‘मेट्रो इको पार्क’चे वीजदेयक थकल्याने महावितरणची कारवाई !

पिंपरी (पुणे) – वीजदेयक थकल्याने महावितरणने ‘मेट्रो इको पार्क’ येथील वीज तोडली आहे. त्यामुळे येथील झाडांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षीही पाण्याअभावी दुर्मिळ प्रजातींची १४० झाडे मृत झाली होती. वीज नसल्याने पाण्याचा उपसा करणे शक्य नाही. त्यामुळे पाण्याअभावी झाडे जळण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. १३ सहस्र ९२० रुपये वीजदेयक थकल्याने महावितरणने मागील आठवड्यात कारवाई केली.

मेट्रो मार्गिकेसाठी अनेक झाडे तोडल्याने मेट्रोला त्या बदल्यात रावेत येथील ५ एकराचा भूखंड ‘इको पार्क’ उभारण्यासाठी देण्यात आला होता. या भूखंडावर मेट्रोने १ सहस्र झाडे लावली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे ही जागा हस्तांतरित झाली असून सध्या निवडणूक आयोगाच्या गोदामाचे काम चालू असल्याने ही जागा बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे त्यांनी या पार्कची देखरेख करणे आवश्यक आहे. ‘मेट्रो इको पार्क’ मध्ये गेल्या वर्षभरापासून नागरिकांना मनाई केली आहे. ‘मेट्रो इको पार्क’मधील झाडांची कोणतीही हानी केली जाणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी प्रशासनाने दिले होते; मात्र तसे होतांना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी दिली आहे. (असे प्रशासन काय कामाचे ? याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)

मेट्रो इको पार्क येथील वीज जोड मेट्रोच्या नावाने आहे. ही जागा आता निवडणूक आयोगाच्या अंतर्गत असल्याने लवकरच त्या नावे विजेचे मीटर केला जाईल. एक दोन दिवसांमध्ये वीजदेयक भरून वीजपुरवठा पूर्ववत् केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल मलशेट्टी यांनी सांगितले.

‘मेट्रो इको पार्क’ची महावितरणकडे ज्या भ्रमणभाष क्रमांकावर नोंद आहे, त्या क्रमांकावर वीजदेयक भरण्यासाठी आम्ही नोटीस पाठवली होती; मात्र तरीही वीजदेयक न भरल्याने वीज तोडावी लागली, असे महावितरणच्या भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी सांगितले.