रेल्वेतील चोरीला आळा घालण्याची आवश्यकता !

१. रेल्वेमध्ये भ्रमणभाषसंच चोरणार्‍या चोरट्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागणे, तर काहींना कायमचे अपंगत्व येणे

१ अ. मुंबईची ‘जीवनरेखा’ असणारी लोकल म्हणजे गुन्हे करण्याचा मुख्य स्रोत असणे : ‘काही मासांपूर्वी एक घटना घडली. कामावर रूजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी घरी परतत असतांना ठाणे-कळवा स्थानकाच्या काळात भ्रमणभाषसंच चोरट्यांशी झालेल्या झटापटीत विद्या पाटील यांना जीव गमवावा लागला. अशा घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. त्याच्या बातम्या ऐकून काही दिवस हळहळ व्यक्त होते आणि त्यानंतर आपण ही प्रकरणे विसरून जातो. मुंबईची ‘जीवनरेखा’ म्हटली जाणारी लोकल वर्षानुवर्षे अनेक चोर, भामटे यांचा गुन्हे करण्याचा मुख्य स्रोत आहे.

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

१ आ. पाकिटे आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यापेक्षा भ्रमणभाषसंच चोरण्याकडे चोरट्यांचा अधिक कल असणे : सध्या प्रत्येकाच्या हातात ‘अँड्रॉईड’ भ्रमणभाषसंच असल्यामुळे पूर्वी ज्या चोरांचा कल पाकीट चोरण्याकडे किंवा सोन्या-चांदीचे दागिने चोरण्याकडे असे, ते आता भ्रमणभाषसंच चोरण्याकडे अधिक लक्ष देतात. पाकीट किंवा अन्य सामानाची चोरी करण्यापेक्षा भ्रमणभाषसंच चोरणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे असते. बहुतांश लोक तो खिशात नव्हे, तर हातातच ठेवतात. पूर्वी गर्दीमध्ये शिरून मोठा धोका पत्करून चोरी करावी लागत असे. आता लोकलच्या गर्दीत, रेल्वेत किंवा गर्दीमध्ये न शिरताही अल्प धोका पत्करून असे भामटे चोर्‍या करत असतात.

१ इ. हातावर फटका देऊन भ्रमणभाषसंच चोरला जात असल्याने प्रवाशांचा तोल जाऊन जीवितहानी होणे : लोकल येण्यापूर्वी विशिष्ट ठिकाणी उभे राहून दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर दगड मारणे किंवा स्थानक येण्यापूर्वी जेथे लोकलचा वेग न्यून होतो, तेथे उभे राहून काठीने किंवा हाताने प्रवाशांच्या हातावर फटका मारणे अशा प्रकारचे कृत्ये चोरटे करतात. अचानक हातावर फटका बसल्याने संबंधित प्रवाशाच्या हातातील भ्रमणभाषसंच किंवा अन्य साहित्य खाली पडते. साखळी ओढण्याचा प्रयत्न केला, तरी चोर लोकल थांबण्याच्या आधीच भ्रमणभाषसंच किंवा हातातून पडलेले साहित्य घेऊन पसार होतो. अशा फटक्यांमुळे अनेक प्रवाशांचा तोल जाऊन काहींना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

२. आरोपीला कठोर शिक्षा होत नसल्यामुळे त्यांनी परत परत चोर्‍या करणे

२ अ. चोरांकडून भ्रमणभाष चोरण्यापूर्वी पहाणी केली जाणे : अनेकदा डब्यात गर्दी अल्प असतांना कोणत्या व्यक्तीचा भ्रमणभाषसंच आपण चोरू शकतो, याची पहाणी चोर करून ठेवतात. त्यानंतर स्थानकावरून गाडी निघत असतांना असा भ्रमणभाषसंच चोरून धावत्या गाडीतून चोरटे पसार होतात. बर्‍याचदा महिलांच्या डब्यामध्ये रात्री गर्दी अल्प असल्यामुळे असे प्रकार घडतात.

२ आ. सराईत गुन्हेगार असणार्‍यांना चोर्‍यांची सवय होणे : गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये अशा प्रकरणात एकूण प्रविष्ट असलेल्या गुन्ह्यांमध्ये उकल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहिले, तर ते २५ च्या वर नाही. जितके गुन्हे उघड झाले, त्यापैकी किती आरोपींना शिक्षा झाली, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. आरोपीला जर शिक्षा झाली नाही, तर त्याला कायद्याची भीती रहात नाही. अशा प्रकरणांमध्ये असलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असतात. त्यामुळे त्यांना अशा चोर्‍यांची सवय झालेली असते. शिक्षा झाली आणि त्यातून सुटले की, ते परत त्याच कामाला लागतात.

२ इ. सण-उत्सवांच्या काळात, तसेच गर्दीच्या वेळी चोरी करण्याचा उद्देश साध्य करणे : गणेशोत्सव, तसेच नवरात्रोत्सव अशा काळात अनेक आरोपी परराज्यातील गावांहून केवळ चोरी करण्याच्या उद्देशानेच मुंबईत येतात. काही गावांमधील सर्व लहान मुले समजायला लागल्यापासून अशा प्रकारचे गुन्हे करू लागतात. काही आरोपी भ्रमणभाषसंच चोरण्यासाठी विमानाने आले असल्याचेही उघड झाले होते. सणावाराच्या वेळी जेव्हा लोकलमध्ये गर्दी असते, तेव्हा यायचे आणि आपले काम (चोरी) करून निघून जायचे, असे अनेक जण करत असतात.

३. बाल अपचार्‍यांना (बाल गुन्हेगारांना) बालसुधारगृहात न पाठवता ‘बाँड’वर सोडून देण्यात आल्याने त्यांच्यात सुधारणा न होता ते अट्टल गुन्हेगार बनणे

जे आरोपी पकडले जातात, त्यांपैकी जर १८ वर्षांखालील कुणी असेल, तर त्याच्यावर फौजदारी खटला चालवता येत नाही. तर ‘जुवेनाईल जस्टिस बोर्ड’ ( बाल न्याय मंडळ) समोर चौकशी केली जाते. अशा आरोपींना अधिवक्ता न करता किंवा कुठलाही खर्च न करताही या सर्व प्रकरणातून बाहेर पडता येते. त्यांनी जरी गुन्हा केल्याचे मान्य केले, तरी गंभीर गुन्हे सोडून अन्य सर्व गुन्ह्यांतील ‘बाल अपचारी’ (१८ वर्षाखालील आरोपी) यांना चांगल्या वागणुकीच्या बाँडवर सोडण्याची तरतूद कायद्यामध्ये असल्यामुळे असे ‘बाल अपचारी’ त्वरित सर्व प्रकियेतून सुटतात. पोलिसांनी पकडल्यावर बाहेर पडण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करायचा, याची माहिती असल्यामुळे सुटल्यावर पुन्हा ते याच कामातून गुंतून जातात. बाल अपचारी जर चौकशीच्या वेळी दोषी आढळले, तर त्यांना ३ वर्षांपर्यंत सुधारगृहांमध्ये पाठवण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. अशा साध्या गुन्ह्यातील आरोपींना बाँडवर सोडल्यामुळे त्यांना सुधारगृहात जाण्याची वेळ येत नाही. पर्यायाने काही जणांना सुधारण्याची संधी मिळत नाही. परिणामी भविष्यात ते अट्टल गुन्हेगार होऊ शकतात.

लहान वयात असतांना रेल्वेच्या लहान मोठ्या प्रकरणांमध्ये बाँडवर सुटलेल्या आरोपींचा सहभाग मुंबईसह देशाला हादरून टाकणार्‍या एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामध्ये आढळून आला होता. जर अज्ञानी असतांना, म्हणजे लहान असतांना त्याला वेसण घातली गेली असती, तर कदाचित असा गंभीर गुन्हा घडला नसता, असे वाटते.’

– अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, विशेष सरकारी अधिवक्ता, मुंबई.