आज नागपंचमी आहे. त्या निमित्ताने…
श्रावण मासातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते.
१. तिथी
नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो.
२. इतिहास
अ. सर्पयज्ञ करणार्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.
आ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता.
इ. ५ युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले, ‘जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन.’ त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
३. नागपूजनाचे महत्त्व
अ. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत श्रीकृष्ण स्वतःची विभूती सांगतो.
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ।।
– श्रीमद्भगवदगीता, अध्याय १०, श्लोक २९
अर्थ : मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे अन् पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर, तसेच शासन करणार्यांमध्ये यमराज मी आहे.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)