कन्हैयालाल यांच्या हत्येचे धागेदोरे इस्लामिक स्टेटशी !

आरोपी रियाज अन्सारी गेल्या ५ वर्षांपासून करत होता इस्लामिक स्टेटच्या ‘अलसुफा’ गटासाठी काम !  

नवी देहली – इस्लामिक स्टेट ही जिहादी आतंकवादी संघटना करते तशा पद्धतीने राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यातील एक आरोपी रियाज अन्सारी याचे इस्लामिक स्टेटच्या ‘स्लिपर सेल’चा (आतंकवाद्यांना स्थानिक ठिकाणी साहाय्य करणारे) गट असलेल्या ‘अलसुफा’शी संबंध असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी यातील अन्य एक आरोपी महंमद गौस याचे पाकमधील ‘दावत-ए-इस्लामी’ या जिहादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. गौस हा वर्ष २०१५ मध्ये पाकिस्तामध्ये जाऊन या संघटनेकडून जिहादचे प्रशिक्षण घेऊन आला होता. पोलिसांनी ‘दावत-ए-इस्लामी’शी संबंधित लोकांची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, रियाज हा ५ वर्षांपासून ‘अलसुफा’साठी उदयपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांत काम करत होता. आधी तो जिहादी आतंकवादी मुजीब याच्या हाताखाली होता. तो त्यांच्या भागात अडीच मासांंपासून अलसुफाचे नेतृत्व करत होता. मुजीब सध्या कारागृहात आहे. टोंक येथील मूळ रहिवासी मुजीब दीर्घकाळापासून उदयपूरमध्ये पर्यटकांचा मार्गदर्शक (गाइड) म्हणून काम करत होता. त्याने त्या भागात ‘अलसुफा’चे जाळे निर्माण केले. रियाज त्याच्यासाठी सर्वांत विशेष होता.

२. मुजीबच्या अटकेनंतर रियाजही एन्.आय.ए.च्या रडारवर होता. मुजीबच्या चौकशीमध्ये मुजीब आणि रियाज अनेकदा भेटल्याचे आणि भ्रमणभाषवर दीर्घकाळ बोलल्याचे पुरावे मिळाले आहेत. एन्.आय.ए. रियाज याच्या मुसक्या आवळण्याची सिद्धता करत असतांनाच त्याने कन्हैयालाल यांची हत्या केली.

३. पोलिसांनी ३० मार्च या दिवशी चित्तोडगडच्या निम्बाहेडामध्ये मुजीबसह ३ जिहादी आतंकवाद्यांकडून १२ किलो स्फोटके जप्त केली होती. यातून जयपूरसह अन्य ठिकाणी साखळी बाँबस्फोट करण्याचा त्याचा कट होता. ही स्फोटके अलसुफानेच रतलाम येथून पाठवली होती. पकडलेल्या २ आतंकवाद्यांच्या भ्रमणभाषची तपासणी केल्यावर त्यात पाकिस्तानसह अनेक देशांचे क्रमांक मिळाले.

४. कन्हैयालाल यांची  क्रूर पद्धतीने करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करण्याचा आदेश पाकिस्तानातील आतंकवाद्यांच्या प्रमुखाने दिला होता, जेणेकरून अधिकाधिक दहशत निर्माण होईल. दोघे हत्येनंतर अजमेर दर्ग्यात जाऊन दुसरा व्हिडिओ बनवणार होते. या दोघांनीच कन्हैयालाल यांना ठार मारण्यासाठी सुरा बनवला होता. त्यांनी कन्हैयालाल यांच्यावर २५ हून अधिक वार केले. यातील ७-८ वार मानेवर केले, तसेच कन्हैयालाल यांचा हातही तोडला होता.

५. रियाज हा भिलवाडा, तर गौस हा राजसमंद येथील रहिवासी आहे. रियाज याने २० वर्षांपूर्वीच घर सोडले आणि तो उदयपूर येथे राहू लागला होता. हे दोघे उदयपूरमध्ये भाड्याने रहात होते. रियाज आधी अर्थपुरवठा करणार्‍या आस्थापनात होता. गौस वेल्डिंगचे काम करतो. दोघांची भेट झाल्यावर ते धर्माच्या नावावर युवकांचा बुद्धीभेद करू लागले. ते युवकांना अलसुफामध्ये भरती करत होते. ते दोघेही पाकमध्ये दावत-ए-इस्लामीकडे जाऊन प्रशिक्षण घेऊन आले होते. या दोघांना अरब देशांतून पैसे मिळत होते.

१० वर्षांपूर्वी स्थापन झाला होता अलसुफा गट !

अलसुफाची गटाची स्थापना वर्ष २०१२ मध्ये रतलाम येथे झाली. एन्.आय.ए.ने वर्ष २०१५ मध्ये याचा प्रमुख असजदला अटक केली. वर्ष २०१७ मध्ये रतलाम हत्याकांडात या गटाच्या ८ लोकांना अटक झाल्यानंतर हा गट फुटला. यावर्षी तो पुन्हा सक्रीय झाला.