांना ते म्हणाले  ‘‘ही गाडी भारताची आहे, हीच जिंकणार !’’ त्यांचे हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

इ. त्यांच्या मनात आपल्या देशाच्या पंतप्रधानांविषयी पुष्कळ आदर आहे. हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येते.

– कु. कुहु पाण्डेय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२२)