अल्पवयिनांमधील हिंसकता !

अल्पवयीन मुलाने वडिलांचे पिस्तूल घेऊन केली आईची हत्या !

लक्ष्मणपुरीमधील (लखनौमधील) एक हत्या प्रकरण सध्या पुष्कळ चर्चेत आहे. ‘पबजी’ खेळण्यास विरोध केल्याने १६ वर्षीय म्हणजेच अल्पवयीन मुलाने वडिलांचे पिस्तूल घेऊन आईची हत्या केली. अशा स्वरूपाच्या घटना आता नवीन नाहीत; कारण आज सर्वत्रच नैतिकतेचा र्‍हास झालेला असल्याने आणि कुटुंबव्यवस्था मोडकळीस येत असल्याने कुणीही उठतो अन् सग्या-सोयर्‍यांची हत्या करतो; कुणीही येतो अन् आपल्या पोरीबाळी, बहिणी यांच्यावर बलात्कार करून मोकळा होतो. ‘लज्जा’ नावाची गोष्टच उरलेली नाही. थोडक्यात काय तर ‘नातेसंबंधांचीच ऐशीतैशी झालेली आहे’, असे म्हणता येईल. लक्ष्मणपुरीच्या प्रसंगात गुन्हेगार ठरलेला मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. तेथील अन्य मुलांशी बोलतांना त्याने सांगितले, ‘‘मी आईची हत्या केल्याचा मला कोणताही पश्चात्ताप झालेला नाही.’’ आईची हत्या करून त्याने स्वतःच्या बहिणीला ३ दिवस खोलीत कोंडले होते आणि आईच्या मृतदेहासमवेतच तो रहात होता. मुलगा दंडाधिकार्‍यांना म्हणाला, ‘‘मी हत्या केली; म्हणून अधिकाधिक काय होईल ? तर मला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. माझी त्यासाठी सर्व सिद्धता आहे. मी आईची हत्या केल्यावर रात्रभर मित्रांसमवेत मेजवानीही केली. वडिलांना ‘व्हिडिओ कॉल’ करून हत्या झालेला आईचा मृतदेह दाखवला.’’ मुलाची ही मानसिकता पाहून खरोखर मन सुन्न होते. इतक्या टोकाची मानसिकता आजच्या मुलांमध्ये निर्माण होत आहे. खरेतर स्वतःच्या आईची हत्या करण्याचा विचारही कुणाच्या मनात येऊ शकत नाही. रागाच्या भरात हातून काही घडले, तर त्याचा निदान पश्चात्ताप तरी होतो. येथे तर जन्मदात्या आईची हत्या केलीच; पण त्याविषयी त्याला ना कसली चिंता, ना कुठलाही पश्चात्ताप ! इतके क्रौर्य करण्याची निगरगट्ट मानसिकता कशी काय निर्माण होऊ शकते ? आईची हत्या करून एखादा भाऊ आपल्याच बहिणीला खोलीत कोंडून ठेवतो, यावरून त्याच्या मनात आई-बहीण यांच्याविषयी ‘प्रेम’ नावाची भावनाच नव्हती, हे लक्षात येते. आई-वडील आणि भाऊ-बहीण या चौकोनी कुटुंबातच अनेक भावना दडलेल्या असतात ! एकमेकांप्रती आदर, ममत्व आणि आपलेपणा असतो; पण ‘सध्याच्या पिढीने ही जीवनमूल्ये जणू काही खुंटीलाच टांगली आहेत’, असे वाटते. नात्यांची गुंफण जेवढी घट्ट आणि त्यांत जेवढी ओढ असते, तेवढा आयुष्याचा प्रवास सुकर अन् आनंदी होतो.

लक्ष्मणपुरीच्या प्रसंगात ‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? त्यांनी त्याच्यावर सुसंस्कार केले नाहीत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे ! पण या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; कारण आज जे लक्ष्मणपुरीमध्ये घडले, ते देशात अन्य ठिकाणी कधीही आणि कसेही घडू शकते. त्यामुळे लक्ष्मणपुरीमधील घटनेच्या मुळाशी जाऊन त्यामागील कारणे आणि मानसिकता यांचाही शोध घेतला पाहिजे. तसे केल्यासच पुढील घटना रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलता येतील. या घटनेत ‘मुलाची आई त्या मुलाला कशाचा तरी राग मनात धरून त्रास देत होती’, असे पोलिसांचे म्हणणे आहे; पण दुसरीकडे तीच आई ‘पबजी’ खेळण्यापासून त्याला रोखत होती, ते त्याच्या भल्यासाठीच. आई छळत होती असे मानले, तरी इतके मोठे हिंसक पाऊल सर्वसाधारण मुलगा उचलणे अशक्यच ! त्यामुळे यामागे काही आध्यात्मिक कारण तर नसेल ना ? याचाही विचार व्हायला हवा. विदेशामध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडल्यास त्याविषयी आध्यात्मिक स्तरावर संशोधन केले जाते. अन्य वेळी विदेशींचे अनुकरण करणार्‍या भारताने या दृष्टीनेही संबंधित प्रकरण हाताळल्यास ठोस निष्कर्ष सापडू शकतील.

नीतीमत्ताहीन समाज !

आज भारत देश अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवू पहात आहे. ही प्रगती बहुतांश प्रमाणात बुद्धीमत्तेच्या जोरावर आधारित आहे. त्यामुळे ‘ती सर्वंकष स्तरावरील आहे’, असे म्हणू शकत नाही. कोणत्याही प्रगतीमध्ये नैतिक मूल्यांचा वाटाही तितकाच मोलाचा असतो. खरेतर ती मूल्ये हा प्रगतीचा पाया असायला हवा; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज हा पायाच ढासळत चाललेला आहे. नीतीमत्ताहीन समाज विकासाचा डोलारा कसा सांभाळणार ? विकासाच्या दिशेने मार्गक्रमण कसे करणार ? याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. भारताचा इतिहास उज्ज्वल होता. त्या बळावर देशातील तरुणाईने वर्तमान आणि त्याहून भविष्यकाळ उज्ज्वल करायला हवा; पण आईची हत्या करणारी पिढी असलेल्या भारतात हे शक्य होईल का ? वयाच्या १६ व्या वर्षी तोरणा गड जिंकणार्‍या छत्रपती शिवरायांचा महान वारसा आपल्याला लाभलेला असतांना तितक्याच वयाचा मुलगा आपल्या आईची हत्या करतो, हे किती लाजिरवाणे आणि तितकेच संतापजनकही आहे. आजची लहान किंवा तरुण मुले संस्कारांना धुडकावत आई-वडिलांपेक्षा सध्या ‘पबजी’ हेच त्यांचे सर्वस्व मानत आहेत आणि तंत्रज्ञानाच्या म्हणजेच भासमान युगाच्या आहारी जात आहेत. याची परिणती गुन्हेगारीत कधी होते ? ते कुणालाच लक्षात येत नाही. गुन्हेगार होऊ पहाणारी आजची पिढी देशाला अंधःकाराच्या गर्तेत लोटत आहे. वाढती व्यसनाधीनता, भ्रमणभाषचा अतिरेक, चित्रपट किंवा मालिका यांतून केले जाणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण, तसेच सामाजिक वातावरण आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण या गोष्टी गुन्हेगारी किंवा हिंसक मनोवृत्ती निर्माण होण्यास कारणीभूत आहेत. भावी पिढीला घडवण्यात पालक, शिक्षक आणि सरकार यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांनीच भान ठेवून दायित्व पार पाडायला हवे. तसे झाल्यासच गुन्हेगारीयुक्त नव्हे, तर गुन्हेगारीमुक्त भारत घडू शकेल !

मुलांनो, १६ व्या वर्षी गड जिंकणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवा !