मुसलमानांविषयी कथित आक्षेपार्ह विधानांवरून जितेंद्र त्यागी न्यायालयात शरण

जितेंद्र त्यागी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर २०२१ या काळात झालेल्या धर्मसंसदेत मुसलमानांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून शिया सेंट्रल बोर्डाचे माजी प्रमुख जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) न्यायालयात शरण आले. पोलिसांनी त्यांना अटक करून कारागृहात नेले. त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने ३ मासांसाठी अंतरिम जामीन संमत केला होता. त्याचा कालावधी संपल्यावर त्यागी यांनी शरणागती पत्करली. शरणागतीपूच्या जितेंद्र त्यागी यांनी भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी यांनी भेट घेतली, तसेच श्री निरंजनी आखाडा परिषदेच्या काही संतांची भेट घेतली.

सनातन धर्मासाठीच्या लढाईमध्ये मी एकटा पडलो आहे ! – जितेंद्र त्यागी  

जितेंद्र त्यागी म्हणाले की, जेव्हापासून मी सनातन धर्माचा स्वीकार केला आहे, तेव्हापासून काही जण माझ्या मागे लागले आहेत. या लढाईमध्ये मी एकटा झालो आहे. याची मला कोणतीही खंत नाही; कारण मी विचारपूर्वक सनातन धर्म स्वीकारला आहे. ज्वालापूरच्या काही लोकांनी रोशनाबाद कारागृहात मला ठार मारण्याचा कट रचला होता; मात्र कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांचा कट यशस्वी होऊ शकला नाही.

 हिंदु धर्म स्वीकारून त्यागी यांना काय मिळाले ? – श्रीमहंत रवीद्रपुरी यांची खंत  

श्रीमहंत रवीद्रपुरी

श्रीमहंत रवींद्रपुरी यांनी म्हटले की, जितेंद्र त्यागी यांच्या कारागृहात जाण्यामुळे संतांना त्रास होत आहे. हिंदु धर्म स्वीकारून त्यागी यांना शेवटी काय मिळाले ? सर्व संतांनी त्यागी यांना साथ द्यायला हवी होती; मात्र सर्वांनी साथ दिली नाही. काही संतांनी त्यांना मध्येच सोडून दिले.

शांभवी पीठाधीश्‍वर स्वामी आनंद स्वरूप यांनी म्हटले की, मी जितेंद्र त्यागी यांच्यासमवेत खांद्याला खांदा लावून उभा आहे. या युद्धात आम्ही त्यागी यांच्यासमवेत सतत राहू.